‘औरंगाबादचं संभाजीनगर करणारच !’ मुख्यमंत्र्यांची विधानसभेत ग्वाही

Sambhaji Nagar - CM Uddhav Thackeray

मुंबई :- अर्थसंकल्पीय अधिवेशनातील राज्यपालांच्या भाषणावरील चर्चेदरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी विरोधकांवर जोरदार फटकेबाजी केली. औरंगाबादचं नाव संभाजीनगर करण्याच्या मुद्द्यावरून भाजप (BJP) आणि शिवसेनेत (Shiv Sena) जोरदार राजकारण पाहायला मिळत आहे. विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस (Devendra Fadnavis) यांनी संभाजीनगरच्या मुद्द्यावरून शिवसेनेवर आणि पर्यायानं मुख्यमंत्र्यांवर टीका केली होती. त्याला आज मुख्यमंत्र्यांनी प्रत्युत्तर दिलं. इतकंच नाही तर जगातील सर्वांत  मोठ्या क्रिकेट स्टेडियमला पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचं नाव दिल्यावरूनही मुख्यमंत्र्यांनी भाजपवर शरसंधान साधलं. वल्लभाई पटेल यांचं नाव हटवून नरेंद्र मोदींचं नाव त्या स्टेडियमला दिलं आहे. आता त्या स्टेडियमवर भारत प्रत्येक मॅच जिंकणार, असा टोलाही मुख्यमंत्र्यांनी लगावला.

त्याचबरोबर औरंगाबादचं (Aurangabad) नाव संभाजीनगर (Sambhaji Nagar) करू, असा दावाही मुख्यमंत्र्यांनी सभागृहात केला. पण राज्यानं ज्या विमानतळाचं नाव छत्रपती संभाजी महाराज विमानतळ करण्याचा निर्णय घेतला, तो प्रस्ताव सध्या कुठे रखडला आहे? असा सवालही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केला. तसेच माजी अर्थमंत्री आणि भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांच्या भाषणबाजीवर तर मुख्यमंत्र्यांनी थेट नटसम्राट नाटकाची आठवण झाल्याचा टोला लगावला. त्याचबरोबर सीमा भाग, मराठी भाषादिन आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या मुद्द्यावरूनही मुख्यमंत्र्यांनी भाजपवर जोरदार टीकास्त्र डागलं.

विरोधकांची चर्चा ऐकून नटसम्राट पाहिल्याचा भास झाल्याचा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लगावला. मुनगंटीवारांच्या भाषणादरम्यान नटसम्राटमधील मी अथेल्लो, मी आहे हॅम्लेट असा भास झाला. पण शेवटी कुणी किंमत देतं का किंमत अशी स्थिती असल्याचंही मुख्यमंत्री म्हणाले. मुनगंटीवार यांच्या भाषणादरम्यान देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांना भीती वाटत होती, असा खोचक टोलाही त्यांनी लगावला. त्याचबरोबर मी आणि मुनगंटीवार हाडाचे कलाकार आहोत. पण कलेला राजकारणात वाव नाही. मात्र, मुनगंटीवार यांना संधी मिळाली की त्यांची कला उफाळून येते. पण सुधीरभाऊ तुमच्यातला कलाकार मारू  नका, अशा खोचक सल्लाही मुख्यमंत्र्यांनी मुनगंटीवारांना दिला आहे.

मराठवाडा आणि विदर्भ वैधानिक विकास महामंडाळाची स्थापना करा, अशी जोरदार मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि सुधीर मुनगंटीवार यांनी केली होती. त्याला उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी उत्तर दिलं होतं. आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही भाजप नेत्यांना या मुद्द्यावरून फटकारलं. विदर्भ आणि मराठवाड्याच्या विकासासाठी विकास महामंडळाची स्थापना तातडीने करा, अशी मागणी करताना भाजपनं मुख्यमंत्र्यांनी विदर्भ हे त्यांचं आजोळ असल्याची आठवण करून दिली होती. त्यावर आता भाजपला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी माझं आजोळ माझ्यापासून तोडू नका, असा दमच भरला.

अरे हा, ते एक राहिलं विदर्भाचं, माझं आजोळ. मी नाही विसरलो. पण माझं आजोळ माझ्यापासून तोडण्याचा विचार तुमच्या मनामध्ये आहे तो पहिले  सोडून द्या. विदर्भ वेगळा होणार नाही. मी तो होऊ देणार नाही. विदर्भाला आम्ही सोबत ठेवून महाराष्ट्राचा एकत्रित विकास केल्याशिवाय राहणार नाही. फक्त विदर्भाचा कणव आणायचा, माझ्या आजोळाची आठवण मला करून द्यायची. माझं आजोळ माझ्यापासून तोडू नका, अशा शब्दात भाजपला एकप्रकारे इशारच दिला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER