संभाजीराजेंचा ७ जूनपर्यंतचा अल्टिमेटम; अजितदादा म्हणाले, अजून नऊ दिवस बाकी !

Ajit Pawar - Sambhaji Raje

पुणे :- ६ जून राज्याभिषेक सोहळा दिनापर्यंत मराठा आरक्षणाबाबत (Maratha Reservation) आम्ही सांगितलेल्या पाच गोष्टींवर निर्णय घेतला नाही तर ७ जून रोजी रायगडावरून आम्ही आंदोलनाला सुरुवात करणार आहोत. कोरोना वगैरे आम्ही बघणार नाही. त्यावेळी सर्वांत पुढे मी असेन, असा इशारा खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आज दिला. त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आंदोलनाला अजून नऊ  दिवस बाकी आहेत. तोपर्यंत मार्ग निघेल, असे सूचक विधान अजित पवार यांनी केले.

अजित पवार यांनी पुणे विभागाची कोरोना आढावा बैठक घेतली. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना अजित पवार म्हणाले, आंदोलनाला अजून बरेच दिवस बाकी आहेत. अजून नऊ दिवस बाकी आहेत. तोपर्यंत मार्ग निघेल. या नऊ दिवसांत खूप काही होईल. चर्चा होईल, मार्ग निघेल. मराठा समाजाला आरक्षण देण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे संभाजीराजेंना (Sambhaji Raje) आंदोलन करण्याची वेळ येणार नाही. काही लोकांना आंदोलन करण्याची हौस असते. संभाजीराजेंबद्दल मी बोलत नाही. कुणी आंदोलन केलं की हे लोक त्याला पाठिंबा देतात. अरे पण आंदोलन कशासाठी आहे? का आहे? मार्ग काही निघतो का? याची काहीच माहिती हे लोक घेत नाहीत, असा टोला त्यांनी भाजपचे (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांना नाव न घेता लगावला.

यावेळी त्यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची खिल्ली उडवली. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सर्वांनी रस्त्यावर उतरावं असं आवाहन चंद्रकांतदादांनी केलं. काही पक्षांनी या मुद्यासाठी रस्त्यावर उतरू अशी भूमिका घेतली; पण कशासाठी उतरायचं? चंद्रकांत पाटील यांनी रस्त्यावर उतरा असं म्हटलंय. त्यांचं एकावे लागेल. आता मी, राजेश टोपेदेखील (Rajesh Tope) मराठा समाजाचे आहोत. आम्हालाही रस्त्यावर उतरावे लागेल, असा टोलाही त्यांनी लगावला.

यावेळी त्यांनी आघाडी सरकारमध्ये सुरू असलेल्या कुरबुरीच्या वृत्ताचेही खंडन केले. आघाडी सरकारमध्ये कोणतीही नाराजी नाही आणि कुणाच्याही तक्रारी नाहीत. आघाडीचा कारभार सुरळीत सुरू आहे. सगळं व्यवस्थित सुरू आहे. कुठल्याही बाबतीत काहीही झालं नाही. शरद पवार (Sharad Pawar) साहेब जसा वेळ देतात, तसं मी त्यांना भेटतो. तक्रारी आणि कुरबुरीच्या बातम्या पेरल्या जात आहेत, असंही ते म्हणाले.

ही बातमी पण वाचा : मराठा आरक्षणाबाबत निर्णय घ्या, अन्यथा ७ जूनपासून रस्त्यावर उतरु, संभाजीराजेंचा अल्टिमेटम

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button