संभाजीराजेंनी मोर्चा काढण्यावर ठाम राहावे, सरकारला पळवाट देऊ नये – चंद्रकांत पाटील

Chandrakant Patil - Sambhaji Raje - Maharashtra Today

कोल्हापूर : मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरुन खासदार संभाजीराजे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांनी आपल्या भूमिकेवर ठाम राहावे, मराठा मोर्चा काढण्यात चालढकल करत असतील तर ही बाब समजून घेण्यास मराठा समाज सुज्ञ आहे. मात्र, यामुळे मराठा समाजाचे मोठे नुकसान होईल, असे विधान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले. संभाजीराजे यांनी मोर्चा काढण्यावर चालढकल केली तर जो कोणी मराठा आरक्षणाच्या लढाईसाठी पुढे येईल, त्याच्या पाठिशी भाजप उभा राहील, असेही चंद्रकांत पाटील म्हणाले.

पुण्यात प्रसारमाध्यमांशी चर्चा करताना पाटील म्हणाले, मराठा मोर्चा काढण्यासाठी जर दिरंगाई केली तर ही गोष्ट मराठा समाजाला नक्कीच लक्षात येईल. त्यानंतर मराठा आंदोलनाचं नेतृत्व दुसऱ्या कोणाकडे जाईल किंवा काय होईल, ते माहिती नाही. मात्र, वेळ निघून गेल्यास मराठा समाजाचे मोठे नुकसान होईल. संभाजीराजे यांच्या भूमिकेमुळे सरकारला आरक्षणाच्या प्रश्नापासून पळवाट काढण्याची संधी तर मिळणार नाही ना, याचा विचार संभाजीराजे यांनी करायला हवा.

संभाजीराजे एकदा मोर्चा काढणार, एकदा लाँग मार्च काढणार असे सांगतात. कोल्हापुरातही १६ जूनला मराठा मोर्चा निघणार का, याची अद्याप शाश्वती नाही. तुम्ही या सर्व गोष्टी मराठा समाजासमोर सविस्तरपणे मांडल्या पाहिजेत. संभाजीराजे यांनी रायगडावरुन मराठा मोर्चा काढण्याचे जाहीर करताच मी त्यांना पाठिंबा जाहीर केला. आता त्यांनी माघार घेतली तरी भाजपच्या भूमिकेत कुठलाही बदल होणार नाही. पण उद्या कोल्हापुरात दुसऱ्या कोणी पुढाकार घेऊन मोर्चा काढला तर भाजप त्यांनाही पाठिंबा देईल, असे चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले.

महाविकासआघाडी सरकार धार्मिक गोष्टींना सोडून इतर सर्वाना परवानगी देते. शरद पवार यांनाही आजारपणाच्या काळात हॉटेल मालकांची काळजी होती. मात्र, आषाढीच्या पायी वारीसाठी वारकऱ्यांना परवानगी मिळालीच पाहिजे, अशी मागणीही चंद्रकांत पाटील यांनी केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button