संभाजीराजेंना राजीनामा मागितलेला नाही; प्रवीण दरेकर यांचे स्पष्टीकरण

Sambhaji Raje - Pravin Darekar

मुंबई :- जर माझ्या राजीनाम्याने मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) तिढा सुटणार असेल तर मी आजच राजीनामा देण्यास तयार आहे, असा पुनरुच्चार खासदार संभाजी छत्रपती यांनी आज पत्रकार परिषदे दरम्यान केला. त्यावर विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Praveen Darekar) यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. संभाजीराजेंना कुणीही राजीनामा मागितला नाही आणि राजीनाम्याने प्रश्नही सुटणार नाही, असे स्पष्टीकरण प्रवीण दरेकर यांनी दिले आहे.

खासदार संभाजी छत्रपती (Sambhaji Raje Chhatrapati) यांनी पत्रकार परिषद घेऊन आरक्षणाच्या मुद्द्यावरून आपली रोखठोक भूमिका सांगतानाच पुढची दिशाही स्पष्ट केली. त्याबाबत प्रवीण दरेकर प्रतिक्रिया देत म्हणाले, संभाजीराजे भाजपवर नाराज नाही. राजेंकडे कोणीही राजीनामा मागितला नाही. राजीनामा दिल्याने आरक्षणाचा तिढाही सुटणार नाही. हा उपाय असूच शकत नाही. मात्र, राजीनामा द्यावा की नाही तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. मराठा समाजाच्या नावाने कोणीही राजकारण करू नये. संभाजी छत्रपती यांनी राजकीय पक्ष काढण्याचे संकेत दिले आहेत. त्यांनी पक्ष काढावा की काढू नये किंवा आणखी काय करावं हा त्यांचा वैयक्तिक विषय आहे. आरक्षण मिळावं ही मराठा समाजाची सार्वत्रिक भावना आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळायलाच हवे. त्यासाठी मराठा समाजाचे नेते काम करत आहेत. भाजपने त्याला पाठिंबा दिला आहे. आम्ही संभाजी छत्रपती यांच्या आंदोलनालाही पाठिंबा देत आहोत. पक्षविरहित मराठा समाजाची मोट बांधली जावी, असंही ते म्हणाले.

केंद्र सरकारने मराठा आरक्षणाबाबत पुनर्विचार याचिका दाखल केली आहे. केंद्र सरकार योग्य प्रकारे पावले उचलत आहे. राज्यपालांना पत्र देऊन काहीही उपयोग होणार नाही. काही जण एकमेकांवर आरोप करत आहेत. त्यामुळे आरक्षणावर चर्चा झाली पाहिजे. त्याने केंद्राच्या आणि राज्याच्या जबाबदाऱ्या काय आहेत त्या गोष्टी लोकांसमोर येतील, असं ते म्हणाले. राजेंच्या चार-पाच मागण्या चांगल्या आहेत. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी अधिवेशन घेतलं जावं ही त्यांची मागणी योग्य आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

ही बातमी पण वाचा : ‘राजीनामा देऊ नका, भाजपात राहूनच आरक्षण मिळणार’, नारायण राणेंचा संभाजीराजेंना सल्ला

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button