सरकारला याची मोठी किंमत मोजावी लागेल; संभाजीराजेंचा इशारा

Sambhaji Raje Chhatrapati-Uddhav thackeray

कोल्हापूर : मराठा आरक्षणासंदर्भात (Maratha reservation) दाखल करण्यात आलेल्या याचिकांवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयानं काल (९ सप्टेंबर) महत्त्वाचा निर्णय दिला. सरकारी नोकऱ्या तसेच शैक्षणिक प्रवेशात मराठा आरक्षण देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने २०१८ साली बनविलेल्या कायद्याच्या अंमलबजावणीस सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी तात्पुरती स्थगिती दिली. ज्यांना यापूर्वी या आरक्षणाचा लाभ मिळाला आहे, त्याला धक्का लागणार नाही, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे. न्यायालयाच्या या अंतरिम आदेशामुळे मराठा समाजातील विद्यार्थ्यांना जबर धक्का बसला असून याचे खापर आता महाविकास आघाडी सरकारवर फोडले जात आहे.

राज्यसभेचे खासदार संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Raje Chhatrapati) यांनीदेखील समाजावर अन्याय झाला असून त्यांनी आक्रमक शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. मराठा समाजावर अन्याय झाला! आम्ही राज्यघटनेचा आणि न्यायव्यवस्थेचा आदर करतो. मराठा समाजाने आरक्षण मिळवण्यासाठी प्रचंड मोठा त्याग केला आहे. अनेकांनी स्वतःच्या आयुष्याची होळी केली, हजारो लोकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. या राष्ट्राच्या एकेक इंच जमिनीचे रक्षण करण्याकरिता, इथल्या संस्कृतीचे रक्षण करण्याकरिता सर्वांत जास्त त्याग करणारा हा समाज आहे. त्या राष्ट्रभक्त समाजाला स्वतंत्र भारतात डावलले जात असल्याची भावना निर्माण होत आहे.

राज्यघटनेच्या चौकटीत मराठा समाजालाही समतेची वागणूक मिळावी अशी अपेक्षा आहे.मी समाजाचा घटक या नात्याने जबाबदारीपूर्वक सांगू इच्छितो की, महाराष्ट्रातील विद्यमान सरकार असो की मागचे सरकार असो. समाजाने टाकलेल्या विश्वासाला गृहीत धरून कुणी दगाफटका करत असेल तर त्यांना त्याची जबर किंमत मोजावी लागेल. यापुढे समाज जे ठरवेल ती माझी भूमिका असेल, असे त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून स्पष्ट केले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER