मराठा आरक्षणाच्या नेतृत्वावरून छत्रपतींच्या घराण्यात भांडणे लावाल तर याद राखा! : संभाजीराजे

Sambhaji Raje Bhosle

नाशिक : राज्यात मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) प्रश्न पेटला आहे . यापार्श्वभूमीवर नेतृत्वावरून सातारा आणि कोल्हापूरची घराणी एकच आहेत. आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत. मराठा समाजाचे नेतृत्व कोणीही करावे. आपण समाजाचा सेवक म्हणून काम करत आहोत. छत्रपतींच्या घराण्यात भांडणे लावण्याचे उद्योग कोणी करत असेल तर त्याच्या नांग्या ठेचाव्या लागतील, असा इशारा संभाजीराजे भोसले (Sambhaji Raje Bhosle) यांनी मराठा समाजाच्या नेतृत्वावरून वाद निर्माण करणाऱ्यांना दिला.

मराठा क्रांती मोर्चाच्या राज्यस्तरीय समन्वय समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते . मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर राज्य व केंद्रस्तरीय निर्णायक लढा देण्याची वेळ येऊन ठेपली असून, अशा वेळी कोणत्याही मोठ्या जबाबदारीपेक्षा समाजाचा ‘‘सेवक’ म्हणून सर्वात अग्रस्थानी उभा राहीन, अशी ग्वाही छत्रपतींचे वंशज खासदार संभाजीराजे यांनी दिली. याच वेळी मराठा क्रांती मोर्चा व आरक्षणाचे नेतृत्व करण्यास मात्र त्यांनी नम्रपणे नकार दिला.

राज्यातील सर्व समन्वयकांनी एकत्र बसून महासमिती करावी व त्या अंतर्गत विविध समित्या करून त्यांना जबाबदारीचे वाटप करावे. त्यासाठी समाजातील आमदार, खासदारांना सहभागी करून घेण्यात यावे, आंदोलनाची रूपरेषा व त्यासाठी लागणारा वेळदेखील ठरवून घ्यावा. मग केंद्र सरकार असो वा राज्य सरकार यांच्याकडे जाऊन प्रश्न कसा सोडवायचा ते आपण पाहू, असे संभाजीराजे यांनी सांगितले.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी प्रत्येक जिल्ह्यात वेगवेगळ्या बैठका झाल्या; परंतु नाशिकमध्ये सर्वसमावेशक झालेली ही पहिलीच बैठक आहे.मराठा क्रांती मोर्चे हे समाजाने सर्व खासदार, आमदार नेत्यांना बाजूला सारून एक होत निर्णय घेतल्याने यशस्वी झाले आहेत. एक नव्हे तर तब्बल ५८ मोर्चे काढण्यात आले. त्यात समाजाची एकजूट दिसून आली. त्यामुळे आजच्या या बैठकीला आपण संभाजीराजे म्हणून नाही तर समाजाचा सेवक म्हणून उपस्थित राहिलो आहे , असेही ते म्हणाले .

नाशिक येथे झालेल्या राज्यस्तरीय समन्वयक बैठकीत शिवाजी सहाणे यांनी छत्रपती संभाजीराजे यांना मराठा क्रांती मोर्चा व मराठा आरक्षणाचे नेतृत्व स्वीकारण्याबाबत ठराव मांडला. त्यास उपस्थित २८ जिल्ह्यातील प्रतिनिधींनी हात उंचावून अनुमोदन दिले. मात्र राजेंनी ते नम्रपणे नाकारल्याने अखेर करण गायकर यांनी राज्यातील सर्व समन्वयक यांचे मार्गदर्शक म्हणून राजेंनी ‘मुख्य समन्वयक’ म्हणून काम पाहावे, अशी सूचना मांडली. त्यास संभाजीराजेंनी सकारात्मक प्रतिसाद दिला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER