मनसेच्या झेंड्याला संभाजी ब्रिगेडचा विरोध; निवडणूक आयोगाकडे करणार तक्रार

Mns -Sambhaji Brigade

पुणे :- मनसेचा झेंडा आता बदलण्यात येणार आहे. परंतु, हा झेंडा प्रसिद्ध होण्यापूर्वीच वाद निर्माण झाला आहे. संभाजी ब्रिगेडने मनसेच्या या नव्या झेंड्याला विरोध केला आहे. मनसेने नवीन भगवा झेंडा निर्माण करून त्यावर छत्रपती शिवाजी महाराजांची ‘राजमुद्रा’ घेतली आहे.

महाराजांची ‘राजमुद्रा’ हे राजकारण करण्याचे साधन नसून, राजमुद्रेचा वापर कुठल्याही पक्षाने राजकारण करण्यासाठी करू नये, अशी भूमिका मांडून संभाजी ब्रिगेडने मनसेला विरोध केला आहे. राज्य निवडणूक आयोग, छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आणि महाराष्ट्र सरकार यांच्याकडे या झेंड्याविरोधात तक्रार करणार असल्याचे संभाजी ब्रिगेडने म्हटले आहे. आज मंगळवारी एका खाजगी मराठी वृत्तवाहिनीशी याबाबतचे वृत्त दिले आहे.

ही बातमी पण वाचा : राज ठाकरेंनी नरेंद्र मोदींवर टीका केली होती भाजपावर नाही – मनसे

छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यासाठी राजमुद्रेची निर्मिती केली. परंतु, ‘राजमुद्रा’ वापरणे महाराष्ट्रातील शिवप्रेमी आणि संभाजी ब्रिगेड सहन करणार नाही, असा इशारा संभाजी ब्रिगेडचे पुणे जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे यांनी आज दिला.

दरम्यान, विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर नव्या वर्षात पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वात मनसे जोमाने कामाला लागली आहे, हे विशेष. सध्या मनसेच्या झेंड्यात निळा, भगवा, पांढरा आणि हिरवा, असे रंग असून पक्षाचे चिन्ह असलेले इंजिनही त्यावर आहे. नव्या झेंड्यात फक्त भगवा रंग आणि मध्यभागी ‘शिवराजमुद्रा’ राहणार आहे. हा बदल म्हणजे मनसेची हिंदुत्वाकडे वाटचाल असल्याचेही म्हटले जात आहे, हे येथे उल्लेखनीय.