संभाजी ब्रिगेडने ओबीसीच्या पदाधिकाऱ्यांना काळे फासले, कपडे फाडले

सोलापूर : लवकरात लवकर मराठा समाजाला आरक्षण बहाल करता यावे यासाठी राज्य शासनाने राज्य मागासवर्ग आयोगाची स्थापना केली असून, मराठा आरक्षणाबाबतची जनसुनावणी व सर्वेक्षणाचे काम पावसाळ्याच्या आधी करण्याचा आयोगाचा प्रयत्न आहे. त्या अनुषंगाने आज सोलापूर येथे होत असलेल्या जनसुनावणीदरम्यान संभाजी ब्रिगेड आणि ओबीसी महासंघाच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला.

आज सकाळी मागासवर्गीय आयोगासमोर जनसुनावणी प्रारंभ झाला. यावेळी समितीपुढे निवेदन देण्यासाठी आलेल्या अखिल भारतीय माळी महासंघाचे पदाधिकारी शंकरराव लिंगे तसेच अॅड. राजेंद्र दीक्षित यांच्या तोंडाला संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी काळे फासून त्यांचे कपडे फाडले. शंकरराव लिंगे महासंघाच्या लेटरपॅडवर निवेदन घेऊन समितीला भेटण्यासाठी आले होते. मात्र संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी तसेच कार्यकर्त्यांनी त्यांना विरोध केला.

प्रकरण हातघाईवर आल्यावर त्यांच्या तोंडाला काळे फासण्यात आले. शंकरराव लिंगे त्यांचे कपडेही संतप्त कार्यकर्त्यांनी फाडले. पोलिसांनी मध्यस्थी करून त्यांना वाहनातून पोलीस स्टेशनला रवाना केले.

या जनसुनावणीसाठी सकल मराठा समाजाच्यावतीने गेल्या 15 दिवसांपासून जय्यत तयारी करण्यात आली होती. या संदर्भात जनजागरण करण्यासाठी विविध पातळीवर बैठकांही घेण्यात आल्या होत्या. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी हजारोंच्या संख्येने निवेदन तयार करण्याचे आवाहन करण्यात आले.

त्यानुसार शुक्रवार सकाळपासूनच शासकीय विश्रामगृहात मराठा समाजातील विविध संघटना, सर्वसामान्य नागरिक, लोकप्रतिनिधी हे मागासवर्गीय आयोगाला भेटण्यासाठी आले. याचवेळी ओबीसी चळवळीतील शंकर लिंगे व अॅड. राजन दीक्षित हे आयोगाला सामोरे जाण्यासाठी आले असता मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी शंकर लिंगे व अॅड. राजन दीक्षित यांना सुरूवातील काळे फासले. त्यानंतर याच्यात वादावादी सुरू झाली. धक्काबुक्कीमध्ये लिंगे यांचे कपडे फाडले. दीक्षित यांनाही मारहाण झाल्याची माहिती समोर आली आहे.