शिवशंभूप्रेमींचा लढा : ‘संभाजी विडी’चे नाव बदलणार; मुख्यमंत्र्यांकडे केली होती डॉ. अमोल कोल्हेंनी मागणी

sambhaji-bidi

पुणे : साबळे वाघिरे कंपनीने छत्रपती संभाजीराजेंच्या नावाने चालणा-या विडीचे नाव बदलावे यासाठी अनेक दिवसांपासून शिवशंभूप्रेमींचा लढा सुरू होता. तो लढा पूर्णत्वास नेण्यास राष्ट्रवादीचे नेते खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहून साबळे वाघिरे कंपनीने विडीचे नाव बदलण्यास निर्देश द्यावेत, असे म्हटले होते. योगायोगाने शिवशंभूप्रेमी व डॉ. अमोल कोल्हेंच्या प्रयत्नांना यश आले आहे. संभाजी विडीचे नाव बदलण्याचा निर्णय साबळे वाघिरे कंपनीने घेतला आहे.

संभाजी विडीचे नाव बदलावे या मागणीसाठी मागील काही दिवसांपासून संभाजी ब्रिगेड आणि काही राजकीय संघटनांनी पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याला आंदोलन सुरू केले होते. परिणामी या आंदोलनाला यश आले आहे. संभाजी ब्रिगेड, शिवधर्म फाउंडेशन आणि इतर शिवप्रेमी संघटना आणि सर्वसामान्य नागरिकांच्या जनभावनेचा आदर करून आम्ही विडीचे नाव बदलण्याचा निर्णय घेतला असल्याचे साबळे वाघिरे आणि कंपनीचे संचालक संजय वाघिरे यांनी पत्रकाद्वारे जाहीर केले आहे.

साबळे वाघिरे कंपनीने संभाजी विडीचे नाव बदलण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, नाव बदलण्यासाठी काही कालावधी लागणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे.

कंपनी आपल्या उत्पादनासाठी नवीन नाव कायदेशीर प्रक्रियेने नोंदवणार आहे. त्याला काही अवधी लागणार आहे.

आमच्या ग्राहकांची साखळीही तुटणार नाही, तसंच शिवप्रेमींची मागणीही पूर्ण होईल आणि ६० ते ७० हजार विडी कामगारांच्या प्रपंचावरही कुऱ्हाड येणार नाही, असे कंपनीने प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER