…तर इंदोरीकर महाराजांसाठी खुद्द संभाजी भिडे रस्त्यावर उतरणार

Sambhaji Bhide - Indurikar Maharaj

मुंबई : मागील आठ दिवसांपासून इंदोरीकर महाराजांच्या वक्तव्यावरुन मोठा वाद सुरु आहे. इंदोरीकर महाराज यांच्या विरोधात आणि समर्थनात असे दोन गट पडले आहेत. कीर्तनकार इंदोरीकर महाराज यांच्यावरून सुरू असलेल्या वादात आता संभाजी भिडे यांच्या शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या संघटनेनंही उडी घेतली आहे. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानने इंदोरीकर महाराजांना समर्थन दिले आहे. तसंच इंदुरीकर महाराज यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यास खुद्द संभाजी भिडे आणि असंख्य कार्यकर्ते रस्त्यावर उतरून आंदोलन करतील, असा इशारा शिवप्रतिष्ठानचे कार्यवाहक नितीन चौगुले यांनी दिला आहे.

इंदोरीकर महाराजांना रोहित पवारांचे समर्थन म्हणाले, ‘खोलात जाण्याची गरज नाही’

हभप निवृत्ती देशमुख म्हणजेच इंदोरीकर महाराज यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून त्यांच्यावर टीकेची झोड उठली. त्यानंतर इंदोरीकर यांच्या बाजून आणि विरोधात असे दोन गट पडले आहेत. अनेक राजकीय पक्षांनी आणि नेत्यांनीही इंदोरीकर यांना समर्थन दिलं आहे. तर काही सामाजिक संघटना या इंदोरीकर यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा यासाठी मैदानात उतरल्या आहेत. भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई या आक्रमकपणे इंदोरीकरांवर कारवाई व्हावी, अशी मागणी केली आहे.

इंदोरीकर महाराज यांच्याबाबत शिवप्रतिष्ठान काय भूमिका घेणार याबाबत लक्ष लागून राहिले होते. मात्र आज शिवप्रतिष्ठानकडून इंदोरीकर महाराज यांना पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे. आपल्या किर्तनातून इंदोरीकर महाराज हे समाज प्रबोधनाचे काम करत आहेत. त्यांच्या एका शब्दाचा विपर्यास करून त्यांना बदनाम करण्याचे षडयंत्र रचण्यात आल्याचा आरोप शिवप्रतिष्ठानकडून करण्यात आला आहे. तसेच जर इंदोरीकर महाराज यांच्यावर गुन्हा दाखल झाला, तर राज्यभर शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान रस्त्यावर उतरतील असा, इशारा शिवप्रतिष्ठानचे नितीन चौगुले यांनी राज्य सरकारला दिला आहे.