सॅम करनच्या खेळात धोनीची झलक; इंग्लंडच्या कर्णधाराने केली प्रशंसा

इंग्लंडविरुद्धचा  (India Vs England) तिसरा आणि शेवटचा वन डे (ODI) सामना भलेही भारताने जिंकला असेल; पण या सामन्यातील झुंझार खेळीसह इंग्लंडचा अष्टपैलू सॅम करन (Sam Curran) याने मात्र क्रिकेटप्रेमींची मने जिंकली. आठव्या क्रमांकावर फलंदाजीला येत त्याने जी नाबाद ९५ धावांची खेळी केली तिची वन डे क्रिकेटच्या सर्वोत्तम खेळींपैकी एक अशी नोंद करता येईल; कारण सॅमच्या या खेळीनेच इंग्लंडला ७ बाद २०० अशा मोठ्या पराभवाच्या स्थितीतून विजयाच्या उंबरठ्यावर पोहचवले होते आणि ३३० धावांचे आव्हान असताना इंग्लंडचा संघ फक्त सात धावांनी पराभूत झाला.

या खेळीने त्याला सामनावीर तर ठरवलेच; पण सर्वांची प्रशंसासुद्धा त्याने मिळवली. त्याचा कर्णधार जोस बटलर (Jose Buttler) याने त्याची मुक्तकंठाने प्रशंसा करताना म्हटले की, त्याच्या खेळात एम.एस.धोनीची झलक दिसते. साहजिकच आहे, सॅम हा आयपीएलसाठी चेन्नई सुपर किंग्जकडून खेळतो आणि म्हणून सीएसकेचा कर्णधार धोनीकडून तो निश्चितपणे काही शिकला असणार. महेंद्रसिंग धोनी हा ‘ग्रेट फिनिशर’ म्हणून विख्यात आहे. सॅम करनची रविवारची खेळी काहीशी तशीच होती. बटलरने म्हटलेय की, या खेळीबद्दल सॅम धोनीशी नक्कीच चर्चा करेल. सॅमच्या जागी धोनी असता तर कदाचित त्याने या सामन्यात अशीच खेळी केली असती. सॅमसाठी त्याच्याशी अशा खेळीबद्दल चर्चा ही फार मोठी गोष्ट असेल. धोनी किती विलक्षण खेळाडू आहे ते मला माहीत आहे. त्याच्याकडून आमच्या खेळाडूंना शिकण्यासारखे भरपूर आहे.

दुसऱ्या वन डे सामन्यात इंग्लंडच्या संघाने ३३७ धावांचे लक्ष्य साडेसहा षटके शिल्लक राखून गाठले होते. त्यामुळे रविवारचे ३३० धावांचे लक्ष शक्य होते; पण आमच्या भागीदारी झाल्या नाहीत. ठरावीक अंतराने आमचे गडी बाद होत गेले. धावगतीची चिंता नव्हती; पण गडी गमावल्याने दडपण आल्याचे त्याने म्हटले आहे. आम्ही काहीसे बेजबाबदारपणे खेळलो. आमच्या गोलंदाजांनी भारतीय फलंदाजांना फटके मारण्याची संधी दिली, असेही बटलरने मान्य केले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button