सॅल्यूट टीम इंडिया! सामना अनिर्णीत, पण जिंकला भारतच!

Team India
  • विहारी व पंतची जिद्द
  • पुजारा व अश्विनचा संयम
  • टीम पेनने सोडलेले झेल
  • याने केला फरक

ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघाचे (India Vs Australia) कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. सिडनीत (Sydney Test) चौथ्या डावात ४०७ धावा करून विजय मिळवणे अवघडच आहे हे सर्वांनाच माहीत होते; पण ज्या गोलंदाजांनी भारतीय संघाला पहिल्या कसोटीत अवघ्या ३६ धावांत गुंडाळले त्या गोलंदाजांसमोर निम्याहून अधिक संघ दुखापतग्रस्त असताना, रिषभ पंत (Rishabh Pant) व रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) हे फलंदाजी करू शकतील का, अशी शंका असताना आणि हनुमा विहारीलासुद्धा (Hanuma Vihari) दुखापत झाली असताना भारत हा सामना वाचवू तरी शकेल का, हा प्रश्न असताना भारतीय संघाने सामना वाचवून दाखवला. शेवटच्या दिवशी २ बाद ९८ वरून चिकाटीने खेळत ६ बाद ३१२ वर ऑस्ट्रेलियन्सना शेकहँड करण्यास भाग पाडले आणि पुन्हा एकदा भारतीय संघाला कमी लेखणारे तज्ज्ञ तोंडघशी पडले. मेलबोर्नपाठोपाठ सिडनीतही भारतीय संघानेच मने जिंकली.

चहापानाच्या आधी चेतेश्वर पुजारा (77) बाद झाल्यावर रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) व हनुमा विहारी यांनी ज्या पद्धतीने शेवटचे सत्र खेळून काढले. त्याचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. विशेषतः हनुमा विहारीचे कारण पायाची नडगी दुखावल्यावर धावणे अवघड होत असतानाही ज्या जिद्दीने तो पाय रोवून उभा राहिला त्याला सॅल्यूट ! आणि त्याला सांभाळून घेत किल्ला लढविणाऱ्या रविचंद्रन अश्विननेही तो किती चतुर खेळाडू आहे हे दाखवून दिले. त्याने विहारीला जास्तीत जास्त जलद गोलंदाजांविरुद्ध खेळवले आणि अश्विन फिरकीला सामोरा गेला जेणेकरून फिरकी खेळण्यासाठी फलंदाजाला जी काही जादा हालचाल करावी लागते, पदलालित्य दाखवावे लागते ते विहारीला करावे लागू नये आणि त्याचे हॕमस्ट्रिंगचे (नडगी) दुखणे अधिक बळावू नये. या चतुराईनेच ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचे डाव हाणून पाडले.

अश्विनने १२८ चेंडूंत फक्त ३९ (स्ट्राईक रेट ३०.४७) आणि विहारीने तर १६१ चेंडूंत फक्त २३ (स्ट्राईक रेट १४.२९ ) धावा केल्या. पण या धावांचे मोल किती तरी शतकी खेळींपेक्षाही अधिक आहे.

त्याआधी सकाळी जेव्हा रिषभ पंत (९७) व चेतेश्वर पुजारा (७७) खेळपट्टीवर होते तेव्हा तर काही काळ भारत हा सामना जिंकूसुद्धा शकतो असे वाटत होते; पण पंत व पुजारा काही अंतरातच बाद झाल्यावर ऑस्ट्रेलियाने सामन्यात मुसंडी मारली होती आणि आपण सामना वाचवू शकू का, हा प्रश्न पडला होता; पण अश्विन व विहारीच्या नाबाद भागीदारीने तेसुद्धा शक्य करून दाखवले.

त्याआधी पुजारा व कोपराच्या दुखण्यातही खेळणाऱ्या पंतने आपल्या टिकाकारांना प्रशंसा करण्यास भाग पाडणारा खेळ केला. दोघांनी पहिल्या सत्रात ऑस्ट्रेलियन गोलंदाजांची अजिबात डाळ शिजू दिली नाही.

ऑस्ट्रेलियन कर्णधार टीम पेनने खरं तर या अपयशाबद्दल स्वतःलाही दोष द्यायला हवा; कारण त्याने शेवटच्या दिवशी तीन झेल सोडले. दोन रिषभ पंतचे आणि एक हनुमा विहारीचा! ते टिपले असते तर काय झाले असते हे सांगायची गरजनाही.

एकूणच हा सामना कागदावर अनिर्णीत दिसणार असला तरी खेळाच्या कसबात भारतीय संघाने जिंकला आहे. काही दिवसांनी हा सामना नोंदींमध्ये अनिर्णीत दिसेल, अश्विन व विहारीच्या धावा कमी व फलंदाजी संथ दिसेल; पण ज्यांनी या सामन्याचा रोमांच अनुभवलाय त्यांना मात्र त्याचे खरे महत्त्व माहीत असेल. दिसते तसे नसते हेच ते येणाऱ्या पिढीला सांगतील.

ही बातमी पण वाचा : टीकेचे धनी पुजारा व पंत यांनी दोनच दिवसात टीकाकारांना बनवले प्रशंसक

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER