मीठ : न अति उपयुञ्जीत !

मीठ, जेवणाचा अविभाज्य भाग. उत्तमोत्तम मसाले वापरले, आवडणारा पदार्थ असला पण मीठ टाकण्यास विसरलो तर पाककृती अळणी. इतके महत्त्व चिमूटभर मिठाला. कृष्ण-रुक्मिणीची कथा सर्वांना माहिती आहे. रुक्मिणीच्या ‘मी किती प्रिय आहे?’ या प्रश्नावर कृष्णाने उत्तर दिले होते- स्वयंपाकातल्या मिठाएवढी ! असे हे अत्यावश्यक मीठ. सहा रसांपैकी लवणरस शरीराला आवश्यकच. कारण लवणरस न अति गुरु न अति स्निग्ध, दोषांना शरीराच्या बाहेर काढणारा, अन्नाला रुची आणणारा, अन्नाचे पाचन करणारा, अन्नाला आर्द्र करणारा (भाजी शिजविताना मीठ टाकल्यावर भाजीला पाणी सुटते हे आपण बघितले असेल.) आतड्यांमध्ये अन्नाला अधोमार्गी नेणारा, वातशामक, मलबद्धता कमी करणारा आहे. लाळस्राव वाढविणारा ( जिभेला लावल्यावर लाळ वाढते) असे अनेक गुण लवणरसाचे आयुर्वेदात आचार्यांनी सांगितले आहेत. म्हणजेच योग्य प्रमाणात घेतल्यास लवणरस खूपच आवश्यक.

आयुर्वेदसंहितेमध्ये काही गोष्टी जास्त प्रमाणात घेऊ नये असे सांगितले आहे; त्यात एक पदार्थ म्हणजे ‘मीठ’ आहे. इतके गुण असूनही मिठाचा वापर कमीच करायला सांगितला आहे. त्यामागील कारणे बघू या – अति मिठाचा सतत वापर ग्लानी आणणारा, उत्साह / काम करण्याची इच्छा कमी करणारा, मांसपेशींमध्ये शैथिल्य ( Looseness) आणणारा, रक्तधातुविकृती करणारा सांगितला आहे. पुंसत्व शक्ती कमी करणारा, पित्त वाढविणारा तसेच अकाली केस पांढरे होणे, अकाली केस गळून टक्कल पडणे, चेहऱ्यावर सुरकुत्या येणे, आम्लपित्त, त्वचाविकार, रक्तविकार करणारा आहे.

हे वाचून उच्चरक्तदाब किंवा त्वचाविकारात मीठ कमी करण्यामागचा उद्देश लक्षात येईल.

आपण मीठ किती घ्यावे ?

आहारात वरण, भाजी, कोशिंबीर, ताक इत्यादी पदार्थांत जेवढे मीठ चवीपुरते घालतो तेवढे प्रमाण पुरेसे आहे. परंतु आजकाल याव्यतिरिक्त वेफर्स, फरसाण, सॉस, लोणची यात टिकण्याकरिता अति प्रमाणात मिठाचा वापर करण्यात येतो, ज्यामुळे जेवणाव्यतिरिक्त जास्तीचे मीठ शरीरात जाते, जे हानीकारक आहे.

बऱ्याच जणांना जेवताना वरून मीठ घेतल्याशिवाय होत नाही. काही घरांत कणीक मळताना, भात शिजविताना मीठ घालण्याची सवय असते, जी चुकीची आहे. त्यामुळे अनावश्यक मिठाचा अतिवापर होतो. आपण भाजी, आमटीसोबतच भात, पोळी घेत असतो, ज्यात मीठ असतेच. त्यामुळे भात, पोळीत मीठ नसावे. काही व्यक्ती, लहान मूल पोळी-दूध खातात, जर कणीक मळताना मीठ घातलेले असेल तर दुधासह हा विरुद्धाहार आहे. अनेक आजार अशा आहाराने होऊ शकतात.

आयुर्वेदात पंचलवण म्हणजे पाच प्रकारचे मीठ सांगितले आहेत. सैंधव, पादेलोण, बीडलवण, सौर्वचल, सामुद्र लवण. यात सैंधव सर्वांत सौम्य असून याचा त्रास होत नाही. या पाचही मिठांचा वेगवेगळ्या कल्पांमध्ये वापर करण्यात येतो. सैंधव हृदयाला हितकर, त्रिदोषशामक व नेत्राला हितकर सांगितले आहे. त्यामुळे हृद् -रोगी, उच्चरक्तदाब असणाऱ्यांनी सैंधवाचा वापर करावा.

  • मिठाचा औषधी उपयोग खूप आहे.
  • मीठपाण्याच्या पट्ट्या कपाळावर ठेवल्याने ताप उतरतो.
  • गॅसेस झाले असतील किंवा पोट दुखत असेल तर सैंधव-ओवा एकत्र करून खाल्ल्यास पोटदुखी थांबते.
  • हळद-मीठ गरम पाण्यासह घेतल्यास खोकला कमी होतो.
  • हळद-मिठाच्या पाण्याने गुळण्या केल्याने घशातील कफ कमी होतो.
  • पूर्वी मिठाने दात घासायचे, आता आपल्यालाच विचारतात “आपके टूथपेस्ट में नमक हैं?”
  • अहो ताई, आमच्याकडे पूर्वापार हीच पद्धत होती.
  • असे हे उपयुक्त मीठ नक्की वापरावे; परंतु हात आखडता असावा.

ayurveda

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER