१३ मे रोजी रिलीज होणार सलमान खानचा ‘राधे- यूअर मोस्ट वाँटेड भाई’

Maharashtra Today

सलमान खानने (Salman Khan) गेल्या वर्षी ईदच्या दिवशी त्याचा नवा सिनेमा ‘राधे- यूअर मोस्ट वाँटेड भाई’ (Radhe – Your Most Wanted Bhai) रिलीज करण्याचा निर्णय घेतला होता. पण कोरोनामुळे हा सिनेमा पूर्ण होऊ शकला नाही आणि त्यामुळेच रिलीजही झाला नाही. लॉकडाऊन उठल्यानंतर मात्र सलमानने लगेचच राधेचे शूटिंग पूर्ण केले. पण थिएटर अजूनही पूर्ण क्षमतेने सुरु न झाल्याने सिनेमा रिलीज कधी होणार याची उत्सुकता त्याच्या फॅन्सना होती. मध्ये असे म्हटले जात होते की झी स्टुडियो हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर (OTT Platform)रिलीज केला जाणार आहे. ही बातमी बॉलिवूडमध्ये पसरल्यानंतर वितरक प्रचंड टेंशनमध्ये आले होते. याचे कारण म्हणजे सलमानचा सिनेमा म्हणजे बॉक्स ऑफिसवर यशाची हमखास खात्री. त्यामुळे देशभरातील वितरकांनी सलमान खानला एक पत्र पाठवून हा सिनेमा ओटीटीवर रिलीज न करता थिएटरमध्ये रिलीज कर अशी विनंती केली होती.

झी स्टुडियोने २३० कोटी रुपये खर्चून या सिनेमाचे सर्व अधिकार विकत घेतलेले आहेत. सिनेमा अगोदर विकत घेतलेला असल्याने झीचे पैसे अडकून पडलेले आहेत. त्यामुळे ओटीटीवर सिनेमा रिलीज करून काही पैसे वसूल करण्याचा विचार झी स्टुडियोने केला होता. पण सलमानने सिनेमा ईदला थिएटरमध्येच रिलीज करण्याचा निर्णय घेतल्याने त्याने झी स्टुडियोवाल्यांशी बोलणी करून उशिर झाला तरी चालेल पण सिनेमा थिएटरमध्येच रिलीज करूया असे सांगितले. झीनेही त्याचे म्हणणे ऐकले आणि त्याची मागणी मान्य केली. त्यानंतर सलमानने शनिवारी सोशल मीडियावर ‘राधे- यूअर मोस्ट वाँटेड भाई’चा पोस्टर शेअर करीत त्याच्या रिलीजची तारीखही जाहीर केली. एवढेच नव्हे तर सलमानने या पोस्टसोबत त्याने त्याचा एक अत्यंत लोकप्रिय आणि आवडता डायलॉगही शेअर केला आहे. सलमानने राधेचा नवा पोस्टर यानिमित्ताने प्रेक्षकांसमोर आणला आहे. या पोस्टरमध्ये सलमानने हातात बंदूक पकडली असून तो खालच्या बाजूला बघताना दिसत आहे. पोस्टरसोबत दबंग सिनेमातील डायलॉगची मदत घेत लिहिले आहे, ‘ईदची कमिटमेंट केली होती, ईदलाच येणार, कारण एकदा का मी ठरवले..’ यासोबत त्याने #RadheOn13thMay #2MonthsToRadhe हॅशटॅगचा वापरही केला आहे.

‘राधे- यूअर मोस्ट वाँटेड भाई’कडून बॉलिवूडच्या खूपच अपेक्षा आहेत. हा सिनेमा नक्कीच हिट होईल आणि गेल्या एक वर्षापासून अंधारात चाचपडत असलेल्या बॉलिवूडला दिशा मिळेल असे म्हटले जात आहे. सलमानच्या या सिनेमात दिशा पाटनी, रणदीप हुड्डा आणि जॅकी श्रॉफ यांच्याही महत्वाच्या भूमिका आहेत. झीसोबत सलमानची आई सलमा खान, सोहेल खान आणि रील लाइफ प्रॉडक्शन प्राइव्हेट लिमिटेडने या सिनेमाची निर्मिती केली आहे. सलमानने सिनेमाच्या रिलीजची तारीख जाहीर केल्याने आता या डेटच्या मागेपुढे दुसरे मोठे सिनेमे रिलीज केले जातील. जॉन अब्राहम मात्र सलमानच्या राधेला सत्यमेव जयते २ घेऊन येणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांना अॅक्शनचा डबल डोस मिळणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER