सलमान खान-जॉन अब्राहम आमने-सामने

Raddhe-Satymev jayate

बॉलिवूडला (Bollywood) हे वर्ष अत्यंत वाईट गेले. केवळ बॉलिवूडलाच नाही तर सर्वच क्षेत्राला हे वर्ष अत्यंत वाईट गेले आहे. लॉकडाऊनमुळे अनेक मोठ्या कलाकारांना आपले चित्रपट ठरलेल्या वेळेवर प्रदर्शित करता आले नाहीत. आताही चित्रपटगृहे सुरु झाली असली तरी प्रेक्षक येत नसल्याने अजूनही कलाकार आपले चित्रपट प्रदर्शित करण्यास तयार नाहीत. सगळ्यांना पुढच्या वर्षीचे वेध लागले असल्याने पुढच्या वर्षी चित्रपटांचा वर्षाव होणार आहे. अनेक कलाकार बॉक्स ऑफिसवर होणारा सामना टाळण्याचा प्रयत्न करतात. पण आता त्यांच्यापुढे एकत्र चित्रपट प्रदर्शित करण्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळेच पुढील वर्षी ईदला सलमान खानचा ‘राधे’ (Raadhe) प्रदर्शित केला जाणार आहे तर जॉन अब्राहमही त्याचा बहुचर्चित ‘सत्यमेव जयते 2’ (Satyamev Jayate 2) ईदला प्रदर्शित करणार आहे. जॉनचा सत्यमेव जयते अक्षयकुमारच्या ‘गोल्ड’सोबत प्रदर्शित झाला होता. आणि दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट झाले होते.

सध्या ‘सत्यमेव जयते 2’ चे शूटिंग लखनौमध्ये सुरु आहे. जॉन अब्राहम आणि दिव्या खोसला कुमार अभिनीत या चित्रपटाबाबत प्रेक्षकांना खूपच उत्सुकता आहे. चित्रपटाच्या सेटवरील जॉनचा पोलीस इन्स्पेक्टरच्या गेटअपमधील फोटोही चांगलाच व्हायरल झाला आहे. हा चित्रपट पुढील वर्षी ईदच्या दिवशी म्हणजे 12 मे रोजी प्रदर्शित करण्यात येणार आहे. याच दिवशी सलमान खाननेही त्याचा राधे प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे. खरे तर सलमानने राधे दिवाळीला प्रदर्शित करण्याचे ठरवले होते. परंतु प्रेक्षक येत नसल्याने त्याने आणखी सहा महिने थांबण्याचा निर्णय घेतला आहे. सलमान खान ईदला आपला चित्रपट प्रदर्शित करीत असतो. परंतु राधेशिवाय त्याचा दुसरा कोणताही चित्रपट तयार नसल्याने आणि नवा चित्रपट तोपर्यंत तयार होणार नसल्याने त्याने राधेसाठी ईदचा मुहुर्त शोधल्याचे सांगितले जात आहे. सलमान खान स्वतःच या नव्या तारखेची घोषणा करणार असल्याचेही सांगितले जात आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER