सायली बांधणार बस्ता

Sayli Sanjeev

सध्या खरेदी म्हणजे शॉपिंग हा शब्द रूढ झाला आहे . पण लग्नाच्या खरेदीला एक खास शब्द आहे आणि तो म्हणजे बस्ता. बस्ता बांधायला चला असं म्हटलं की ओळखावं त्या घरात लवकरच सनई-चौघडे वाजणार आहेत. अभिनेत्री सायली संजीव हिने सोशल मीडिया पेजवर बस्ता बांधणार असं म्हणत वधू वेशातला फोटो शेअर केल्यामुळे तिच्या चाहत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. पण खऱ्या आयुष्यात ती बस्ता बांधणार नसून बस्ता नावाचा नावाचा सिनेमा घेऊन लवकरच चाहत्यांच्या भेटीला येणार आहे.

बस्ता या नावातच या सिनेमाची वनलाईन स्टोरी लक्षात येते. लग्नाच्या निमित्ताने काही लगबग घराघरात सुरू असते त्यातला सगळ्यात महत्त्वाचा भाग असतो तो म्हणजे लग्नासाठी साड्या खरेदी आणि मानापानाचे कपडे खरेदी. लग्नाच्या हळदीपासून ते विडे सीमांतपूजन, अक्षता, पूजा यासाठी नवरीला खास वेगवेगळ्या रंगाच्या साड्या घेतल्या जातात. यासोबत नवऱ्यासाठी उपरणं सासरच्या लोकांना मानपानाच्या आहेराचे कपडे हे सगळ्या लग्नाच्या बस्त्यांमध्ये असते. त्यामुळे सहाजिकच लग्नाचा बस्ता एकूणच लग्नाच्या सगळ्या धामधुमीत महत्त्वाचा आणि उत्सुकतेचा विषय असतो. याच विषयावर सायली संजीव नववधूच्या रूपात पाहायला मिळणार आहे. या सिनेमाचं नाव बस्ता असलं तरी या सगळ्या बस्त्याच्या खरेदीसाठी मुलीच्या वडिलांची आर्थिक जुळवाजुळव सुरू असते. सहाजिकच या सिनेमात नवरी मुलीच्या शेतकरी वडिलांनी भावनिक गुंतवणूकदेखील दिसणार आहे.

सायली सांगते की मी आजीकडून आणि आईकडून बस्ता हा शब्द अनेकदा ऐकला होता. या बस्त्यांमध्ये फक्त नवरी मुलीच्या साड्या खरेदी केल्या जात नाही तर सासू-सासरे , दीर, नणंद यांच्या आहेराचे कपडे देखील खरेदी केले जात असतात. त्यामुळे हे प्रकरण तसं खूप भावनिक असतं.

बस्ता खरेदीच्या निमित्ताने मुलीकडच्यांनादेखील अनेक अनुभव येत असतात. बस्त्यातील कपडे जर मुलीच्या सासरच्या लोकांना आवडले नाही तर त्यातूनही रुसवा धरला जात असतो. अशा अनेक छोट्या छोट्या गोष्टींशी बस्त्याचे नाव जोडले गेले आहे. त्यामुळे हा सिनेमा करताना खूप लग्न संस्कृतीमधल्या खूप वेगळ्या अनुभवाच्या छटा अनुभवता आल्या.

सध्या सायली संजीव शुभमंगल ऑनलाइन या मालिकेत शर्वरीची भूमिका करत आहे. शुभमंगल ऑनलाइन ही सध्याच्या काळातील तरुण लग्नाबाबत काय विचार करतात आणि त्यांच्या डोळ्यासमोर लग्न सोहळ्याच्या काय कल्पना आहेत यावर बेतलेली आहे. पण बस्ता या सिनेमात सायली पारंपारिक लग्नविधीचे दर्शन घडवणार आहे. त्यामुळे एकाच वेळी अशा दोन वेगवेगळ्या कलाकृतींमधून स्वतःच्या अभिनयाची चुणूक दाखवणे हे सायलीसाठी नक्कीच एक वेगळेच चॅलेंज आहे.
काहे दिया परदेस ही सायलीने केलेली यापूर्वीची मालिका. यामध्येदेखील तिने हिंदीभाषिक तरुण आणि मराठी भाषिक मुलगी यांचे लग्न झाले तर त्यांना कोणत्या समस्यांना तोंड द्यावं लागतं याविषयी तिच्या अभिनयातून भाष्य केलं होतं.

बस्ता हा सायलीचा सिनेमा 29 जानेवारीला ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. या सिनेमासाठी ती विशेष उत्सुक आहे. सध्याच्या काळामध्ये बस्ता या नावाचा अर्थ फारसा कोणाला माहित नाही, पण लग्नाची कितीही तयारी झाली किंवा लग्न सोहळ्याचे स्वरूप कसेही असले तरी पूर्वीच्या काळी या बस्ता खरेदी पासूनच लग्नाच्या वातावरणाला सुरुवात व्हायची आणि त्यातील प्रत्येक साडी असेल किंवा आहेरचा पेहराव असेल, बस्ता खरेदी करायला जाणं हादेखील एक सोहळा असायचा. त्यामुळे लग्नातील एक हरवत चाललेली गोष्ट या सिनेमाच्या निमित्ताने पुन्हा अधोरेखित होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER