सलाम वैशाली

Vaishali Sudhakar Yede

Moreshwar Badgeयवतमाळच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजकांनी इंग्रजीतील जागतिक कीर्तीच्या लेखिका नयनतारा सहगल यांना ‘येऊ नका’ म्हणून सांगितले ते योग्यच झाले असे म्हणावे लागेल. नयनतारा यांच्या जागी त्यांनी आता जिची निवड केली त्यामुळे आयोजकांना आधीचे गुन्हे माफ करावे असे म्हणता येईल. संमेलन उधळण्याचा भीतीने आयोजकांनी नयनतारा यांना नाही म्हटले आणि साहित्याच्या जगात भूकंप झाला. पण या पडझडीतून आज जे उभे राहिलेले पहायला मिळत आहे ते स्वागतार्ह आहे. हे ९२ वे संमेलन आहे. आतापर्यंतची ९१ संमेलने हवेत तरंगत गेली. प्रथमच कुठले संमेलन जमिनीवर आले असून सामान्य माणसाच्या जगण्या-मरण्याच्या संघर्षाचा विचार करायला संधी मिळाली आहे.

या संमेलनाची उद्घाटक कुणी नोबेल विजेता-विजेती नाही, कुणी पुढारीही नाही. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याची विधवा वैशाली सुधाकर येडे हिने या संमेलनाचे उद्घाटन केले. एव्हढा योग्य उद्घाटक दुसरा कुणी नसता. यवतमाळ जिल्हा शेतकरी आत्महत्यांसाठी कुप्रसिद्ध आहे. दोन-दोन मुख्यमंत्री देणाऱ्या या जिल्ह्यात राज्यातल्या सर्वाधिक आत्महत्या होतात. गेली कित्येक वर्षे आत्महत्यांचे सत्र सुरु आहे. क्रिकेटच्या स्कोअरप्रमाणे. याच कारणाने काँग्रेस सरकारला जावे लागले. पण त्या जागी आलेल्या सत्तेतही तेच सुरु आहे. नवऱ्याने जगाचा निरोप घेतल्यानंतर उघड्यावर आलेल्या ग्रामीण विधवांचा जगण्याचा संघर्ष वैशालीच्या निमित्ताने पुढे आला आहे.

कोण आहे ही वैशाली? २८ वर्षाची वैशाली कळंब तालुक्यातील राजुरची. १० वर्षांपूर्वी तिने सुखी संसाराचे एक स्वप्न पहिले होते. नवऱ्याची अवघी तीन एकर शेती. दोनच वर्षात नवऱ्याने आत्महत्या केली. पण म्हणून वैशालीने हार मानली नाही. बारावी पास वैशालीने अंगणवाडीत नोकरी करताना आपल्यासारख्या विधवांची संघटना बांधायला सुरुवात केली. दोन मुलांना ती वाढवते आहे. ज्येष्ठ पत्रकार श्याम पेटकर, दिग्दर्शक हरीश इथापे यांनी वैशालीचा जीवनाचा संघर्ष तिला घेऊन ‘तेरवं’ या नाटकातून जगापुढे आणला. आज ती एका नव्याच व्यासपीठापुढे आली. ‘रडू नका. सामना करा’ असे ती म्हणाली तेव्हा साऱ्या संमेलनाला गलबलून आले. ती पट्टीची वक्ता नसेल. पण तिचे शब्द हेच बावनकशी साहित्य आहे.

असे ओरिजिनल सेलिब्रिटी पाहुणे म्हणून आले तरच संमेलनं सार्थकी लागतील. अनेक साहित्यिकांच्या लेखण्या यातून फुलतील आणि ‘जोंधळ्याला चांदणे फुटेल.’ आपल्या राज्यात दररोज कुठे ना कुठे शेतकरी आत्महत्या करतात. यातली एकही आत्महत्या कमी झाली तर यवतमाळची तीन दिवसांची साहित्यिक सर्कस यशस्वी लागली असे म्हणता येईल.

मोरेश्वर बडगे
लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत.