सखीने गोंदली शाळेची आठवण

Sakhi Gokhale

ही माझी शाळा आहे. मी बोर्डिंग स्कूलमध्ये राहून शिक्षण पूर्ण केलंय. माझी शाळा निसर्गाच्या सानिध्यात होती. एका टेकडीवर असलेल्या या शाळेच्या पायथ्याला वाहणारी नदी आणि भोवताली डोंगरदऱ्या होते. जेव्हा या शाळेतील शिक्षण पूर्ण झाले तेव्हा आम्ही तिघी मैत्रिणींनी शाळेची आठवण आयुष्यभर जपायचे ठरवले असं म्हणत अभिनेत्री सखी गोखले (Sakhi Gokhale) जेव्हा तिचा हात पुढे करून तिची शाळा दाखवते तेव्हा पाहणारे अचंबित होतात. कारण सखीची शाळा प्रतिकात्मक रूपाने तिच्या हातावर गोंदलेली आहे. शाळेचे प्रतीक म्हणून डोंगर, नदी झाडं असा प्रतिकात्मक टॅटू सखीने हातावर काढला आहे. तो टॅटू पाहिला की ती थेट शाळेत पोहोचते आणि रमतेही.

पूर्वीचे गोंदण आता टॅटू बनून स्टाइल स्टेटमेंट झाले आहे. अनेकांना टॅटूचे आकर्षण वाटते. टॅटूची क्रेझ वाढत असल्याने यामध्ये नवनवीन ट्रेंडही आले आहेत. एखाद्या कलाकाराने त्याच्या शरीरावर कोणता टॅटू काढला आहे याची उत्सुकता त्यांच्या चाहत्यांना नेहमीच लागून राहिलेली असते. टॅटूचे प्रचंड वेड असलेल्या कलाकारांच्या यादीत अभिनेत्री सखी गोखलेसुद्धा आहे आणि तिने तिच्या शाळेची आठवण हातावर गोंदवली आहे. ज्येष्ठ अभिनेते मोहन आणि अभिनेत्री शुभांगी गोखले यांची सखी ही मुलगी. तिच्या लहानपणापासूनच घरात सिनेमा, नाटक याविषयीचे वातावरण होते. मोहन गोखले यांनी मोजक्या पण दर्जेदार भूमिका करून नाव कमावले होते. ते लेखक व उत्तम वाचक होते. सखी जेमतेम सहा वर्षाची असताना तिचे पितृछत्र हरपले आणि त्यानंतर शुभांगी गोखले यांनीच तिला लहानाचे मोठे केले. घराची, सखीची जबाबदारी पेलायची असल्याने शुभांगी यांना अभिनयक्षेत्रात कार्यरत राहणे आवश्यक होते. त्यामुळे सखीची रवानगी बोर्डिंगस्कूलमध्ये झाली. शाळेचा आवार, वसतिगृह हेच सखीचे दुसरे घर बनले. आपल्याला आईने बोर्डिंगस्कूलमध्ये का ठेवले आहे याची जाणीव सखीला होती त्यामुळे सखीदेखील लगेच नवी शाळा, हॉस्टेल यासोबत एकरूप झाली. त्यामुळेच जेव्हा तिचे शालेय शिक्षण संपले आणि ती रूपारेल कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यासाठी मुंबईला आली. पण त्यापूर्वी सखी बँकॉकला फिरायला गेली होती.

तिथे मैत्रिणीसोबत शाळेविषयीच्या आठवणी गप्पांमध्ये सुरू होत्या. तेव्हाच दोघींनी ठरवलं की आपल्या शाळेची आठवण आपल्यासोबत असायला हवी. शाळा म्हटलं की आपल्याला काय काय आठवतं यावर सखी आणि तिची मैत्रीण बोलत असताना जिथे शाळेची इमारत होती ती टेकडी, आजूबाजूचे डोंगर, दऱ्या, नदी, झाडं, पक्षी असं सगळं सखीच्या डोळ्यासमोर आलं. आता एका टॅटूमध्ये हे सगळं निसर्गचित्र दाखवायचं तर ते सिंबॉलिक असायला हवं. मग काय, सखी आणि तिची सखी अर्थात शाळेतली मैत्रीण दोघींनीही बँकॉकमधल्या मार्केटमध्ये टॅटू काढणाऱ्या कलाकारांचा शोध घेतला. अखेर त्यांना एक टॅटू आर्टिस्ट सापडला. आम्हाला अस्साच टॅटू हवा असा आग्रह धरत या सखीने त्या आर्टिस्टचा पिच्छा पुरवला आणि स्वत:सोबत मैत्रीणीच्या हातावर सेम टू सेम टॅटू काढताना सखी शाळेत मनोमन फिरून आली. सखी सांगते माझ्या आयुष्यातील खूप मोठा काळ या शाळेच्या परिसरात गेला आहे. आई त्यावेळी कामात खूप बिझी होती. मला घरी ठेवून कामासाठी बाहेर जाणे तिला शक्य नव्हते. त्यामुळे या शाळा आणि हॉस्टेलमध्ये माझ्या आयुष्यातील खूप संवेदनशील क्षण आहेत.

सखी खूपच टॅटू फॅन आहे. सखीच्या शरीरावर सध्या चार टॅटू आहेत ज्यामध्ये काही ना काही विचार तिने कोरला आहे. माझ्या शरीरावर टॅटूची संख्या वाढत राहो असं म्हणत तिला अजून खूप टॅटू काढायचे आहेत. सखीच्या दंडावर फुलपाखराचा टॅटू आहे आणि आयुष्य हे फुलपाखरासारखं जगता आलं पाहिजे असं सांगणारा हा टॅटू असल्याचं सखी सांगते. सखी आणि तिची आई शुभांगी यांचं नातं खूप जवळचं आहे. सखीच्या शब्दात सांगायचं तर आई शुभांगी ही तिची ताकद, प्रेरणा आहे. म्हणून टॅटूच्या रूपात आईचं नाव कोरण्यासाठी सखीने मनगटाची निवड केली आहे. गोव्याला फिरायला गेली असताना सखीने तिच्या मानेवर एक टॅटू काढला आहे जो उडणारे पक्षी आहेत. आयुष्यात नेहमी झेप घेण्याचे स्वप्न पहा असं तिला या टॅटूमधून सांगायचे आहे.

दिल दोस्ती दुनियादारी, दिल दोस्ती दुनियादारी दोबारा या मालिका, अमर फोटो स्टुडिओ हे नाटक, पिंपळ हा सिनेमा अशी मोजकी पण नेटकी कामं सखीच्या नावावर आहेत. दिल दोस्ती दुनियादारी या मालिकेतील तिचा सहकलाकार सुव्रत जोशी याच्यासोबत लग्न करून सखी सध्या लंडनमध्ये तिचे उच्चशिक्षण पूर्ण करत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER