मराठा आरक्षण : अजित पवारांच्या घरासमोर ‘ढोल बजाव’ आंदोलन

Ajit Pawar-Dhol Bajao

बारामती : काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयानं मराठा आरक्षणाला (Maratha Reservation) अंतरिम स्थगिती दिली. त्यानंतर मराठा समाजानं  आक्रमक भूमिका घेतली आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी सरकारनं न्यायालयात योग्य बाजू मांडावी. तसेच अन्य मागण्यांसाठी राज्य सरकारमधील मंत्र्यांच्या घरासमोर ‘ढोल बजाव’ (Dhol Bajao) आंदोलन सुरू करण्यात आलं आहे. आज सकल मराठा मोर्च्याच्या कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit pawar) यांच्या बारामतीतील घरासमोर ढोल वाजवून आंदोलन केलं.

बारामतीतील सहयोग सोसायटी येथील निवासस्थानासमोर हे आंदोलन करण्यात आलं. आंदोलनाच्या वेळी उपमुख्यमंत्री अजित पवार हे घरी नव्हते. सध्याच्या आरक्षणाला स्थगिती दिल्यामुळे मराठा समाजाचे विद्यार्थी व बेरोजगार तरुणांची चिंता वाढली आहे. राज्य सरकारनं यातून योग्य मार्ग काढावा. आरक्षणाचा प्रश्न सुटेपर्यंत मराठा समाजाला विविध प्रकारचे लाभ दिले जावेत. तसंच, आरक्षणाची आधीच सुरू झालेली प्रक्रिया बंद करू नये. त्यासाठी अध्यादेश काढावा. राज्यात कुठलीही नवी नोकर भरती केली जाऊ नये, अशा मराठा संघटनांच्या मागण्या आहेत.

या मागण्यांवर सरकारनं तातडीनं निर्णय घ्यावा, अशी मराठा संघटनांची अपेक्षा आहे. त्यासाठी मंत्र्यांच्या घरासमोर आंदोलन सुरू करण्यात आलं आहे. दरम्यान, मराठा समाजाकडून आंदोलन केले जात असताना आता धनगर समाजही रस्त्यावर उतरला आहे. धनगर संघटनांनीही ‘ढोल बजाव’ आंदोलन सुरू केलं आहे. आरक्षणाचा प्रश्न न सुटल्यास मंत्र्यांना राज्यात फिरू न देण्याचा इशाराही धनगर समाजाच्या नेत्यांनी दिला आहे. काल धनगर समाजाचे नेते आणि आमदार गोपीचंद पडळकर यांनी पंढरपुरात ‘ढोल बजाव’ आंदोलन केले. सरकारने धनगर आरक्षणाबाबत पावले उचलली नाही तर शरद पवार यांच्या घरासमोर आंदोलन करण्याचा इशारा पडळकर यांनी दिला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER