सईचा नवा ब्रँड

sai tamhankar

गेल्याच आठवड्यातील सई ताम्हणकरच्या इन्स्टा पेजवर पोस्ट होती की, मी लवकरच येतेय…एका नव्या रूपात. सईचे चाहते कित्ती म्हणून खूश झाले होते. कॉमेडी शोमध्ये सईला हसताना पाहणं आणि तिला पडद्यावर अभिनय करताना पाहणं यात फरक आहे ना बॉस. त्यामुळेच सईच्या अभिनयावर फिदा असलेल्या तिच्या चाहत्यांनी प्राण अगदी डोळ्यात आणले. पण सईचं हे नवं रूप म्हणजे कोणत्याही सिनेमातील भूमिका नाहीय तर ती आता साडीचा नवा ब्रँड घेऊन बाजारपेठेत अवतरणार आहे. एखाद्या गोष्टीची उत्सुकता निर्माण करायची आणि थोडीतरी ताणवून ती सांगायची यात सेलिब्रिटींचा हात कोण धरणार बरे. तर मुद्दा असा आहे की सई ‘द सारी स्टोरी’ या नावाने डिझायनर साडीचा ब्रँड सुरू करत आहे. तिची बालमैत्रीण श्रुती भोसले हिच्यासोबत ती हे नवे साडीलेबल लाँच करणार आहे.

सई म्हणजे नेहमीच नवनवे फॅशन फंडे असे समीकरण आहे. मराठी इंडस्ट्रीत बोल्ड आणि स्टायलीश अभिनेत्रींच्या पंक्तीत सईचं नाव घेतल जातच. तिचा फॅशनसेन्सही उत्तम आहे. सई जितकी मॉडर्न लूकमध्ये बिनधास्त दिसते तितकीच ती साडीतही खुलते. शशी देवधर सिनेमातला तिचा साडीतला लूक आठवून बघा. दुनियादारीमध्येही वाढदिवशी ग्रे साडीतली शिरीन कोण विसरेल. साडी खरेदी करतानाही सई स्वत: खूप चोखंदळ आहे.

या नव्या ब्रँड आणि इनिंगबद्दल सई सांगते, मुळात एक साडी घेण्यासाठी किमान दहा दुकानं पालथी घालणाऱ्या महिलांना मनात भरणारी साडी हवी असते. सध्या साडीमध्ये खूप कल्पकता आली आहे. शिवाय महिलांच्या बाबतीत प्रत्येक साडी तिच्या भावनांशी जोडलेली असते. ही माझ्या आईने दिलेली, ही माझ्या वडिलांनी पहिल्यांदा आणलेली, आजीच्या ठेवणीतली, मामाकडून मिळालेली, आवडली म्हणून हट्ट करून आत्याकडून घेतलेली, लग्नानंतर नवऱ्याने पहिल्यांदा खास माझ्यासाठी खरेदी केलेली, सासूबाईंनी त्यांच्या सासूबाईंची आठवण जपण्यासाठी दिलेली अशा कित्येक साड्यांमध्ये आपल्या आठवणींच्या घड्या असतात. थोडक्यात काय तर प्रत्येक साडीसोबत आपली एक गोष्ट असते. हेच नाव आपल्या ब्रँडला का असू नये असा विचार करून सईने ही द सारी स्टोरी आणली आहे.

सध्या अनेक अभिनेत्री या अभिनयासोबत अशा एखाद्या आवडीच्या बिझनेसमध्ये सक्रिय झालेल्या आहेत. प्रिया बापट हिनेही तिची बहिण श्वेता हिच्यासोबत सावेंची हा साडीचा नवा ब्रँड सुरू केला आहे. निवेदिता सराफ यांचा हंसगामिनी हा साडीब्रँडही लोकप्रिय आहे. रात्रीस खेळ चाले शेवंता फेम अपूर्वा नेमळेकरच्या अपूर्वा कलेक्शन या ब्रँडनेही नाव कमावले आहे. तेजस्विनी पंडित आणि अभिज्ञा भावे यांचा एकत्रित तेजाज्ञा हा साड्यांचा ब्रँड खण फॅब्रिकमध्ये खूप नाविन्यपूर्ण काम करत आहे. साडीविषयी असलेल्या प्रेमातून आणि जरा हटके साड्यांचे वेड असलेल्या साडीप्रेमींसाठी सई साड्या डिझाइन करणार आहे.

सई आणि तिची मैत्रीण श्रुती यांना नेहमी वाटत होतं की दोघींनी मिळून काहीतरी सुरू करावं. या दोघी जेव्हा जेव्हा भेटतील तेव्हा काय करता येईल याबद्दल बोलायच्या. पण दरवेळी फक्त गप्पाच व्हायच्या. सई तिच्या सिनेमांच्या तारखांमध्ये बिझी व्हायची तर श्रुती तिच्या व्यापात. धुरळा यासिनेमाच्या शूटिंगपासून रिलीजपर्यंतच्या धावपळीचा धुरळा खाली बसल्यानंतर सईनेच या नव्या कामाला सुरूवात करण्यासाठी पुढाकार घेतला. त्यासाठी गेल्या काही दिवसांपासून सई या नव्या साडी ब्रँडच्या नियोजनात व्यस्त होती. द सारी स्टोरी या लेबलखाली लाँच होणाऱ्या या साड्या वेगळ्या तर असणार आहेतच पण त्या त्या साडीच्या डिझाइनची खास स्टोरीही असेल असं सई सांगते.

अभिनेत्री म्हणून सईच्या लोकप्रियतेला तोड नाही. रिअॅलिटी शोची परीक्षक, निवेदक म्हणूनही सई ऑल टाइम फेव्हरेट असते. आता साडीचा नवा ब्रँड घेऊन दाखल होणाऱ्या सईच्या साड्यांवर सेलिब्रिटींपासून सर्वसामान्य महिलांच्या किती उड्या पडतात ते तिच्या सोशल मीडिया पेजवर ती सांगेल यात शंकाच नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER