खलाशांचा तरुणावर वार; मोबाईल पळवला

रत्नागिरी/प्रतिनिधी : तरुणावर धारदार शस्त्राने वार करत चार खलाशानी त्याच्याकडील मोबाईल जबरदस्तीने पळवल्याची घटना मिरकरवाडा जेटीवर घडली. हल्ला करुन पसार झालेल्या या खलाशांना पोलिसांनी तत्परतेने पकडले. आरोपींना न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

महंमद तारीक अहमद कोतवडेकर (२९) रा. अल्‌हम्म पार्क मांडवी, हा तरुण घरी जेवण करुन रात्रीच्या वेळी आपली नॅनो घेऊन मिरकरवाडा येथील खडप मोहल्ला येथे गेला होता. तेथे त्याने गाडी उभी केली. कोतवडेकर याचा मित्र तनवीर मुझफ्फर पांजरी व त्याचे दोन मित्र हे कोतवडेकर येण्यापूर्वीच ब्रेक वॉटर वॉलवर गप्पा मारत बसले होते.

कोतवडेकर पुढे गेला असता त्याला मित्र इब्राहिम याचा कॉल आला. मोबाईलवर बोलत बोलत तो पुढे आला असता पाठीमागून चार खलाशी येत असल्याचे त्याला दिसले. त्यांने बाजूला होऊन खलाशांना पुढे जाण्यासाठी वाट दिली. त्याचवेळी दोन खलाशी कोतवडे याच्या पुढ्यात येऊन उभे राहिले व त्यातील एकाने कोतवडेकर याच्या हातातील मोबाईल ओढून घेतला. त्याचवेळी अन्य एका खलाशाने धारदार शस्त्राने कोतवडेकरच्या हातावर वार करुन त्याला ढकलून देत तेथून पळ काढला.

वार करुन खलाशी पळाल्यानंतर कोतवडेकर याने आरडाओरड करत त्यांचा पाठलाग केला. त्याचवेळी अन्य मच्छिमार देखील त्या खलाशांना पकडण्यासाठी धावत सुटले. मात्र ते खलाशी काही क्षणात तेथून बेपत्ता झाले. महंमद कोतवडेकर याला जखमी अवस्थेत जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

तरुणावर वार करुन चार खलाशी बेपत्ता झाल्यानंतर शहर पोलिसांनी रेल्वे स्टेशनसह मिरकरवाडा जेटीवर शोधमोहीम सुरु केली. डिवायएसपी गणेश इंगळे, पो.नि. अनिल लाड, एपीआय भोसले, पीएसआय अमोल अनभुले, यांच्यासह पो.हे.कॉं. दिपक जाधव, राहुल घोरपडे, प्रविण खांबे, प्रविण बर्गे यांच्यासह नाईट राऊंडसाठी असलेल्या पोलीस कर्मचार्‍यांनी शोधमोहीम सुरु केली.

मिरकरवाडा जेटीवर वार झाल्याची वार्ता समजताच अनेक मच्छिमारांनी जेटीकडे धाव घेतली. त्याचवेळी पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाले होते. मध्यरात्री एका खलाशाला पोलिसांनी जेरबंद केले तर अन्य तीन खलाशी बेपत्ता झाले होते. रात्रभर शहर पोलिसांचे एक पथक रेल्वे स्थानकात बेपत्ता खलाशांचा माग काढत होते. गुरुवारी सकाळी त्यातील बेपत्ता झालेले तीन खलाशी दबा धरुन बसलेले असतानाच मिरकरवाडा बंदरातून त्यांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले.

या प्रकरणी महंमद तारीक अहमद कोतवडेकर यांने शहर पोलीस स्थानकात तक्रार दिली होती. या तक्रारीवरुन पोलिसांनी गंगाराम रामजीवन थारु, सुरेश, विष्णू, सागर (पूर्ण नाव माहीत नाही) यांच्या विरोधात भा.दं.वि.क. ३९७, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या चौघांना गुरुवारी न्यायालयात हजर केले असता त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.