
ओटीटी प्लॅटफॉर्मची ताकद ओळखून सैफ अलीने (Saif Ali Khan) सेक्रेड गेम्स (Sacred Games) या वेब सीरीजमध्ये काम केले होते. सैफची ही वेब सीरीज प्रचंड लोकप्रिय झाली होती. ओटीटी प्लॅटफॉर्मवर काम करीत असतानाच सैफने सिनेमेही करण्याचे काम सुरु ठेवले आहे. सध्या त्याचे तीन ते चार चित्रपट निर्मिती अवस्थेत असून ते पुढील वर्षी प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. यासोबतच सैफ आता पुन्हा एकदा एका वेबसीरीजमध्ये दिसणार आहे. या वेबसीरीजचे नाव तांडव ठेवण्यात आले असून याचा पहिला टीजर नुकताच रिलीज करण्यात आला. या टीजरमधील एका डायलॉगमुळे वाद निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
हिमांशु किशन मेहरा आणि अली अब्बास जफर यांनी ‘तांडव’ची (Tandav) निर्मिती केली असून दिग्दर्शनही अली अब्बासनेच केले आहे. अली अब्बासने यापूर्वी ‘झूम बराबर झूम’, ‘गुंडे’, ‘सुलतान’, ‘टायगर जिंदा है’, ‘भारत’ या सिनेमाचे दिग्दर्शन केलेले आहे. ओटीटीसाठी दिग्दर्शन करण्याचा त्याचा हा पहिलाच प्रयत्न आहे. यात उत्तर प्रदेशमधील राजकारणाचे चित्रण करण्यात आलेले आहे. सुरुवातीला या वेबसीरीजचे नाव ‘तांडव’ ठेवण्यात आले होते. परंतु शूटिंग सुरु झाली तेव्हा ‘दिल्ली’ नाव ठेवण्यात आले. परंतु आता पुन्हा मूळ नाव म्हणजेच ‘तांडव’ हे नाव कायम ठेवण्यात आलेले आहे.
अमेरिकेतील प्रचंड यशस्वी झालेल्या ‘हाऊस ऑफ कार्डस’ या वेबसीरीजवर आधारित ‘तांडव’ ही वेबसीरीज आहे. ‘तांडव’मध्ये सैफ अली यात एका राजकीय नेत्याची भूमिका साकारीत आहे. तसेच डिंपल कपाडिया आणि सुनील ग्रोव्हर यांच्याही महत्वाच्या भूमिका आहेत. टीजरमध्ये राजकीय रॅली दाखवली असून एक डायलॉग ऐकायला येतो. हा डायलॉग आहे ‘इस देश में जो प्रधानमंत्री है, वही राजा है।’ या डायलॉगवरून हंगामा होऊ शकतो. नऊ भाषांमध्ये डब करून ही वेबसीरीज दाखवली जाणार आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला