सईचा शंखनाद

sai lokur

लग्न ठरल्यापासून ते लोकूरांच्या घराचा उंबरठा ओलांडून रॉयघरचे माप ओलांडून बंगाली बहू झालेली अभिनेत्री सई लोकूर  (sai lokur) सध्या खूपच आनंदात आहे. तीर्थदीप रॉय भेटल्यापासून ते अगदी त्याच्यासोबत कोलकात्यात भटकंती करण्यापर्यंतचे अगणित फोटो आणि व्हिडिओ शेअर करत सईने तिच्या चाहत्यांसमोर तिचं आयुष्य अगदी ओपनबुक करून ठेवलं आहे. सध्या सईचा मुक्काम तिच्या कोलकत्यातील सासरघरी आहे. नुकताच तिनं एक नवा व्हिडिओ शेअर केला ज्यामध्ये ती बंगालच्या प्रथेनुसार शंख वाजवायला शिकली आहे. खास पांढऱ्या रंगाच्या बंगाली साडीत नटून, भांगात कुंकू भरून आणि पदराला किल्ल्यांचा जुडगा लावून बेळगावकर सई ठसक्यात शंखनाद करताना दिसत आहे. तिच्या या नव्या रूपाला तिच्या चाहत्यांनी भरभरून दाद दिली आहे.

दिग्दर्शिक वीणा लोकूर यांची मुलगी असल्याने सई अभिनयातच करिअर करणार हे नक्की होते. नटीचे लग्न हा नेहमीच प्रेक्षकांसाठी, तिच्या चाहत्यांसाठीही आनंदाचा विषय असतो. सेलिब्रिटीपणा कॅश करत सईनेही तिच्या लग्नाचा सोहळा उत्साहात ऑनलाइन केला. सईच्या साखरपुड्यापासूनच ती सगळं ऑनलाइन शेअर करत होती. लग्नात तिला तिच्या बाबांनी कार गिफ्ट दिली. बाबांची कार घेऊन मी सासरी जाणार हे सांगण्यासाठी तिने चक्क हातावरच्या मेहंदी डिझाइनमध्ये कारचे चित्र काढले. तिच्या लग्नाचा थाटही भारी होता. मराठी आणि बंगाली अशा दोन्ही पद्धतीने झालेल्या सईच्या लग्नाला प्रत्यक्ष मोजकेच पाहुणे असले तरी तिने शेअर केलेल्या प्रत्येक फोटो आणि व्हिडिओला लाखो चाहत्यांनी लाइक करून तिच्या आयुष्यातील आनंदसोहळा अनुभवला. सईच्या उत्साहाचे असे एकेक धक्के तिच्या चाहत्यांना मिळतच होते.

लग्नानंतर सईची वरात कोलकात्यातील तिच्या सासरी आली तेव्हाही सई तिच्या नवऱ्यासोबत कोलकत्यातील पर्यटनाला गेली. खरंतर तिला नवऱ्यासोबत जगातील सात आश्चर्य बघायला जायचं होतं. पण कोरोनामुळे तिला जाता आलं नाही. मग काय तिच्या नवऱ्याने तिला कोलकातातील सेव्हन वडर्स गार्डनची सैर करवून आणली जिथे सात आश्चर्याच्या प्रतिकृती आहेत. सई आणि तिचा नवरा तीर्थदीप यांचा सेव्हनवडर्स गार्डनमधला व्हिडिओही तुफान लोकप्रिय झाला होता. आता सई पुन्हा एकदा झोतात आली आहे ती स्पेशल बंगाली वेशभूषेत शंख वाजवताना. सई सांगते, प्रत्येक संस्कृतीच्या काही प्रथा असतात. बंगालमध्ये शुभप्रसंगी स्वागत करताना शंखनाद करतात. हा शंख वाजवण्याची खास पद्धत आहे. मी जेव्हा लग्नानंतर कोलकात्याच्या घरी आले तेव्हा माझंही स्वागत शंखनाद करून झालं होतं. आता मलाही हा शंखनाद करायला शिकायचं होतं. त्यासाठी मला माझ्या सासूबाईंनी शंख दिला. गेल्या आठ दिवसांपासून मी शंख वाजवण्याचा सराव करत होते. आता मला अगदी बंगाली लोकांसारखा शंख वाजवायला येतो. शंखनाद केल्यावर मला खऱ्याअर्थाने बंगाली झाल्यासारखे वाटले.

मूळची बेळगावची असलेल्या सईने तिची आई वीणा लोकूर यांनी दिग्दर्शित केलेल्या मिशन चँपियन या सिनेमातून अभिनय कारकीर्दीला सुरूवात केली. त्यानंतर किस किस को प्यार करू या हिंदी सिनेमात कपिल शर्माच्या पत्नीच्या भूमिकेतही सई भाव खाऊन गेली. बिग बॉस मराठी या रिअॅलिटी शोमुळे सईच्या चाहत्यांमध्ये वाढ झाली. डान्सची आवड असलेल्या सईचे अनेक डान्स व्हिडिओ व्हायरल आहेत. सध्या सईची सनम हॉट लाइन ही वेबसिरीज प्रदर्शित झाली आहे. बिग बॉसच्या घरातील तिचा सख्खा मित्र पुष्कर जोग याच्यासोबत तिने या वेबसिरीजमध्ये काम केले आहे. कोरोनाकाळात नोकरी गेलेले मित्र एकत्र येऊन एक हॉटलाइन सुरू करतात, पण या नादात ते एका स्कँडलमध्ये नाहक अडकतात. त्यातून होणारी विनोदाची पेरणी आणि पडदयावरचा गोंधळ अशी कथा असलेल्या या वेबसिरीजमुळे सई पुन्हा अभिनयाकडे वळली आहे. सध्या तरी सई जस्ट मॅरीड हा टॅग लावून आनंद घेत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sai Lokur (@sai.lokur)

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER