भगवा दहशतवाद हा काँग्रेसने रचलेला कट : साध्वी प्रज्ञा सिंह

Sadhvi

भोपाळ :भगवा दहशतवाद हा काँग्रेसने रचलेला कट होता, असा आरोप करत या कटाची मी बळी ठरली. यामुळे तब्बल नऊ वर्षे आपल्यावर अन्याय झाल्याचे साध्वी प्रज्ञा सिंह यांनी आज पत्रपरिषदेत सांगितले.

2008 च्या मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यातील आरोपी असलेल्या साध्वी प्रज्ञा सिंह आज जामिनावर तुरूंगातून बाहेर आल्या आहेत. मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी जामीन मंजूर केला होता. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेत काँग्रेसवर टीका केली.

यावेळी साध्वी प्रज्ञा सिंह यांनी हायकोर्टाचे आभार मानले. त्या म्हणाल्या नऊ वर्षांच्या अन्यायातून मुक्त झाले आहे, आता स्वतःवर योग्य उपचार करुन घेणार आहे. यावेळी गेल्या 9 वर्षांत दहशतवादाला बळी पडलेल्या शहिदांना श्रद्धांजली वाहिली. पुढे त्या म्हणाल्या, “स्वतंत्र भारताच्या इतिहासात मला जो त्रास सहन करावा लागला, तसा कोणत्याही महिलेला करावा लागला नसेल. तब्बल नऊ वर्षे तुरुंगात अनेक पीडा सहन कराव्या लागल्या. मला झालेल्या आजाराला एटीएस जबाबदार आहे.”

अडीच वर्षे साध्वी प्रज्ञा सिंह यांनी भोपाळ येथील पंडित खुशीलाल शर्मा या सरकारी आयुर्वेदिक महाविद्यालात उपचार घेतला आहे. साध्वी यांना स्तनाचा कर्करोग झाला असून, सध्या त्यांची तब्येत नाजूक असून आधार घेतल्याशिवाय त्यांना चालताही येत नाही.

मुंबईतील विशेष एनआयए न्यायालयाने साध्वी यांचा जामीन अर्ज गेल्या वर्षी 28जून रोजी, तर पुरोहितचा जामीनअर्ज 29 सप्टेंबर रोजी फेटाळला होता. याविरुद्ध या दोघांनी केलेल्या अपिलांवर फेब्रुवारीत राखून ठेवलेले निकाल न्या. रणजीत मोरे व न्या. डॉ. शालिनी फणसाळखर-जोशी यांच्या खंडपीठाने मंगळवारी जाहीर केला. आधी एटीएस व नंतर एनआयएने सादर केलेल्या तपास अहवालांचा एकत्रितपणे विचार केला तरी साध्वीवर केले गेलेले आरोप खरे मानण्यास प्रथमदर्शनी काही आधार दिसत नाही, असा निष्कर्ष खंडपीठाने 78 पानी निकालपत्राच्या अखेरीस नोंदविला.