दुःख सरले, आता प्रतीक्षा रुपेरी किनारीची…

Rajesh Tope-Coronavirus

Shailendra Paranjapeकोरोना (Corona) संकटाच्या काळात आता काळ्या ढगाला रुपेरी किनार आहे, हे दिसू लागलंय. आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी सप्टेंबरपासून करोनाची उलटगणती सुरू होईल, असं सांगितलंय. दुसरीकडं जगभरच्या अनेक कंपन्या लसविकसनामधे वेगाने प्रगती करताहेत आणि स्थानिक पातळीवर करोनाचं येत्या पंधरवडाभरातलं शेवटचं आक्रमण लक्षात घेऊन त्याला तोंड देण्यासाठी जंबो कोविड-१९ सेंटर्स पुणे महापालिका तयार करत आहे, अशा अनेक सकारात्मक गोष्टी गेल्या ४८ तासात बातम्यांमधून समोर आल्या आहेत.

करोनाचे ढग अगदी डिसेंबर २०१९पासून जगावर येऊ लागले. भारतात २५ मार्चच्या लॉकडाऊनपासून (Lockdown) सुरू झालेली गंभीर स्थिती किती गंभीर आहे, हे एप्रिल-मेमधे आणि जूनमधे प्रकर्षाने लक्षात आले. कोणतीही साथ किंवा साथीचा रोग दोन-तीन महिन्यांपेक्षा जास्ती टिकत नाही, किंवा साथ म्हटलं की ती दोन तीन महिन्यात जाणार, ही अपेक्षा असते. पण महाराष्ट्र (Maharashtra) तसंच देशाची लोकसंख्या, खंडात्मकता, विषम हवामान आणि भूप्रदेश हे सारं लक्षात घेतलं तर करोना पसरण्याचा वेग, प्रमाण आणि भौगोलिक क्षेत्रं लक्षात घेतली तर सगळीकडे एकाच वेगाने करोना पसरला असं झालं नाही. किंबहुना ठिकठिकाणी करोना विषाणू संसर्गाचा अभ्यास केला तर तो देशभर विविध राज्यात तो वेगवेगळ्या पद्धतीनं पसरला गेला आणि केरळसारख्या राज्यात करोनाचा आलेख खाली आणण्यात त्या राज्याला यश आल्यावर तिथल्या अर्थमंत्र्यांनी राष्ट्रीय पातळीवरच्या इंग्रजी दैनिकात लेख लिहून केंद्र सरकारवर टीकाही केली होती. पण नंतर केरळमधे पुन्हा करोना संसर्ग सुरू झाला, असं दिसून आलं.

त्यामुळं गेल्या दोन दिवसात करोनाच्या बातम्या बघितल्या तर करोनाचा स्पाईक किंवा सर्वाधिक संसर्गाचा कालावधी कदाचित ऑगस्टच्या मध्यानंतर संपुष्टात येईल, अशी आशा करायला हरकत नाही. महाराष्ट्राच्या आरोग्य मंत्र्यांनी करोना संसर्ग वाढीचा वेग आता कमी होत असल्यानं सप्टेंबरमधे करोना संसर्गाची उलटगणती सुरू होईल, असं म्हटलंय. करोना करो आणि त्यांचं म्हणणं खरं ठरो, असं वाटतंय.

लसविकसनाबद्दल केवळ पुण्यातली कंपनी आहे म्हणून सिरम कंपनीनं विकसित केलेलं व्हँक्सिन किंवा लस राष्ट्रीय लशीकरणासारखी सर्वांनी घ्यावी, हे योग्य वाटत नाही कारण गेल्या तीन महिन्यात वृत्तपत्रांतून, टीव्ही वाहिन्यांनी सिरमच्या बातम्या दिल्या तशाच आता इतरही कंपन्यांच्या बातम्या येऊ लागल्यात. त्यामुळं करदात्यांच्या पैशावरच राष्ट्रीय कार्यक्रम अवंबून असल्यानं भारतासाठी सुयोग्य लस कुठल्या कंपनीची आहे, ती कितपत किफायतशीर आहे, भारतासाठी डेडिकेटेड किंवा भारतासाठीची लस कुणी उत्पादित करणारे का, हे सारं लक्षात घेऊन देशवासियांवर लसटोचणी व्हायला हवी, असं वाटतं.

महापालिकेच्या जंबो कोविड सेंटरसाठी डॉक्टर्स हवेत, या जाहिरातीला प्रतिसाद फारसा मिळालेला नाही, ही खरी चिंतेची बाब आहे. पण त्यामुळं वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या विविध अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांना, पदवीधारकांना करोना काळात लोकसेवा करतानाच उत्पन्न मिळवण्याची संधीही मिळणार आहे.

त्यामुळं करोना काळात कायम घाबरवणाऱ्या, चिंताग्रस्त करणाऱ्या बातम्या वाचायची सवय झाल्यानंतर आता कृष्णमेघाची रुपेरी किनार दिसण्याचा काळ आलाय. त्यामुळं ऑगस्टमधे पाऊसही चांगला होईल, सप्टेंबरमधे पावसाळा संपता संपता करोनाही संपून जाईल, अशी अपेक्षा करू यात.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER