शिवसेनेचा सदाभाऊ खोत यांना दणका, समर्थकांसह जिल्हाध्यक्षांचा शिवसेनेत प्रवेश

Shiv Sena

पुणे :- शिवसेनेने (Shiv Sena) रयत क्रांती शेतकरी संघटनेचे संस्थापक, माजी राज्यमंत्री तथा आमदार सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांना मोठा दणका दिला आहे. खोत यांचे खंदे समर्थक असलेले रयत क्रांती संघटनेचे पुणे जिल्ह्याध्यक्ष माऊली आहेर यांनी आपल्या समर्थकांसह संघटनेला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. या संघटनेच्या माध्यमातून आपले स्वतंत्र राजकारण करू पाहणाऱ्या खोत यांना जिल्हाध्यक्षांसारखे सहकारी सोडून जात असल्याने संघटनेला विचार करण्यास भाग पाडणारे आहे. शिवसेनेचे जिल्हा प्रमुख महेश पासलकर यांनी या कार्यकर्त्यांच्या हातात चौफुला (ता. दौंड) येथे शिवबंधन बांधले.

या वेळी रयत क्रांती शेतकरी संघटनेचे शंकर शितोळे, प्रशांत जगताप, बाळासाहेब कोंडे, गणेश गायकवाड आदींनी शिवसेनेत प्रवेश केला. दौंड विधानसभा मतदार संघातील शेतकरी संपत शिंदे, रमेश कुदळे, मारुती गावडे, शिवाजी पवार, साहेबराव शितोळे, निखिल शितोळे, रमेश शितोळे, अमोल कुऱ्हाडे, शुभम ढमे यांनीही हाती शिवबंधन बांधत आपल्या हाती शिवसेनेचा भगवा धरला आहे.

यावेळी पासलकर म्हणाले की, शिवसेना पक्षप्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी एक वर्षापूर्वी राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी केली होती, त्या अनुषंगाने दौंड तालुक्यातील शेतकऱ्यांची अंदाजे ४०० कोटी रूपयांची कर्जमाफी करण्यात आली आहे. महाविकास आघाडी सरकारच्या (Mahavikas Aghadi) माध्यमातून मुख्यमंत्री ठाकरे हे शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेत आहेत. त्यामुळे शेतकरी, कार्यकर्ते शिवसेनेच्या वाटेवर आहेत. आघाडी सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहे.

शिवसेनेत प्रवेश करणारे रयत क्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष माऊली आहेर म्हणाले की, शिवसेनेत ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण होते; म्हणून आम्हाला शिवसेनेसोबत काम करायचे आहे. यासाठी आम्ही शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, सहकारी सोडून जात असल्याने ते खोत यांच्यासाठी धक्कादायक मानले जात आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button