सांगली जिल्हा न्यायालयाच्या ‘बी’ विंग इमारतीला वाहनतळासाठी कृषी विभागाची जागा उपलब्ध करुन देण्याचे कृषि राज्यमंत्री सदाभाऊ खोत

mhnews2 3

मुंबई : सांगली जिल्हा न्यायालयाच्या ‘बी’ विंग इमारतीला वाहनतळासाठी कृषी विभागाची जागा उपलब्ध करुन देण्याचे निर्देश कृषि राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी आज दिले.

सांगली जिल्हा न्यायालयाच्या ‘बी’ विंग इमारतीला पार्किंगची जागा नसल्यामुळे भोगवटा प्रमाणपत्र प्राप्त झालेले नाही. त्यामुळे ही सुसज्ज इमारत वापरात आणण्यासाठी अडथळा आला होता. त्या अनुषंगाने श्री. खोत यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली. यावेळी विधी व न्याय विभागाचे प्रधान सचिव आर. एन. लढ्ढा, कृषी विभागाचे सहसचिव अशोक आत्राम, महसूल विभागाचे उप सचिव किरण वडते आदी यावेळी उपस्थित होते.

भोगवटा प्रमाणपत्राअभावी जिल्हा न्यायालयाची बी विंग इमारत वापरात आणता आली नव्हती. कौटुंबिक न्यायालय, औद्योगिक न्यायालय, कामगार न्यायालय, लघुवाद न्यायालय तसेच इतर न्यायालयीन कार्यालयांचे कामकाज या ठिकाणी स्थलांतरित करता आले नाही. त्यामुळे नागरिकांची अडचण होत होती. त्यामुळे न्यायालयाच्या लगतची कृषी विभागाची जागा पार्किंगसाठी उपलब्ध करुन देण्याची मागणी जिल्हा न्यायालयाकडून करण्यात आली आहे. नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेता श्री. खोत यांनी या प्रकरणी आज बैठक घेतली.

बैठकीस सांगली जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांचे प्रतिनिधी, सांगली जिल्हा बार असोसिएशनच्या अध्यक्ष ॲड. सविता शेडबाळे, ॲड. उमेश माणकापुरे, ॲड. जुलेखा मुत्तवल्ली, ॲड. अमोल चिमण्णा आदी उपस्थित होते.