मराठा आरक्षणासाठी सदाभाऊ खोतांचे आंदोलन

सांगली : रयत क्रांती संघटनेने मराठा आरक्षण (Maratha reservation) मिळवण्यासाठी सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांच्या नेतृत्वात राज्यव्यापी आंदोलन सुरू केले. राज्य सरकारच्या अपयशामुळे मराठा समाजाला आरक्षण मिळू शकले नाही, अशी टीका करत खोत यांनी इस्लामपूर इथे कुटुंबीयांसह घराच्या समोर निदर्शन केले व सरकारचा निषेध केला.

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठ्या कष्टाने लढा देत मराठा समाजाला आरक्षण मिळवून दिले. त्यासाठी न्यायालयीन लढा हा योग्य पद्धतीने लढण्यात आला. पण महाविकास आघाडी सरकारने फडणवीसांनी मिळवून दिलेले आरक्षण धुळीत मिळवले, अशी टीका सदभाऊ खोत यांनी केली.

‘मराठ्यांचे आरक्षण बांधले काठीला आणि महाविकास आघाडी सरकार गेले काशीला’ या घोषणेने आंदोलन सुरू करण्यात आले. मराठा समाज खेड्या पाड्यात राहणारा, शेतीत राबणारा अल्पभूधारक आहे. त्यामुळे मराठा समाजाने आरक्षणाची न्याय मागणी केली, असे ते म्हणालेत.

फडणवीस यांनी हे आरक्षण मिळवून दिलं होतं. पण प्रस्थापित मराठ्यांना नको होते. कारण आरक्षण मिळाले असते तर प्रस्थापित मराठे विस्थापित मराठ्यांच्या मांडीला मांडी लावून बसले असते. तसे झाले तर आमच्या सुभेदाऱ्या धोक्यात येतील अशी भीती असल्याने मराठा समाजाला न्याय मिळू शकला नाही, असा आरोप खोत यांनी केला. मराठा समाज आता जागा झाला असून सरकारला मराठा समाजाला आरक्षण द्यावेच लागेल, असा इशारा त्यांनी दिला.

कोरोनामुळे सध्या अंगणामध्ये कुटुंबीयांसह हे आंदोलन करण्यात आले. मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत हे राज्यव्यापी आंदोलन सुरू राहील, असे खोत यांनी म्हटले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button