सचिन वाझे याचा एनआयए चौकशीत गौप्यस्फोट; अनिल देशमुखांसह आणखी एका हाय प्रोफाईल मंत्र्यांचे घेतले नाव!

anil deshmukh - sachin vaze

मुंबई : मनसुख हिरेन हत्याप्रकरणात अटकेत असलेला मुंबई पोलीस दलातील अधिकारी सचिन वाझे (Sachin Vaze) याने  एनआयए चौकशीत केलेल्या गौप्यस्फोटामुळे महाविकास आघाडीच्या गोटात खळबळ उडाली आहे. गृहमंत्री अनिल देशमुख(Anil Deshmukh) यांनी त्यांच्या निवासस्थानी बोलावून मला पैसे वसुली करण्याचे टार्गेट दिले होते, असे सचिन वाझे याने मान्य केले आहे. वाझे याने या चौकशीत आणखी एका मंत्र्याचे नाव घेतले आहे आणि त्यांनी आपल्याला मागील वर्षी पैसे वसुली करण्याचे  टार्गेट दिले  होते, असा दावा केला आहे.

त्यामुळे सचिन वाझे याच्या दाव्यानुसार, पैसे वसुलीचं टार्गेट देणारा दुसरा नेता कोण, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे . मनसुख हिरेन प्रकरण…नंतर सचिन वाझे याला झालेली अटक आणि IPS परमबीर सिंह(Parambir Singh) यांनी गृहमंत्र्यांवर टाकलेला लेटरबॉम्ब, या सगळ्या प्रकरणामुळे महाविकास आघाडीच्या प्रतिमेला मोठा धक्का बसला आहे. गृहमंत्र्यांचा बचाव करण्यासाठी थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे मैदानात उतरले.

मात्र आता सचिन वाझे याने पैसे वसुलीचं टार्गेट मिळाल्याचं मान्य केल्यानं सत्ताधाऱ्यांची अडचण झाली आहे.  त्याहून धक्कादायक बाब म्हणजे वर्षभरापूर्वीही ठाकरे सरकारमधील दुसऱ्या एका वजनदार मंत्र्याने आपल्याला पैसे वसुली करण्यास सांगितल्याचं वाझे याचं म्हणणं आहे. सचिन वाझेच्या पुढील चौकशीत या मंत्र्याचं नावही अधिक स्पष्टपणे समोर येईल. त्यामुळे सत्तेत सामील असणाऱ्या तीन पक्षांपैकी कोणत्या पक्षातील मंत्री यात सहभागी आहे, हे पुढील काळातच स्पष्ट होईल. मात्र या सगळ्या प्रकारामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची डोकेदुखी वाढणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER