सचिन वाझे यांची एकाच दिवसात दोनदा बदली!

sachin waze

मुंबई : मनसुख हिरेन (Mansukh Hiren) यांच्या संशयास्पद मृत्युप्रकरणात अडचणीत सापडलेले गुन्हेगारी गुप्तवार्ता विभागाचे प्रमुख सचिन वाझे यांची नागरी सुविधा केंद्रात (सिटीझन फॅसिलिटेशन सेंटर) विभागात बदली करण्यात आली होती. याबाबत पोलीस मुख्यालयातून गुरुवारी रात्री पत्रक निघाले होते. मात्र, आता पुन्हा त्यांची एसबी-१ म्हणजेच विशेष शाखेत त्यांची कागदोपत्री बदली करण्यात आली आहे, अशी सचिन वाझे यांची एकाच दिवसात दोनदा बदली झाली. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर काही दिवसांपूर्वी स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ गाडी आढळली होती. या गाडीचा तपास सचिन वाझे यांच्याकडे सोपवण्यात आला होता.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी या गाडीचा मालक मनसुख हिरेन यांचा मृत्यू झाला. यानंतर सचिन वाझे हे वादाच्या भोवऱ्यात अडकले. मनसुख हिरेन यांचा सचिन वाझेंनीच खून केला, असा दावा भाजपाने केल्याने प्रकरण गंभीर झाले.सचिन वाझेंवर हिरेन यांच्या पत्नीने खुनाचा आरोप केल्यानंतरही त्यांना पदावर ठेवले जात असल्यास पुरावे नष्ट केले जाऊ शकतात. वाझेंना पाठीशी घालण्याचे कारण काय, असा सवाल विरोधकांकडून करण्यात येत होता. अखेर या प्रकरणी ठाकरे सरकारला नमते घ्यावे लागले. दोन दिवसांपूर्वी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझे यांची बदली करण्यात येणार असल्याची घोषणा विधानपरिषदेत केली होती.

सचिन वाझेंची १० तास चौकशी
सचिन वाझे यांची दहशतवाद विरोधी पथकाने (ATS) तब्बल १० तास चौकशी केली. वाझे यांनी सांगितले की, मी ती स्कॉर्पिओ वापरली नाही, मी धनंजय गावडेंना ओळखत नाही. गेल्या काही दिवसांपासून वाझेंवर अनेक आरोप होत होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER