सचिन वाझे, परमबीर सिंग छोटी माणसं, त्यांच्या बॉसला शोधायला हवे : फडणवीसांची मागणी

Sachin Vaze - Parambir Singh - Devendra Fadnavis - Maharashtra Today

नवी दिल्ली :- सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांना एनआयएने (NIA) अटक केल्यानंतर आज अखेर मुंबई पोलीस (Mumbai Police) आयुक्तांची उचलबांगडी करण्यात आली. त्यानंतर विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी ठाकरे सरकारवर (Thackeray Government) अजून एक गंभीर आरोप केला आहे. सचिन वाझे किंवा परमबीर सिंग (Parambir Singh) ही छोटी माणसं आहेत. त्यांचा बॉस कोण आहे, त्यांच्या मागचे हात शोधा, अशी मागणी फडणवीस यांनी राजधानी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली. तसेच मनसुख हिरेन प्रकरणाचा तपासही एनआयएने आपल्याकडे घ्यावा, अशी मागणीही फडणवीसांनी केली.

यावेळी ते म्हणाले की, हे प्रकरण सीआययूकडे वर्ग करण्याचं कुठलंही कारण नव्हतं. बादशाह रॅपर, रितीक रोशन केस असो, सर्व हायप्रोफाईल केसेस सीआययूकडेच जात होत्या. सीपीनंतर कोणाचा वट किंवा कद होता तो सचिन वाझेंचा होता. मुख्यमंत्र्यांच्या जवळ, गृहमंत्र्यांच्या जवळ किंवा शिवसेना नेत्यांच्या जवळ दिसत. सचिन वाझे यांना वसुली अधिकाऱ्याच्या रूपात पुन्हा रुजू करण्यात आलं. मुंबईत डान्सबार सुरू ठेवण्यात सूट आणि सर्वांचे इन्चार्ज सचिन वाझे होते, असा गंभीर आरोप फडणवीसांनी केला.

ही जी घटना घडली, मनसुख हिरेन (Mansukh Hiren) प्रकरण मोठं आहे. वाझे त्यांना पहिल्यापासून ओळखत होते. स्कॉर्पिओ त्यांनी हिरेन यांच्याकडून विकत घेतली; परंतु त्याचे पैसे दिले नाहीत. नोव्हेंबर ते फेब्रुवारी या चार महिन्यांत ती गाडी त्यांच्याकडे होती. हिरेन यांनी वाझेंकडे पैसे मागितले होते. पैसे द्या नाही तर गाडी परत द्या, असं सांगितलं होतं. काही दिवस गाडी वापरून वाझेंनी ती परत केली. स्कॉर्पिओ गाडी चोरी झाली असती तर काही तरी टेम्परिंग वगैरे झालं असतं. म्हणजे मनसुख यांना हे सांगितलं गेलं होतं की, गाडी तिथे लाव आणि चावी आणून दे. ही चावी सचिन वाझेंनी घेतली. त्यांना सांगितलं, उद्या जाऊन तुम्ही गाडी चोरी झाल्याची तक्रार दाखल करा, त्यानुसार कुर्ला पोलिसात तक्रार दाखल केली. तिथल्या ड्युटी ऑफिसरला सचिन वाझेंनी फोन करून गुन्हा दाखल करायला लावला. जाणीवपूर्वक तीन दिवस सचिन वाझेच तपास करत होते. मनसुख यांना वाझेंनीच सांगितलं, अन्य तपास यंत्रणा चौकशी करू शकतात. त्यामुळे मनसुख यांना सांगितलं वकिलामार्फत पत्र लिहून मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांना पाठवा. त्यात वाझेंनी स्वत:चंही नाव घातलं, असा दावाही फडणवीस यांनी केला.

ज्या दिवशी मनसुख यांना रात्री फोन आला, गावडेंनी तुम्हाला बोलावलं आहे. हा तोच एरिया होता जिथे सचिन वाझेंवर खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे. यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांचा मृतदेह मिळाला. आमचा हाच दावा आहे की, वाझेंना तिथेच मारून, मृतदेह खाडीत फेकला. त्यांचा अंदाज चुकला. त्यांना वाटलं लो टाईड आहे. पण अर्धा तासाचा फरक पडला. हाय टाईडमुळे त्यांचा मृतदेह बाहेर आला. अन्यथा तो बाहेर आला नसता. आणि पोलिसांच्या तपासामुळे मनसुख हिरेन फरार झाले, अशी बनवाबनवी झाली असती, असेही फडणवीस म्हणाले.

पोस्टमार्टममध्ये बऱ्याच गोष्टी आहेत. इतके रुमाल तोंडात कसे होते, त्यांना बांधलं होतं. पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये त्यांच्या फुप्फुसात पाणी असल्याचं सांगण्यात येत आहे; मात्र रिपोर्टमध्ये ते नाहीच. पाण्यात बुडून मृत्यू झाला असता तर फुप्फुसात भरपूर प्रमाणात पाणी असतं, ते न मिळाल्यामुळे ही हत्याच आहे हे अधोरेखित होतं. एटीएसने जी कारवाई करायला हवी, ती होताना दिसत नाही. माझ्यासारख्या व्यक्तीला इतके पुरावे मिळत असतील तर माझा दावा आहे पोलिसांकडे यापेक्षा जास्त पुरावे असतील. एटीएस आणि एनआयएकडे काही ऑडिओ क्लिप आहेत. त्यामध्ये वाझेने त्यांना काय काय म्हटलंय ते स्पष्ट आहे. एटीएसकडून सुरुवातीला ॲक्शन दिसली; पण आता काहीच दिसत नाही. एटीएसने आधी अटक करून त्यांना एनआयएकडे ताब्यात द्यायला हवं होतं. कारण ही दोन्ही एकमेकांशी संलग्न प्रकरणं आहेत. त्यामुळे एटीएसकडे जे प्रकरण आहे ते एनआयएने टेकओव्हर करावं. माझा एटीएसवर अविश्वास आहे असं नाही; मात्र त्यांच्याकडून आवश्यक कारवाई होत नाही. त्यांच्यावर दबाव असावा, अशी शंकाही फडणवीसांनी व्यक्त केली.

एकटे सचिन वाझे इतकं मोठं कारस्थान रचू शकत नाहीत. त्यांच्यामागे कोण कोण आहेत हे बाहेर आलं पाहिजे. हे पोलिसांचं अपयश नाही तर सरकारचं अपयश आहे. सरकारने अशा व्यक्तीला इतक्या महत्त्वाच्या जागेवर बसवलं, त्यावरून स्पष्ट होतं की, सरकारची मजबुरी होती. मुख्यमंत्र्यांनी हा तर ओसामा बिन लादेन आहे का, असा प्रश्न विचारून पाठीशी घातलं. या प्रकरणाच्या मुळाशी जायलाच हवं. सरकारनं वाझेंना या पदावर का आणलं, त्याचा संबंध काय हे तपास यंत्रणांना शोधावंच लागेल, अशी मागणी फडणवीस यांनी केली.

ही बातमी पण वाचा : पवार किंवा प्रमुख नेते का बोलत नाहीत? फक्त वातावरण तयार करण्याचा प्रयत्न – फडणवीस

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER