सचिन वझे हे बिन लादेन नाहीत, दोषींवर कठोर कारवई करणार ! – मुख्यमंत्री

CM Uddhav Thackeray - Sachin Vaze

मुंबई : मनसुख हिरेन (Mansukh Hiren) आणि मोहन डेलकर (Mohan Delkar) प्रकरणाची चौकशी सुरू झाली आहे. आधी फाशी द्या आणि नंतर तपास करा, अशी तपासाची पद्धत नसते. कुणी तपासाचा मार्ग दाखवू शकत नाही. एखाद्याला लक्ष्य करायचं आणि त्याला आयुष्यातून उठवायचं अशी पद्धत सध्या महाराष्ट्रातील राजकारणात सुरू झाली आहे, असं सांगतानाच सचिन वझे हे ओसामा बिन लादेनच आहेत, अशा पद्धतीनं चित्रं तयार केलं जात आहे. ते कशासाठी? असा सवाल करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी विरोधकांना फटकारलं.

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचं आज सूप वाजलं. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. पूजा चव्हाण प्रकरण ते मनसुख हिरेन प्रकरणामुळे गाजलेल्या या अधिवेशनामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पत्रकार परिषदेत काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. अधिवेशन घेणं कोरोनात आव्हानात्मक होतं. पण नियम पाळून अधिवेशन घेतलं. विरोधकांनीही उत्तम सहकार्य केलं. परवा अर्थसंकल्प सादर केला. आव्हानात्मक स्थिती असतानाही हा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. तरीही रडगाणं न गाता ‘महाराष्ट्र कधी थांबला नाही आणि थांबणार नाही’, हे आपलं ब्रीदवाक्य आहे. त्यानुसार सर्व घटकांना आपण सामावून घेण्याचा, त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.

कोणत्याही मृत्युप्रकरणाची गांभीर्याने दखल घेणं हे सरकारचं काम आहे. मोहन डेलकर यांनी आत्महत्या केली असून त्यांच्याकडे सुसाईड नोट सापडली आहे. त्यात काही लोकांची नावं आहेत. त्याचाही तपास सुरू आहे. परंतु, आधी फाशी द्या, मग तपास करा असं होत नाही. अशी पद्धत नसते. एखाद्याला टार्गेट करून त्याला आयुष्यातून उठवायचं अशी पद्धत सध्या सुरू आहे. परंतु, डेलकर किंवा हिरेन प्रकरणात जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करणारच. कुणालाही पाठी घालणार नाही, असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.

हिरेन यांच्या मृत्यूची गांभीर्याने दखल घेतली आहे. सचिन वझे जणू ओसामा बिन लादेनच आहेत, असं चित्रं कशासाठी निर्माण केलं जात आहे. आम्ही कुणालाही दयामाया दाखवणार नाही. कोणीही असेल त्याला शिक्षा होणारच, असं सांगतानाच चौकशी करून फाशी द्या ही आपल्याकडची न्यायाची पद्धत आहे. फाशी देऊन न्याय करा अशी पद्धत नसते. त्यांनी जर पद्धत बदलली असेल तर त्यांनी सांगावं, असा टोलाही त्यांनी लगावला. प्रत्येक गोष्टीसाठी यंत्रणा असते. एखादा गुन्हा किंवा घटना किंवा दुर्घटना घडली असेल त्याबाबत शंका असेल तर आपल्याकडे अनेक यंत्रणा आहेत. जर यांच्या यंत्रणा भारी असतील तर पोलीस यंत्रणा रद्द करायची का? असा सवाल त्यांनी केला.

यावेळी त्यांनी विरोधकांवर सडकून टीका केली. अर्णव गोस्वामींना अटक केली म्हणून वझेंना अडकवताय का? सीडीआर कुणाकडे उपलब्ध होऊ शकतो का? त्यावर कारवाई करायची, नाही करायची यापेक्षा सीडीआर तपास यंत्रणेला द्या, त्यातील माहिती तपासू द्या. त्यावर पटकन भाष्य करणं योग्य नाही. वझे पूर्वी शिवसेनेत (Shiv Sena) होते. २००८ मध्ये ते सेनेत होते. त्यांनी पुन्हा सदस्यत्व स्वीकारलेले नाही. आता त्यांचा शिवसेनेशी कुठलाही थेट संबंध नाही. सर्व विषयात निष्पक्षपातीपणे पाहायचा चष्मा हवा. राज्य सरकारकडे जसं तारतम्य आहे, तसं विरोधकांनीही बाळगलं पाहिजे, असं त्यांनी सांगितलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER