
मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेले स्फोटक आणि मनसुख हिरेन हत्याप्रकरणात निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे एनआयएच्या अटकेत आहे. आणि अश्यातच भाजपाकडून आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी गंभीर आरोप केला आहे. सचिन वाझे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे (Uddhav Thackeray) आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचा माणूस आहे. त्यांनाच संपूर्ण माहिती दिली जायची. परमबीर सिंग यांना ते विचारतच नव्हते. सचिन वाझे वर्षावर जाऊन कसे राहायचे? त्यांना कुणी परवानगी दिली? ते आदित्य ठाकरेंसोबत ऑनकॉल होते. म्हणूनच त्यांना वाचवायचे प्रयत्न होत होते, असा आरोपही त्यांनी केला, ते एका वृत्तवाहिनीशी बोलत होते.
दरम्यान, यावेळी बोलताना नितेश राणेंनी राज्यात वाढत असलेल्या करोना रुग्णांच्या आकडेवारीवरही शंका व्यक्त केली. जेव्हा जेव्हा हे सरकार अडचणीत आलं, तेव्हा तेव्हा करोनाचे आकडे वाढताना दिसून आले. सचिन वाझेंचं प्रकरण समोर आलं की लगेच दणादण करोनाचे आकडे वाढायला सुरूवात झाली. भारतात फक्त महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहेत. त्यामुळे याची चौकशी व्हायला हवी. खरंच करोनाचे आकडे वाढत आहेत की स्वत:च्या चुका लपवण्यासाठी या संख्या तयार केल्या जात आहेत आणि लॉकडाऊनच्या धमक्या दिल्या जात आहेत याची चौकशी केली पाहिजे, अशी मागणीही नितेश राणे यांनी केली.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला