सचिन वाझेने पुरावे केले नष्ट?

Sachin Vaze

उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या निवासस्थानाजवळ स्फोटके आणि धमकीची चिठ्ठी ठेवलेली गाडी बेवारस सोडताना ‘त्या’ व्यक्तीने घातलेले कपडे आरोपी सचिन वाझे (Sachin Vaze) यांनी मुलुंड परिसरात जाळून नष्ट केले, असा दावा गुरुवारी ‘एनआयए’ (NIA)ने केला. वाझे यांनी वापरलेल्या आणखी दोन महागड्या गाड्याही या पथकाने जप्त केल्या.

अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ २५ फेब्रुवारीच्या रात्री बेवारस सापडलेल्या स्कॉर्पिओसोबत एक इनोव्हा गाडीही होती. या गाडीतून एक व्यक्ती उतरली, स्कॉर्पिओची पाहणी करून ती निघून गेली, असे परिसरातील सीसीटीव्ही चित्रणावरून स्पष्ट झाले. ही व्यक्ती म्हणजे वाझेच होते, असा दावा ‘एनआयए’ने केला. पुरावा नष्ट करण्यासाठी वाझेने त्या वेळी घातलेले त्याने मुलुंड परिसरात जाळले, असा दावा ‘एनआयए’च्या अधिकाऱ्याने केला.

गाड्या जप्त

‘एनआयए’ पथकाने वाझे यांचे ठाण्यातील निवास्थान असलेल्या गृहनिर्माण संस्थेच्या इमारतीखालून ‘लँड क्रूझर प्राडो’ गाडी जप्त केली. याच गाडीतून वाझे यांनी मनसुख हिरेन यांना पोलीस आयुक्तालयात चौकशीसाठी नेले होते. अंबानी यांच्या निवासस्थानी बेवारस सोडलेली स्कॉर्पिओ तीन वर्षे मनसुख यांच्या ताब्यात होती. ती चोरी झाल्याची तक्रार त्यांनी १७ फेब्रुवारीला विक्रोळी पोलीस ठाण्यात दिली. प्रत्यक्षात ती गाडी चोरी झालीच नव्हती. ती वाझे यांच्या निवासस्थानी १७ ते २५ फेब्रुवारी या कालावधीत दडवून ठेवली, असा संशय ‘एनआयए’ला आहे. वाझे वापरत असलेली दुसरी एक मर्सिडीज गाडीही ‘एनआयए’ने जप्त केली. या प्रकरणात आतापर्यंत पाच गाड्या ‘एनआयए’च्या ताब्यात आहेत. एनआयएचे पथक आणखी दोन गाड्यांचा शोध घेते आहे.

सीसीटीव्ही चित्रणाचा तपास

‘एनआयए’च्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार वाझे यांनी तपासाच्या निमित्ताने स्वत:च्याच इमारतीतील सीसीटीव्ही चित्रण ताब्यात घेतले. याशिवाय या संपूर्ण प्रकरणात वाहनांच्या अनेक बनावट नोंदणी क्रमांक पाट्या तयार करून घेतल्या होत्या. त्या प्रत्येक ठिकाणचे चित्रणही वाझे यांच्या पथकाने ताब्यात घेतले. या चित्रणात वाझे यांनी फेरफार केला का, याचाही तपास सुरू आहे.

तपास साहाय्यक निरीक्षकाकडे?

झे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनंतर एनआयए पथक मुंबई पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची चौकशी करू शकतात. देशातील आघाडीच्या व्यावसायिकाला मिळालेल्या धमकीचा तपास साहाय्यक निरीक्षकाकडे कसा? हा प्रश्न या अधिकाऱ्यांना केला जाऊ शकतो.

तारांकित हॉटेलमध्ये सचिनने आरक्षित केली होती खोल्या ?

दक्षिण मुंबईतील चार हॉटेलमध्ये सचिन वाझे यांनी मोठ्या कालावधीसाठी प्रत्येकी एक खोली आरक्षित करून ठेवली होती, अशी माहिती एनआयएला मिळाली आहे. याची तपास सुरू आहे. सचिनने या खोल्या का आरक्षित केल्या होत्या, याची माहिती घेणे सुरू आहे.

शवचिकित्सा करणाऱ्या तज्ज्ञांची चौकशी

मनसुख हिरेन यांची शवचिकित्सा करणाऱ्या तीन तज्ज्ञांची बुधवारी ‘एटीएस’ने चौकशी केली. मनसुख यांची हत्या करून त्यांचे शव खाडीत फेकले, असे निरीक्षण प्राथमिक अहवालात नोंदवण्यात आले होते. मनसुख याच्या शरीरावर जखमा, व्रण आढळले होते. मनसुख यांची हत्या करण्यात आली या निरीक्षणास आधार मिळावा या हेतूने एटीएसने ‘डायटम’ चाचणी करून घेतली. या चाचणीचा अहवाल आणि शवचिकित्सेतून पुढे आलेले प्राथमिक निरीक्षण यात काही विरोधाभास आढळला. मनसुख पाण्यात पडले तेव्हा जिवंत किंवा बेशुद्धावस्थेत होते, असे निरीक्षण या चाचणीतून पुढे आले. हा अहवाल एटीएस हरियाणा येथील प्रयोगशाळेत अभिप्रायासाठी पाठवणार आहे. या वृत्तास एटीएसच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दुजोरा दिला.

वकिलांशी वेगळ्या भेटीसाठी विशेष न्यायालयात अर्ज

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटके ठेवल्याच्या आरोपप्रकरणी अटकेत असलेले निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे याने वकिलांच्या वेगळ्या भेटीसाठी विशेष न्यायालयात अर्ज केला आहे. विशेष न्यायालयानेही या अर्जावर राष्ट्रीय तपास यंत्रणेला (एनआयए) उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. चौकशीच्या वेळी वाझे सोबत त्याचे वकीलही हजर राहू शकतील, असे विशेष न्यायालयाने याआधीच स्पष्ट केले आहे. मात्र वकिलांशी वेगळी भेट घेण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी वाझे याने केली आहे. न्यायालयाने वाझे याच्या अर्जावर एनआयएला शुक्रवारी उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले.

पोलीस दलात फेरबदलाचे संकेत

वाझे याच्या अटकेनंतर या प्रकरणात पोलीस दलातील काही आजी-माजी अधिकाऱ्यांचा सहभाग असावा, असा संशय एनआयएने व्यक्त केला. या संपूर्ण प्रकरणाच्या पाश्र्वाभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग आणि दोन सहआयुक्तांकडे चौकशी केली. या वेळी पोलीस दलातील काही अधिकारी विभागप्रमुखांना विश्वाासात न घेता थेट आयुक्त किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संवाद साधत होते, अशी तक्रार मिळाल्याचे कळते.

ही बातमी पण वाचा : वाझे प्रकरण : एनआयने जप्त केली ९६ लाखांची प्रॅडो, ५५-५५ लाखांच्या २ मर्सिडीज

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER