
मुंबई : शनिवारी राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (NIA) विशेष कोर्टाने सचिन वाझे आणि एनआयएच्या वकिलांच्या युक्तिवादावर सुनावणी केली. ज्येष्ठ विधिज्ञ आबाद पोंडा हे सचिन वाझे यांची बाजू मांडत आहेत. सचिन वाझेनी NIA समोर अद्याप कोणतीही कबुली दिलेली नाही. एनआयएने सचिन वाझे (Sachin Vaze) याची पूर्णपणे तपासणी केली आहे, या दाव्यामध्ये किती सत्य आहे याबद्दल साशंकता निर्माण झाली आहे.
सचिन वाझे गेल्या २३ दिवसांपासून NIAच्या ताब्यात आहे. त्याला आणखी काही काळ कोठडीत ठेवणे अन्यायकारक होईल, असे वाझेच्या वकिलांनी सांगितले. तर एनआयएचे वकील अनिल सिंग यांनी सांगितले की, हा तपास महत्त्वाच्या टप्प्यावर पोहचला आहे. आणखी काही गोष्टींच्या चौकशीसाठी सचिन वाझेची कोठडी महत्त्वाची आहे. हा सगळा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने सचिन वाझेच्या कोठडीत ७ एप्रिलपर्यंत वाढ केली.
मिठी नदीच्या त्याच जागी वस्तू कशा सापडल्या?
काही दिवसांपूर्वीच NIAच्या अधिकाऱ्यांनी सचिन वाझेला मिठी नदीच्या परिसरात नेले होते. NIAच्या दाव्यानुसार, यावेळी सचिन वाझेच्या सांगण्यावरून मिठी नदीतून वस्तू बाहेर काढण्यात आल्या. यामध्ये सीसीटीव्ही फुटेजचा डीव्हीआर, संगणक आणि सीपीयू अशा गोष्टींचा समावेश होता.
मात्र, वाझे याचे वकील आबाद पोंडा यांनी या सगळ्याविषयी शंका उपस्थित केली. मिठी नदी ही १७.८४ किलोमीटर इतकी लांब आहे. तिची खोली जवळपास ७० मीटर इतकी आहे. मग सचिन वाझेनी फेकलेल्या वस्तू इतक्या दिवसांनी त्याच जागेवर कशा काय सापडल्या, असा सवाल आबाद पोंडा यांनी विचारला. या माध्यमातून त्यांनी एकप्रकारे या वस्तू NIAनेच प्लांट केल्याचे सूचित केले आहे.
खात्यातून २६ लाख रुपये काढण्यात आले; NIA ला कबुली दिली नाही : वाझे
NIAचे वकील अनिल सिंग यांच्या दाव्यानुसार, सचिन वाझेला अटक झाल्यानंतर त्याच्या खात्यातून २६ लाख रुपये काढण्यात आले. आता या खात्यात ५ हजार रुपये शिल्लक आहेत. तसेच वाझेच्या डीसीबी बँकेतील लॉकरमधील कागदपत्रे NIAच्या हाती लागली आहेत. या कागदपत्रांची चौकशी सुरू आहे, असे अनिल सिंग यांनी सांगितले.
मात्र, सचिन वाझेच्या वकिलांनी हा आरोप फेटाळून लावला. ज्या खात्यामधून २६ लाख रुपये काढण्यात आले ते संयुक्त खाते आहे. तसेच माझ्या अटकेनंतर हे पैसे काढले गेले असतील, तर तो एनआयएचा कमकुवतपणा आहे, असे सचिन वाझे याने म्हटले.
आतापर्यंत NIA सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे सचिन वाझेला कोंडीत पकडू पाहात होती. मात्र, वाझेनीदेखील सीसीटीव्ही फुटेज सर्व गोष्टी स्पष्ट करेल, असा उलट दावा केला आहे. सीसीटीव्ही फुटेजचा १२० टीबी डेटा NIAकडे आहे. या फुटेजमध्ये कोणीही छेडछाड करू शकत नाही, अशी टिप्पणी वाझेनी केली आहे.
अंबानी स्फोटकेप्रकरणात सचिन वाझेनी कोणत्याही कृत्याची कबुली दिलेली नाही. माझ्यावरील सर्व आरोप खोटे आहेत. अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या जिलेटीनचा आरोपही माझ्यावरच लावण्यात आला, असे सचिन वाझे यांनी म्हटले.
NIA वकिलांचे म्हणणे काय?
१. डीसीबी बँकेच्या लॉकरमधून कागदपत्रे मिळाली आहेत. लॉकरमध्ये सापडलेल्या वस्तूंची चौकशी होणे गरजेचे आहे.
२. सीसीटीव्ही डेटाचा १२० टीबी डेटा आढळला. याची चौकशी होणे आवश्यक आहे.
३. आयपी address पडताळणी आवश्यक आहे.
४. जप्त केलेल्या सात कारच्या नंबर प्लेट्स तपासायच्या आहेत. शेवटची कार २ एप्रिल रोजी जप्त केली होती.
५. आरोपींचा पासपोर्ट जप्त केला असून त्याची तपासणी करावी लागेल.
६. मिठी नदीत शोध घेताना अनेक प्रकारच्या वस्तू सापडल्या. त्यांची तपासणी करून पुष्टी करायची आहे.
७. या प्रकरणात आतापर्यंत ५० साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत.
ही बातमी पण वाचा : वाझे कोठडीत असल्याने उद्धव ठाकरेंनी वायकरांना १०० कोटीचे टार्गेट दिले – किरीट सोमय्या
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला