सचिन वझे यांची बदलीनंतर प्रतिक्रिया; क्राईम ब्रांचच्या सेवेतून मुक्त!

Sachin Vaze

मुंबई :- मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्युप्रकरणात अडचणीत आलेले एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रमुख सचिन वझे यांची नागरी सुविधा केंद्रात (सिटीझन फॅसिलिटेशन सेंटर) बदली करण्यात आली आहे. यासंदर्भात पोलीस मुख्यालयातून गुरुवारी रात्री अधिकृत पत्रक निघाले आहे. त्यांच्या बदलीच्या वृत्ताला सहआयुक्त (गुन्हे) मिलिंद भारांबे यांनी दुजोरा दिला. बदलीनंतर वझे यांनी क्राईम ब्रांचच्या सेवेतून मुक्त झालो, अशी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

सचिन वझे यांची बदली करणार असल्याची घोषणा तीन  दिवसांपूर्वी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी विधानसभेत केली होती. त्यामुळे सचिन वझे यांची आता कोणत्या विभागात बदली होणार, याकडे सर्वांचे लक्ष होते. अर्थसंकल्पीय अधिवेशनात सचिन वझेंवर हिरेन यांच्या पत्नीने खुनाचा आरोप केला. ते या पदावर ठेवले जात असल्याने पुरावे नष्ट केले जाऊ शकतात. सचिन वझेंना पाठीशी  घालण्याचे कारण काय, असा सवाल विरोधकांकडून करण्यात आला. अखेर या प्रकरणी ठाकरे सरकारला बॅकफूटवर जावे लागले आणि सचिन वझे यांची बदली करण्यात आली.

वझेंची ATS कडून १० तास चौकशी

मनसुख हिरेन मृत्युप्रकरणामुळे चर्चेत आलेल्या सचिन वझेंची दहशतवाद विरोधी पथकाने  (ATS)  १० तास चौकशी केली आहे. “मी ती स्कॉर्पिओ वापरली नाही, मी धनंजय गावडेंना ओळखतही नाही” अशी माहिती सचिन वझेंनी ATSला दिली. या प्रकरणी पोलीस अधिकारी सचिन वझे यांचे नाव चांगलेच चर्चेत आहे. गेल्या काही दिवसांपासून वझेंवर अनेक आरोप होत आहेत. या आरोपानंतर वझे स्वत:हून ATSच्या समोर गेले, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

काय म्हणाले अनिल देशमुख?

मनसुख हिरेन मृत्युप्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल. सचिन वझे असो वा कोणीही, शासन कोणालाही पाठीशी घालणार नाही. विरोधकांनी त्यांच्याकडील पुरावे ATSला द्यावेत, तसेच सचिन वझे यांची बदली करण्यात आल्याचे गृहमंत्री अनिल देशमुखांनी विधानसभेत सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER