सचिन वाझेला पुन्हा सेवेत घेणे आणि बदल्यांवरून बसू शकतात ठाकरे सरकारला हादरे

anil deshmukh - sachin vaze

मुंबई : सीबीआयने(CBI) माजी गृहमंत्री अनिल देशमुख(Anil Deshmukh) यांच्याविरोधात दाखल केलेल्या गुन्हा याचिकेतील सचिन वाझेला पोलीस दलात घेण्यामागे आणि पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये अनिल देशमुख यांचा हस्तक्षेप होता, हे दोन मुद्दे वगळावेत, अशी विंनती राज्य सरकारने केली आहे. हे दोन्ही मुद्दे सरकारला हादरवणारे आहेत.

सीबीआयने दाखल केलेल्या गुन्हा याचिकेवर काल रात्री साडेदहा वाजल्यानंतर सुनावणी झाली. सीबीआयने दाखल केलेल्या गुन्ह्यातील दोन परिच्छेद वगळण्याची मागणी राज्य सरकारने केली आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकारला (MVA)अस्थिर करण्यासाठीच सीबीआयने देशमुखांवर गुन्हा दाखल केला, असे राज्य सरकारने म्हटले आहे. सीबीआयने मात्र तपासात कुठल्याही मुद्द्यांचा समावेश करता येऊ शकतो, असं स्पष्टीकरण दिले आहे.

राज्य सरकारचा दावा

सचिन वाझेला (Sachin Vaze)पोलीस दलात घेण्यामागे आणि पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये अनिल देशमुख यांचा हस्तक्षेप होता, असे सीबीआयने त्यांच्या एफआयआरमध्ये म्हटले आहे. हे दोन मुद्दे गुन्ह्यातून वगळावेत, यासाठी राज्य सरकारने याचिका केली होती. हे दोन्ही मुद्दे हे मंत्रालयीन आणि प्रशासकीय कामाचे भाग आहेत. त्यामुळे गुन्ह्यात यांचा समावेश करुन सीबीआय मुद्दाम चौकशी करू पाहत आहे. महाविकास आघाडी सरकारला अस्थिर करण्यासाठीच सीबीआयने देशमुखांवर गुन्हा दाखल केला, असे राज्य सरकारने याचिकेत म्हटले आहे.

सीबीआयची बाजू

काही राज्यात सीबीआय राज्याच्या परवानगीशिवाय तपास करु शकत नाही, याची आम्हाला कल्पना आहे. पण दुर्मिळ प्रकरणात सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टाने दिलेल्या आदेशानुसार सीबीआय तपास करु शकते, असे सीबीआयने कोर्टात सांगितले. वकील जयश्री पाटील यांच्या तक्रारीनुसारच तपास सुरू असल्याचे सीबीआयने स्पष्ट केले. तपासात कुठल्याही मुद्द्यांचा समावेश करता येऊ शकतो, असे सीबीआयने म्हटले आहे. पुढील सुनावणी शुक्रवारी होणार आहे.

प्रकरण

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी निलंबित पोलीस निरीक्षक सचिन वाझे (Sachin Vaze) यांना दरमहिना १०० कोटी रुपये वसूल करण्याचे आदेश दिले होते, असा आरोप करणारे पत्र मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना लिहिले होते. देशमुख किंवा त्यांच्या कार्यालयातील कोणत्याही अधिकाऱ्याकडून गैरवर्तन किंवा गुन्हा झाल्याबाबत तपास सुरू आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button