सत्कारासाठी सचिन तेंडुलकरचा १० वर्षांपासून प्रतिसाद नाही! मुंबई महापालिकेने केला रद्द

Mumbai Municipal Corporation-Sachin Tendulkar

मुंबई :- क्रिकेटचा देव, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) यांचा जाहीर सत्कार करण्याचे मुंबई महापालिकेने ठरवले होते. पण याबाबत सचिन तेंडुलकरने गेल्या १० वर्षात मुंबई महापालिकेला प्रतिसाद दिला नाही; त्यामुळे अखेर मुंबई महापालिकेने हा कार्यक्रम रद्द करण्याचे ठरवले आहे.

सचिन तेंडुलकरने कसोटीमध्ये ५१ तर एकदिवसीय सामन्यात ४९ शतके ठोकली आहेत. तो एकूण ६६४ आंतरराष्ट्रीय सामने खेळला त्यात ३४ हजार ३५७ धावा केल्या. सचिनच्या या कामगिरीचा सन्मान करण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला होता. जानेवारी २०१० मध्ये तत्कालीन विरोधी पक्षनेते राजहंस सिंह यांनी मुंबई महापालिकेच्यावतीने सचिनचा नागरी सत्कार करण्याचा ठराव महापालिकेत मांडला होता.

तत्कालीन महापौर श्रद्धा जाधव यांनीही विरोधी पक्षनेत्यांनी मांडलेला प्रस्ताव मंजूर केला होता. सभागृहातील ठरावानंतर फेब्रुवारी २०१० मध्ये सचिन तेंडुलकरला या ठरावाची कल्पना देण्यात आली. महापौर आणि आयुक्तांच्या कार्यालयाकडून सचिन तेंडुलकरला वेळ देण्याची विनंती करण्यात आली. सचिनने पत्र मिळाल्याचं महापालिकेला कळवले. मात्र, सत्कारासाठी दिनांक आणि वेळ नमूद केली नव्हती. ११ डिसेंबर २०११ रोजी सचिनला पुन्हा एकदा नागरी सत्काराबाबत आठवण करू देण्यात आली. पण सचिनकडून त्याला कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे हा सत्कारही पुढे ढकलण्यात आला. गेल्या 10 वर्षात सचिनकडून सत्कारासाठी वेळच दिली नाही. त्यामुळे अखेर हा नागरी सत्कार गुंडाळण्याचा निर्णय महापालिकेनं घेतल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे.

सचिन तेंडुलकरला देशातील सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यामुळे आता मुंबई महापालिकेकडून त्याचा नागरी सत्कार करणे उचित ठरणार नाही, असे मत व्यक्त करत मुंबई महापालिका प्रशासनाने सचिनच्या नागरी सत्काराचा कार्यक्रम गुंडाळून ठेवला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER