भाजपची अवस्था ‘गिरे तो भी टांग उपर’, सचिन सावंत यांची टोलेबाजी

Sachin Sawant - BJP

मुंबई : रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) यांच्या फोन टॅपिंग (phone tapping) प्रकरणात भाजपची अवस्था गिरे तो भी टांग उपर अशी झाली आहे. शुक्ला या भाजपसाठीच काम करत होत्या हे चौकशी अहवालातून स्पष्ट झालं आहे. त्यांनी पदाचा गैरवापर केला होता. त्याबद्दल शुक्ला यांनीच माफी मागितली आहे. मग भाजप त्यांची का बाजू घेत आहे? मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची चौकशी होऊ नये आणि त्यावरून दुसरीकडे लक्ष वळवलं जावं यासाठी शुक्ला प्रकरण बाहेर काढण्यात आले का? अर्णव गोस्वामी प्रकरणात ३०२ कलम लावून सिंग यांना आत टाका म्हणणाऱ्या भाजपला सिंग यांचा आताच पुळका का आला? असा प्रश्न उपस्थित करत काँग्रेसचे नेते सचिन सावंत (Sachin Sawant) यांनी भाजपचा समाचार घेतला. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.

यावेळी सावंत म्हणाले की, सहाय्यक पोलीस निरीक्षक असलेले सचिन वाझे याने गृहमंत्र्यांविरोधात थेट मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्याकडे तक्रार केली. यावरून वाझे हे नेमके कुणाच्या जवळचे होते हे स्पष्ट होते. या प्रकरणात सिंग यांची चौकशी का केली जात नाही? असा सवाल सावंत यांनी एनआयएला केला. सचिन वाझेंनी गृहमंत्री अनिल देशमुखांविरोधात परमबीर सिंग यांच्याकडे तक्रार केली होती. वाझे हे एपीआय दर्जाचे अधिकारी होते. त्यांच्यावर अनेक अधिकारी होते. या सर्व अधिकाऱ्यांना बायपास करून वाझेंनी थेट सिंग यांच्याकडे तक्रार केली. त्यामुळे वाझे सिंग यांच्या किती जवळचे होते हे स्पष्ट होते.

तसेच वाझेंचं कार्यालय ही सिंग यांच्या कार्यालयाच्या १०० फुटाच्या अंतरावर होते. या गुन्ह्यात वापरण्यात आलेली इनोव्हा गाडीही सिंग यांच्या कार्यालयातीलच आहे. तसेच वाझे वारंवार सिंग यांना थेट भेटायचे. त्यामुळे वाझे हे कुणाच्या संपर्कात होते आणि जवळचे होते हे स्पष्ट होत आहे, असं सांगतानाच या प्रकरणात एनआयए सिंग यांची चौकशी का करत नाही? सिंग यांची चौकशी का टाळण्यात येत आहे? सिंग यांची अटक टाळण्यात येत आहे का? वाझे सारखा अधिकारी हे सर्व प्रकरण घडवून आणूच शकत नाही. अँटालिया प्रकरण घडण्यापूर्वी वाझेंना नेमकं कोण भेटतं होतं, त्याचा तपास व्हावा, असंही ते म्हणाले.

एटीएसने १० मार्च रोजी परमबीर सिंग यांच्या कार्यालयाकडे डिव्हीआर मागितला होता. तो एटीएसला देण्यातही आला होता. परंतु, डिव्हीआर देणं ही मोठी चूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर पुन्हा एटीएस प्रमुखांना फोन केला गेला आणि डिव्हीआर मागितला गेला. एटीएसने हा डिव्हीआर परत दिला. त्यानंतर तो गायबच आहे, अशी धक्कादायक माहिती देतानाच या डिव्हीआरमध्ये कुणाच्या हालचाली होत्या? तो अचानक कसा गायब करण्यात आला? तो एटीएसकडून कुणी मागून घेतला? हे सर्व प्रश्न अनुत्तरीत आहेत. त्याची एनआयए चौकशी का करत नाही?, असा सवाल करतानाच एनआयए जर चौकशी करत नसेल तर राज्य सरकारने त्याची चौकशी केली पाहिजे, अशी मागणी सावंत यांनी केली.

सीताराम कुंटे हे चांगले अधिकारी आहेत. असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणतात. दुसरीकडे कुंटे यांच्या अहवालावर अविश्वास दाखवतात. हा विरोधाभास असून कुंटे यांच्या अहवालाने विरोधकांच्या आरोपांचा फुगाच फुटला आहे. जो पेन ड्राईव्ह सरकारला देण्यात आलेला नाही, तो फडणवीसांकडे आलाच कसा? असा सवाल करून यातून महाराष्ट्राची बदनामी झाल्याचं सावंत म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER