सचिन अहिर यांची शिवसेनेच्या उपनेतेपदी नियुक्ती

Sachin Ahir

मुंबई: विधानसभा निवडणुकीवेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसची सोबत अर्ध्यावर सोडून सचिन अहीर यांनी शिवसेनेची वाट पकडली. अहिरांच्या खांद्यावर शिवसेनेने पक्षाची मोठीजबाबदारी दिली आहे. सचिन अहिर यांची शिवसेनेच्या उपनेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

राष्ट्रवादीचं मुंबई अध्यक्षपद भूषवत असताना सचिन अहिर यांनी पक्षाला मोठा धक्का दिला होता. विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर 25 जुलै 2019 रोजी सचिन अहिरांनी शिवबंधन हाती बांधलं होतं. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘मातोश्री’वर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता.

मुंबईमध्ये सचिन अहिर यांची मोठी ताकद आहे. वरळी मतदारसंघातून आदित्य ठाकरेंना विधानसभा निवडणूक जिंकून देण्यात अहिर यांचा मोलाचा वाटा मानला जातो. सचिन अहिर यांना त्याचेच बक्षीस म्हणूनही हे शिवसेनेचं उपनेतेपद बहाल करुन देण्यात आल्याचे बोलल्या जात आहे.