“मुंबईत खाऊन, ‘पिऊन’ तरारलेली महिला कलावंत मराठी अस्मितेवर दारूच्या गुळण्या टाकते, हे…” शिवसेनेची टीका

CM Uddhav Thackeray - Kangana Ranaut

मुंबई : अभिनेत्री कंगना रणौतने (Kangana ranaut) मुंबईची (Mumbai) तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केली होती. तिच्या या वक्तव्यावरुन मोठा वाद निर्माण झाला आहे. शिवसेनेने (Shiv Sena) सामना अग्रलेखातून कंगना रणौतवर टीकास्त्र सोडले आहे .

मुंबईत खाऊन, ‘पिऊन’ तरारलेली एक महिला फिल्मी कलावंत मराठी अस्मितेवर दारूच्या गुळण्या टाकते हे सहन करता येणार नाही आणि राज्याच्या विधिमंडळात या प्रकाराची निंदा करायलाच हवी, असे शिवसेनेने अग्रलेखात म्हटले आहे . तसेच विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने आज अग्रलेखामधून कंगनाविरोधात पक्षभेद विसरून आवाज उठवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

आजचा सामनातील अग्रलेख :
“विरोधी पक्षांकडून सुशांतसिंह राजपूत, कंगना राणावत अशा ‘राष्ट्रीय हितांच्या’ विषयांवर प्रश्न उपस्थित केले जातील. खरे तर ‘मुंबई’ म्हणजे पाकव्याप्त कश्मीर वगैरे विधान करून समस्त मराठी जनांचा, मुंबईसाठी बलिदान दिलेल्या १०६ हुतात्म्यांचा अपमान करणाऱ्या उपऱ्या व्यक्तीविरोधात सभागृहात पक्षभेद मोडून आवाज उठायलाच हवा आणि त्यात विरोधी पक्षनेत्यांनी पुढाकार घ्यायला हवा. महाराष्ट्र जितका शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीचा आहे, तितकाच तो भाजपचाही असायलाच हवा.

महाराष्ट्राच्या हुतात्म्यांचा अपमान ही मंडळी कसा काय सहन करू शकतात? मुंबईत खाऊन, ‘पिऊन’ तरारलेली एक महिला फिल्मी कलावंत मराठी अस्मितेवर दारूच्या गुळण्या टाकते हे सहन करता येणार नाही आणि राज्याच्या विधिमंडळात या प्रकाराची निंदा करायलाच हवी. मुंबईचा व पोलिसांचा अवमान करणाऱया त्या ‘मेंटल’ महिलेस महाराष्ट्रात राहण्याचा अधिकार नाही असे राज्याचे गृहमंत्री ठणकावून सांगत असतील तर तीच महाराष्ट्राची लोकभावना आहे हे मान्य करावे लागेल. गृहमंत्री देशमुख, मुंबईचे पोलीस आयुक्त व संपूर्ण पोलीस दलावर विधानसभेने विश्वास व्यक्त करणे गरजेचे आहे. मुंबई पोलीस ‘माफिया’ आहेत असे विधान करणाऱ्यांचीच चौकशी व्हायला हवी,” असे शिवसेनेने सामनाच्या अग्रलेखात म्हटले आहे.

“उत्तर प्रदेशातील मोस्ट वॉन्टेड आरोपी ‘आशु’ यास शनिवारी मुंबई पोलिसांनी बेड्या ठोकल्या. हापूर, नोएडा येथे या माफियाने अनेक खून केले आहेत. याआधी कानपुरात पोलिसाची हत्या करून मुंबईत घुसलेल्या विकास दुबेच्या साथीदारांनाही मुंबई पोलिसांनीच बेड्या ठोकल्या. मुंबई शहर हे देशातील गुन्हेगारांचे ‘डम्पिंग ग्राऊंड’ होत असेल तर त्यास ती ती राज्ये जबाबदार आहेत. तुम्ही घाण करायची व मुंबई पोलिसांनी साफ करायची, हे थांबवायचे असेल तर मुळांनाच हात घालावा लागेल,” असा सल्ला अग्रलेखातून देण्यात आला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER