WHOच्या चीनधार्जिण्या निष्कर्षावर जगाने विश्वास का म्हणून ठेवायचा ? – सामना

Saamana - WHO

मुंबई : जागतीक आरोग्य संघटनेने (WHO) नुकतेच जगाला सांगितले की, कोरोना विषाणू चीनमधील वुहानच्या प्रयोगशाळेत निर्माण झालेला नाही. जागतीक आरोग्य संघटनेच्या या खुलाशावर शिवसेनेचे मुखपत्र सामनातून संशय व्यक्त करत जागतीक आरोग्य संघटनेच्या खुलाशावर काही प्रश्न उपस्थित केले आहेत.

कोरोनाचा विषाणू (Coronavirus) सर्वप्रथम चीनमध्ये सापडला हे सत्य आहे . वुहान शहरातच पहिला रुग्ण सापडला आणि तिथेच तो फैलावला हेही जगजाहीर आहे . वुहानमध्येच चीनची जैविक अस्त्रांसाठी विषाणू निर्मिती करणारी प्रयोगशाळा आहे हेही सत्य आहे आणि या प्रयोगशाळेत कोरोनाचा विषाणू निर्माण झाला हे मात्र असत्य ! जागतिक आरोग्य संघटनेच्या या चीनधार्जिण्या निष्कर्षावर जगाने विश्वास का म्हणून ठेवावा ? असा रोखठोक प्रश्न आजच्या सामनाच्या अग्रलेखात विचारला आहे.

वाचा काय म्हणाले आहे सामनात –

संपूर्ण जगाची ‘आरोग्य रक्षक’ असलेली जागतिक आरोग्य संघटना चीनच्या हातची कठपुतळी तर बनली नाही ना अशी शंका घेण्याइतपत परिस्थिती आता निर्माण झाली आहे. चीनमधील वुहानच्या प्रयोगशाळेतून कोरोनाच्या विषाणूचा प्रसार झालेला नाही असे प्रमाणपत्रच आता जागतिक आरोग्य संघटनेने देऊन टाकले आहे. वास्तविक पाकिस्तान आणि उत्तर कोरियासारखे चीनचे मांडलिक देश वगळता अवघे जग कोरोनाच्या संकटासाठी चीनला जबाबदार धरत आहे. तरीही चीनला निर्दोष सिद्ध करण्याचा एवढा आटापिटा करण्याची गरजच काय? पण कोरोनाचे संकट उद्भवल्यापासून चीनविषयी सदैव पुळका दाखवण्याचे जे धोरण जागतिक आरोग्य संघटनेने स्वीकारले तेच आजतागायत कायम ठेवले आहे. अन्यथा कोरोनाचा विषाणू वुहानच्या प्रयोगशाळेत निर्माण झाला नाही, असा निष्कर्ष काढण्याची घाई जागतिक आरोग्य संघटनेने केली नसती. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पद सोडण्यापूर्वी जागतिक आरोग्य संघटनेवर जी आगपाखड केली ती अगदीच चुकीची नव्हती असेच आता म्हणावे लागेल. ट्रम्प यांचे एकूणच वागणे तऱ्हेवाईक आणि उथळ होते हे मान्य. जागतिक आरोग्य संघटनेचा निधी बंद करून आर्थिक नाकाबंदी करण्याचा त्यांचा निर्णय चुकीचा असेलही, परंतु कोरोनाच्या बाबतीत जागतिक आरोग्य संघटनेने जे चीनधार्जिणे धोरण स्वीकारले होते त्याला ट्रम्प यांनीच वाचा फोडली होती. जगभरात सवादोन कोटीहून अधिक बळी घेणाऱ्या

कोरोनाच्या उत्पत्तीबद्दल

जगाच्या कानाकोपऱ्यातील सारे देश चीनच्याच नावाने खडे फोडत असताना पुन्हा एकदा जागतिक आरोग्य संघटना ज्या पद्धतीने चीनच्या पाठीशी उभी राहिली आहे. ते अनाकलनीय आहे. मुळात कोरोनाचा विषाणू चीनच्या प्रयोगशाळेत जन्माला आला नाही किंवा या प्रयोगशाळेतून त्याचा प्रसार झाला नाही असा थेट निष्कर्ष काढण्याचा कुठलाही ठोस आधार जागतिक आरोग्य संघटनेने जाहीर केलेला नाही. इतकेच काय, जागतिक आरोग्य संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना चीनने आपल्या देशात चौकशीसाठी वर्षभर पायही ठेवू दिला नव्हता. तरीही चीनला कुरवाळून निरागस ठरवण्याचा अगोचरपणा कशासाठी? कोरोनाचा पहिला रुग्ण चीनमध्ये सापडल्यापासून ते चीनमध्ये या साथीचा वेगाने फैलाव होईपर्यंत जागतिक आरोग्य संघटना मूग गिळून गप्प राहिली. या विषाणूमुळे लोक किडय़ामुंग्यांप्रमाणे मरत असताना तब्बल सहा दिवस चीनने या विषाणूची माहिती जगापासून लपवून ठेवली. त्यावरही जागतिक आरोग्य संघटनेने तोंड उघडले नाही. डिसेंबर 2020मध्ये या जीवघेण्या विषाणूची माहिती ली वेनलिंग नामक डॉक्टरने चीन सरकारला सर्वप्रथम दिली होती. हा विषाणू किती धोकादायक आहे हे समजाविण्याचा प्रयत्न त्या डॉक्टरने केला तेव्हा चिनी राज्यकर्त्यांनी या डॉक्टरलाच कोठडीत डांबून त्याची चौकशी सुरू केली. एक डॉक्टर जगासमोरील संकट ओरडून सांगत असताना चीन सरकार त्याचे

तोंड बंद करण्याचा प्रयत्न

का करत होते? जागतिक आरोग्य संघटनेने याविषयी चीनला कुठलीही विचारणा का केली नाही? उलट चीन जगाला माहिती देण्याचे टाळत असताना तेथील सरकार जी माहिती देईल तीच खरी मानण्याची घोडचूक जागतिक आरोग्य संघटनेने केली. त्याचे गंभीर परिणाम साऱ्या जगाला भोगावे लागले. कोरोनासारखे संकट जागतिक आरोग्य संघटनेने ज्या पद्धतीने हाताळले ते चीड आणणारे होते. उपचारपद्धती, औषधे याविषयी तर गोंधळ होताच, पण तोंडाला मास्क लावणे काही आवश्यक नाही अशी भयंकर भूमिकाही या संघटनेने मांडली. केवळ चीनच्या सुरात सूर मिसळणे आणि चिनी नेत्यांच्या वक्तव्यांना होयबा म्हणून पाठिंबा देणे हेच काम जागतिक आरोग्य संघटना करत राहिली. आताही कोरोनाचा विषाणू चीनच्या प्रयोगशाळेत निर्माण झाला नाही अशी घोषणा करून जागतिक आरोग्य संघटनेने चीनला पावित्र्याचे प्रमाणपत्र बहाल केले आहे. मुळात कोरोनाच्या विषाणूचा जन्म कुठे झाला, याचा शोध घेणे हे जागतिक आरोग्य संघटनेचे काम आहे. पण कोरोनाचा जन्म कुठे झाला नाही, यावरच संघटनेने शक्ती खर्च केलेली दिसते, अशा शब्दांत सामनातून जागतीक आरोग्य संघटनेवर निशाणा साधला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER