अस्मानी आणि सुलतानी संकटे नवीन नाहीत, तौत्केच्या संकटातूनही महाराष्ट्र यशस्वी मार्ग काढेलच ; शिवसेनेचा विश्वास

Maharashtra Today

मुंबई : एकीकडे राज्यात कोरोनाचे(Corona) संकट आहे . तर दुसरीकडे चक्रीवादळाच्या लाटांचे तडाखे एका वर्षात महाराष्ट्राला दोनदा बसले. सुलतानी काय किंवा अस्मानी काय, संकटे महाराष्ट्राला नवीन नाहीत आणि या संकटांच्या छाताडावर पाय रोवून उभा राहणारा महाराष्ट्र जगाला नवीन नाही. महाराष्ट्राने अनेक ‘वादळ’वाटा तुडविल्या आहेत. ‘तौत्के’ चक्रीवादळाच्या (tauktae-cyclone)संकटातूनही महाराष्ट्र यशस्वी मार्ग काढेलच, अशा विश्वास शिवसेनेने (Shivsena) सामनाच्या अग्रलेखातून व्यक्त केला आहे.

आजचा सामनातील अग्रलेख :

कोरोना आणि चक्रीवादळाच्या लाटांचे तडाखे एका वर्षात महाराष्ट्राला दोनदा बसले. ‘तौत्के’ हे मागील तीन वर्षांत अरबी समुद्रात निर्माण झालेले आणि महाराष्ट्र–गुजरातला धडकणारे तिसरे चक्रीवादळ आहे. 2019 मध्ये ‘वायू’ वादळाने आणि गेल्यावर्षी ‘निसर्ग’ वादळाने महाराष्ट्राला तडाखा दिला होता. आता ‘तौत्के’ने धडक दिली. सुलतानी काय किंवा अस्मानी काय, संकटे महाराष्ट्राला नवीन नाहीत आणि या संकटांच्या छाताडावर पाय रोवून उभा राहणारा महाराष्ट्र जगाला नवीन नाही. महाराष्ट्राने अनेक ‘वादळ’वाटा तुडविल्या आहेत. कोरोनाच्या पहिल्या–दुसऱ्या लाटेला महाराष्ट्राने थोपविले. ‘निसर्ग’वर मात केली. आता ‘तौत्के’ चक्रीवादळाच्या संकटातूनही महाराष्ट्र यशस्वी मार्ग काढेलच, असे शिवसेनेने म्हटले आहे .

गेल्या वर्षी जून महिन्यात देशासह महाराष्ट्र कोरोना महामारीच्या पहिल्या लाटेशी झुंज देत असताना ‘निसर्ग’ हे शक्तिशाली चक्रीवादळ महाराष्ट्रावर आदळले होते. आता कोरोनाच्या दुसऱ्या लाटेशी झुंज सुरू असताना ‘तौत्के’ या चक्रीवादळाने महाराष्ट्राला तडाखा दिला आहे. हे वादळ केरळ किनारपट्टीला झोडपून काढत गोवा, कोकण किनारपट्टीवर धडकले. रविवारी ‘तौत्के’ने अतिरौद्र रूप धारण केल्याने कोकण, गोवा, प. महाराष्ट्राच्या काही भागाला जोरदार तडाखा दिला. सोमवारी हेच चित्र रायगड, ठाणे, पालघर जिल्हय़ांसह मुंबई परिसरात दिसून आले. गेल्यावर्षी ‘निसर्ग’ चक्रीवादळाने ऐनवेळी दिशा बदलल्याने त्याच्या तडाख्यातून मुंबई सुदैवाने बचावली होती. आताही ‘तौत्के’ चक्रीवादळ मुंबईवर थेट धडकणार नव्हते, तरी जोरदार वाऱ्यांसह मुसळधार पावसाने मुंबईला तडाखा दिलाच.

लॉक डाऊन असल्यामुळे अशीही सध्या मुंबईची ‘रफ्तार’ मंदावलेलीच आहे. ‘तौत्के’मुळे सोमवारी ती आणखी थंडावली इतकेच. मुंबईला ‘ऑरेंज अलर्ट’चा इशारा देण्यात आला होता. सोसाटय़ाचे वारे आणि पाऊस यामुळे झालेली काही ठिकाणची पडझड, झाडे कोसळणे, वीजपुरवठा खंडित होणे, लोकल वाहतूक-रस्ते वाहतुकीवर परिणाम होणे असे प्रकार झालेच. अर्थात महापालिका आणि अन्य यंत्रणा अलर्ट असल्याने खूप मोठे नुकसान झाले नाही, हे चांगलेच झाले, असेही यात म्हटले आहे.

रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हय़ांना मात्र या चक्रीवादळाचा जबर तडाखा बसला. तेथे मोठय़ा प्रमाणावर झाडे कोसळली, घरांची पडझड झाली. रत्नागिरीमध्ये तीन हजार 800 तर रायगडमध्ये सुमारे 6 हजार नागरिकांचे आधीच सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आले. ‘तौत्के’ हे ‘अतिरौद्र’ श्रेणीत मोडणारे चक्रीवादळ असल्याने शेती, पिके, फळे, झाडे, स्थावर मालमत्ता, घरांची पडझड, वीजपुरवठा खंडित होऊन तो सुरळीत होण्यास विलंब लागणे या गोष्टी अपरिहार्यच आहेत. राज्य शासनासह जिल्हा-स्थानिक प्रशासन, पोलीस, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा अशा सर्वांनीच योग्य खबरदारी घेतली. तरीही ‘तौत्के’मुळे देवगडमध्ये खडकावर आदळून बोटी वाहून गेल्या. त्यात एका खलाशाचा मृत्यू झाला आहे, तर तिघे बेपत्ता आहेत.

रायगडमध्ये घरावर झाड कोसळून एका महिलेचा मृत्यू झाला. खान्देशातही अशाच दुर्घटनेत दोन बहिणी मरण पावल्या. नवी मुंबईत एका तरुणाचा मृत्यू झाला. कोकणात गेल्यावर्षी ‘निसर्ग’ चक्रीवादळाने हाहाकार उडविला होता. आता ‘तौत्के’ चक्रीवादळाने तडाखा दिला आहे. ‘तौत्के’ चक्रीवादळ मंगळवारी गुजरातच्या दिशेने सरकलेले असेल, पण त्याचा परिणाम पुढील किमान 48 तास राज्याच्या मोठय़ा भागावर होणार आहे. वादळी वाऱ्यांसह अनेक जिल्हय़ांत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.

आधीच कोरोनाची दुसरी लाट आणि त्यामुळे अपरिहार्य ठरलेले लॉक डाऊन यामुळे सर्वच क्षेत्रांना फटका बसला आहे. शेतमालही त्यातून सुटलेला नाही. त्यात ‘तौत्के’ चक्रीवादळाने महाराष्ट्राला तडाखा दिला. राज्य सरकारने सर्व प्रकारची पूर्वतयारी, खबरदारी, सज्जता यात कोणतीही कसूर ठेवली नाही, पण ‘तौत्के’ हे चक्रीवादळ अतिरौद्र असल्याने मोठे नुकसान झाले आहे. गेल्यावर्षी कोरोनाची पहिली लाट आणि निसर्ग चक्रीवादळ. यावेळी कोरोनाची दुसरी लाट आणि ‘तौत्के’ चक्रीवादळ, असे शिवसेनेने म्हटले आहे .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button