“गर्वाने सांगा, होय मी मराठी आहे!” असे बळ देणारे बाळासाहेब ठाकरेच होते – सामना

Balasaheb Thackeray

मुंबई :- शिवसेनाप्रमुखांच्या जयंतीनिमित्त आजच्या सामानातून त्यांना अभिवादन करण्यात आले आहे. लोकप्रिय नेतृत्व म्हणजे काय याचे उत्तम उदाहरण म्हणजे बाळासाहेब. इंग्रजीत त्याला ‘स्टेचर’ असे म्हणतात आणि मराठीत ज्याला व्यक्तिमत्त्वाची उंची असे म्हटले जाते तसे बाळासाहेबांचे नेतृत्व अथांग आणि उत्तुंगच ठरले. बाळासाहेबांसारख्या लोकनेत्याची उंची गणितागत पद्धतीने मोजून मापून काढता येणार नाही, ती जाणवते. तिचे विश्लेषण करता येणार नाही. तिचे विभाजन करता येणार नाही, पण त्या महान व्यक्तीला पाहिल्यावर ते मोठेपण जाणवू लागते. बाळासाहेबांचे मोठेपण हे अशा स्वरूपाचे होते. आजच्या जन्मदिनी थोर बाळासाहेबांना साष्टांग दंडवत!, असे सामनाच्या माध्यमातून शिवसेनेने (Shivsena) म्हटले आहे.

आजचा सामना संपादकीय…

बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) या नावाभोवती लोकांच्या भावना गुंतल्या आहेत व पुढच्या मोठ्या कालखंडात या श्रद्धा तशाच राहतील. बाळासाहेब ठाकरे जगाला माहीत आहेत ते राजकीय पुढारी म्हणून, व्यंगचित्रकार म्हणून; पण बाळासाहेबांच्या राजकारणाचा कळस हा समाजकारणाच्या पायावरच उभा राहिला. स्वातंत्र्यपूर्व काळात टिळक व आगरकर यांच्यातला वाद जगजाहीर आहे. “आधी राजकारण की समाजकारण ” म्हणजेच सामाजिक सुधारणा असा तो वाद होता. टिळक हे राजकारणातून चळवळ उभी करण्याच्या बाजूने होते तर आगरकर हे समाजकारणाच्या माध्यमातून आधी नेटिव्ह मंडळींना शहाणे करून मग स्वातंत्र्य लढ्याकडे वळावे या विचाराचे होते. बाळासाहेब हे टिळक व आगरकरांचे मिश्रण होते. टिळक हे कर्मठ हिंदू होते. हिंदू म्हणून त्यांची भूमिका टोकाचीच होती. आगरकर हे रूढी, परंपरा याविरोधात होते. त्यांनी त्या माध्यमातून समाजकार्य केले. बाळासाहेब हिंदू म्हणून कर्मठ होते, पण त्यांचे कर्मठ हिंदुत्व शेंडी, जानव्याच्या गाठीत अडकून पडले नव्हते. ते मोकळ्या मनाचे होते. मराठी माणसांसाठी त्यांनी ‘शिवसेना’ संघटना काढली. हे सामाजिक कार्यच होते. शिवसेनेच्या माध्यमातून त्यांना पिचलेल्या मराठी माणसांच्या पोटापाण्याचे प्रश्न सोडवायचे होते, रोजगार मिळवून द्यायचा होता, विझलेल्या चुली पेटवायच्या होत्या, रिकाम्या हातांना काम द्यायचे होते. ते त्यांनी यशस्वीपणे करून दाखवले. हे समाजकारणच होते.

बाळासाहेबांनी सुरुवातीपासून ‘मराठी’ अस्मितेचा नारा दिला. हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक रक्षणाचा लढा होता. माझी मातृभाषा ही महाराष्ट्राची राजभाषा आहे. त्या राजभाषेचा अपमान सहन करणार नाही अशी बाळासाहेबांची सडेतोड भूमिका होती. मुख्य म्हणजे हा अधिकार प्रत्येकाला आपल्या राज्यघटनेनेच दिला आहे हे बाळासाहेब त्यावेळी पटवून देत होते. त्यामुळे ‘मराठी मराठी’ या भूमिकेवर टीका करावी असे काय आहे? नंतरच्या काळात देशातील प्रत्येक राज्याने हीच मातृभाषा रक्षणाची भूमिका स्वीकारली व तोच प्रत्येकाच्या राजकारणाचा केंद्रबिंदू ठरला. मराठी माणसाला मराठी म्हणवून घ्यायला लाज वाटत होती, दुबळेपणा वाटत होता असा तो पन्नास वर्षांपूर्वीचा काळ. त्या काळात “गर्वाने सांगा, होय मी मराठी आहे!” असे बळ देणारे बाळासाहेब ठाकरेच होते. व्यंगचित्रकार, कलावंत म्हणून अभिजात सौंदर्यदृष्टी आणि अगम्य कल्पनाशक्ती यांचा प्रत्यय आणून देणारे बाळासाहेबांचे जीवन म्हणजे धगधगत्या अनुभवाचे बंड ठरले. दारी येणाऱ्या प्रत्येक सामान्य माणसाचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न त्यांनी केला. त्यांच्या हातात तराजू होता व तो न्यायाचा तराजू होता. बाळासाहेब हे Man of action होते. “महाराष्ट्रत मी काँग्रेसचा पराभव करून दाखवीन” असे ते म्हणत तेव्हा “हे कसे शक्य आहे?” असा प्रश्न लोक विचारीत, पण बाळासाहेबांनी एकाकी झुंज देत महाराष्ट्रातून काँग्रेसची सत्ता उलथवून टाकली, शिवसेनेचा मुख्यमंत्री केला.

बाळासाहेबांनी हिंदुत्वाचा पुरस्कार केला, पण त्यांचे हिंदुत्व प्रचारकी थाटाचे किंवा राजकीय तोंडपाटीलकी करणारे नव्हते. गरज पडली तेव्हा त्यांनी हिंदुत्वाच्या रक्षणासाठी हाती भवानी तलवार उचलून हिंदुत्वाच्या दुश्मनांवर सपासप चालवली आहे. बाळासाहेबांचे हिंदुत्व म्हणजे राजकीय ढोंग नव्हते. हिंदुत्वाचा पुरस्कार करणारे ते माथेफिरू धर्माध नव्हते. त्यांच्या दरबारात मुसलमानांचाही राबता होता व बाळासाहेब प्रत्येकाशी माणूस म्हणून वागत. आजच्या राज्यकर्त्यांचे हिंदुत्व लाठीकाठीत अडकून पडले होते तेव्हा कश्मिरी पंडितांच्या रक्षणासाठी हाती ‘एके-47 घ्यावीच लागेल अशी बाळासाहेब घेत होते व संपूर्ण देश त्यांना दाद देत होता. राष्ट्रीय जीवनाच्या घडणीत बाळासाहेबांची कामगिरी किती यावर चर्चा होऊ शकते; पण नव्वदच्या दशकात देशावर सेक्युलरवादाची जळमटे चढली होती, बहुसंख्य हिंदूच्या भावना अडगळीत पडल्या होत्या, देशात पाकप्रेमी धर्माध मुसलमानांचा सुळसुळाट आणि धुमाकूळ वाढला होता. अशा प्रसंगी हिंदू म्हणून एक व्हा, देश धर्म वाचवा’ ही भीमगर्जना करून बाळासाहेबांनीच देशाच्या मनगटांत चैतन्य निर्माण केले. धर्माध फुटीरतावादी शक्तींसमोर एकसंध हिंदूंची महाशक्ती उभी करून देशाचे धार्मिक ऐक्य शाबूत ठेवले. या देशात हिंदू नावाचा एक ज्वालामुखी उसळतो आहे. भूगर्भातून तो वर आला आहे. त्याच्या वाटेला गेलो तर जळून खाक होऊ हे भय धर्मांध शक्तींत निर्माण झाले ते बाळासाहेबांमुळेच. सरदार पटेल यांनी राजे-रजवाडयांची संस्थाने खालसा करून देश एकसंध केला. त्याच तोडीचे हे बाळासाहेबांचे कार्य होते. देश एकत्र ठेवण्यासाठी त्यांनी विखुरलेला हिंदू एक केला. त्यांना लढण्याचे बळ देत हिंदूंचा एक उसळता मर्द सागर निर्माण केला. हे कार्य अचाटच होते. त्या मर्द सागराच्या लाटेवर बाळासाहेबांचे नेतृत्व सदैव उभे होते. असेही शिवसेनेने म्हटले आहे.

ही बातमी पण वाचा : जिथे अन्याय, तिथे शिवसेना’ : ऊर्मिला मातोंडकर

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER