राम मंदिर भूमिपूजन सोहळ्याला सोनिया, ममता, पवारांनाही बोलवायला हवे : शिवसेना

Pm MOdi-CM Thackeray

मुंबई :- राम मंदिराच्या मुद्द्यावरून शिवसेनेने पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधला आहे. राम नवमी किंवा गुढीपाडव्याच्या दिवशी रामजन्मभूमी मंदिराच्या कामाला ‘ट्रस्ट’ने सुरुवात करावी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याच हस्ते मंदिराच्या कार्याचे भूमिपूजन करण्यात यावे व तेच योग्य ठरेल, असं सांगतानाच काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, सपा नेते मुलायमसिंह यादव, बिहारचे मुख्यमंत्री नीतीशकुमार आणि राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्यासह देशातील सर्व प्रमुख नेत्यांना या भूमिपूजन सोहळ्यास बोलवायला हवे. या नेत्यांना सोहळ्याचे आमंत्रण द्यायला काय हरकत आहे? असा सवाल शिवसेनेने ‘सामना’तून  केला आहे..

दिल्ली विधानसभा निवडणुकीचा प्रचार सुरू असतानाच राम मंदिर निर्माण ट्रस्टची घोषणा पंतप्रधान मोदी यांनी संसदेत केली; पण त्याचा राजकीय फायदा झाला नाही हे समजून घेतले पाहिजे. आता लक्ष २०२४च्या लोकसभा निवडणुकीकडे आहे व त्या दृष्टीने अयोध्या व राम मंदिराचा वापर होणार असेल तर ते बरे नाही. मंदिर हा देशाच्या श्रद्धेचाच विषय आहे. सगळ्यांच्याच भावना त्यात गुंतल्या आहेत, असा टोलाही शिवसेनेने भाजपला लगावला आहे.

फडणवीस सरकारच्या काळातील महापोर्टल बंद करण्याचा उद्धव सरकारचा निर्णय

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नवी दिल्लीत भेट घेणार आहेत. मुख्यमंत्री म्हणून त्यांची मोदींसोबतची दिल्लीतील ही पहिलीच भेट आहे. या पार्श्वभूमीवर राम मंदिराची चर्चाही नसताना शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या दैनिक ‘सामना’त राम मंदिराबाबतच्या अग्रलेखात ही मागणी करण्यात आल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. त्यामुळे ठाकरे-मोदी भेटीत या विषयावर चर्चा होणार का, याची उत्सुकताही सर्वांना लागली आहे. राम मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्याला सोनिया गांधी, ममता बॅनर्जी, मुलायमसिंह यादव, नीतीशकुमार, शरद पवार यांच्यासह देशातील सर्व प्रमुख नेत्यांना बोलवायला हवे. सोहळ्याचे आमंत्रण द्यायला काय हरकत आहे? यायचे की नाही तो त्यांचा प्रश्न. एकाच पक्षाचा हा प्रचार सोहळा झाला अशी टीका करण्यास वाव राहू नये म्हणून ही सूचना आम्ही करीत आहोत, असे शिवसेनेने अग्रलेखात म्हटले आहे.

राम मंदिर ट्रस्टमधील सदस्यांवरूनही शिवसेनेने भाजपवर टीकास्त्र सोडलं आहे. या ट्रस्टमधील सर्व सदस्य या ना त्या नात्याने राष्ट्रीय स्वयंसेवक संघ किंवा विश्व हिंदू परिषदेशी संबंधित आहेत. विश्व हिंदू परिषदेचे अशोक सिंघल यांनी सुरुवातीपासून अयोध्या आंदोलनाचे नेतृत्व केले व या कार्यास त्यांनी वाहून घेतले होते हे खरेच आहे, पण शिवसेना, बजरंग दल, इतर काही हिंदुत्ववादी पक्ष, संघटना या आंदोलनात सहभागी झाल्याच होत्या. हे कसे विसरता येईल?, असा सवाल करतानाच करसेवकांच्या हौतात्म्याने ‘शरयू’ लाल झाली. त्यात देशभरातील शिवसैनिकांचे रक्त उसळताना दिसत होतेच, याकडेही या अग्रलेखातून लक्ष वेधण्यात आले आहे.