… तर लोकशाहीचा अंतकाळ जवळ आला ; शिवसेनेची केंद्र सरकारवर सडकून टीका

Uddhav Thackeray - PM Narendra Modi

मुंबई :- गेल्या काही दिवसांपासून सरकारच्या प्रत्येक धोरणावर शिवसेनेकडून (Shiv Sena) टीका करण्यात येत आहे. त्यातच आज पुन्हा एकदा शिवसेनेने केंद्र सरकारला (Central Government) लक्ष्य केले आहे. पंतप्रधानांनी राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्याविषयी केलेल्या विधानावरून शिवसेनेने मोदींना (PM Narendra Modi) सामना अग्रलेखातून लक्ष्य केले आहे.

आजचा सामनातील अग्रलेख :
‘मोदी हे ‘मन की बात’मधून आकाशवाणी करतात. म्हणजे त्यांना मनदेखील आहे. मोदी यांनी आता त्यांचे नवे दुःख लोकांसमोर मांडले आहे. दिल्लीतील काही लोक मला सतत टोमणे मारत असतात व माझा अपमान करतात. त्यांना मला लोकशाहीचे धडे द्यायचे आहेत, असे मोदी यांनी सांगितले आहे हे धक्कादायक आहे. आपल्या पंतप्रधानांचा अपमान कोण करीत आहे? पंतप्रधानांचा अपमान करण्याइतका प्रबळ विरोधी पक्ष विद्यमान राज्यकर्त्यांनी शिल्लक ठेवला आहे काय?

काँग्रेसच्या सध्याच्या नेतृत्वास आपण गांभीर्याने घेत नसल्याचे भाजप पुढाऱ्यांनी एका बाजूला सांगायचे व त्याचवेळी राहुल गांधी आमचा अपमान करतात, असे दुसऱ्या तोंडाने बोलायचे हे पांचट विनोदाचे लक्षण आहे. विधायक टीका करणे, सरकारच्या खोटेपणावर बोलणे यास राज्यकर्ते अपमान म्हणत असतील तर लोकशाहीचा अंतकाळ जवळ आला आहे,’ अशी टीका शिवसेनेने केली आहे.

‘मोदी हे जागतिक स्तरावरील मोठे नेते आहेत. त्यामुळे राहुल गांधी यांनी मारलेल्या टोमण्यांची दखल घेण्याची त्यांना गरज नाही. राहुल गांधी यांना गेल्या सहा वर्षांत या मंडळींनी मारलेले टोमणे एकत्र केले तर मोठे ग्रंथ निर्माण होतील. राहुल गांधींचा उल्लेख ‘पप्पू’ असा करणाऱ्यांनी दुसऱ्यांनी मारलेल्या टोमण्यांची धास्ती का बाळगावी? पश्चिम बंगालात ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांच्यासंदर्भात ज्या भाषेचा वापर सध्या सुरू आहे, त्यास काय म्हणावे? शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासारख्या नेत्यांवरही अधूनमधून टोमणेबाजी सुरूच असते.

राजकारणात दोन द्यावे आणि दोन घ्यावेत. भाजपाची ताकद मोठी असल्याने तुम्ही चार द्यावेत. पण कधीतरी दोन घ्यावेच लागतील आणि सत्ताधाऱ्यांनी याची तयारी ठेवायलाच हवी. मोदी सरकारचे भाग्य असे की, आज विरोधी बाकावर मधु लिमये, मधु दंडवते, लोहिया, जनेश्वर मिश्र नाहीत. चंद्रशेखर, इतकेच काय लालू यादव, येचुरीदेखील नाहीत. नाहीतर टोले आणि टोमणे म्हणजे काय याचा प्रत्यय आलाच असता. राज्य मिळाले आहे ते नीट चालवा! शेळ्यांवर राज्य करणे सोपे असते, अशा शब्दात शिवसेनेने भाजपावर निशाणा साधला.

ही बातमी पण वाचा : यूपीए अध्यक्षपदाबाबत शरद पवारांचे मोठं वक्तव्य; म्हणाले…  

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER