‘नवीन वर्षात नवा कोरोना’ हे चित्र निराशाजनक ; सामनातून वर्तवली चिंता

Britain - COVID -19 - Saamana
  • 2020 चे वैफल्यग्रस्त वर्ष मावळून नवा आशेचा सूर्य तेजाने तळपेल असे वाटले होते, पण …

मुंबई :- जवळपास वर्षभरापासून देश आणि राज्य कोरोनासोबत लढा देत आहे. आता कुठे कोरोना (Corona) नियंत्रणात आला होता. मात्र, आता नवा कोरोना दाराशी येत असल्याच्या बातम्यांनी खळबळ उडाली आहे. शिवसेनेचे (Shiv Sena) मुखपत्र सामनातून या नव्या कोरोनाबाबतची चिंता वर्तवली आहे. महाराष्ट्रात रात्रीची संचारबंदी लागू करून सावधानता बाळगली, पण दुसऱ्या कोरोनामुळे पुन्हा एकदा लोकांच्या पोटावरच पाय आला. 2020 चे वैफल्यग्रस्त वर्ष मावळून नवा आशेचा सूर्य तेजाने तळपेल असे वाटले होते, पण राज्यात 5 जानेवारीपर्यंत रात्रीची संचारबंदी लागू केली आहे. मुंबईसारख्या शहरात नाइट लाइफ सुरू असावी अशी मागणी होती. आता रात्रीची संचारबंदी सुरू झाली. नवीन वर्षात नवा कोरोना हे चित्र निराशाजनक असल्याचे सामनातून सांगण्यात आले आहे.

आजचा सामना –
आऊट ऑफ कंट्रोल म्हणजे सुसाट सुटलेला हा विषाणू नियंत्रणाच्याही पलीकडे आहे, असे नव्या विषाणूचे वर्णन इंग्लंडच्या आरोग्य खात्याने केले आहे. त्यामुळे जगातील बहुतेक देशांनी ब्रिटनबरोबरचे हवाई संबंध तोडले आहेत. नवीन वर्षात नवा कोरोना हे चित्र निराशाजनक आहे. यातून मार्ग काढावा लागेल. सगळ्यांचेच चेहरे काळजीने करपून गेलेले दिसतात. काय करावे? कसे करावे? उद्या काय होणार? हीच चिंता ज्याला त्याला लागून राहिली आहे. लोकांच्या सोशिकपणालाही मर्यादा आहेत हे मान्य, पण आज तरी आहे त्या परिस्थितीला सामोरे जाण्याशिवाय पर्याय नाही.

सध्याचा काळ मोठा कठीण आला आहे, यात अजिबात शंका नाही. कोरोना नावाच्या एका विषाणूने जगभरात हाहाकार माजवून सोडला आहे. जीवनासंबंधी इतकी विवंचना आणि असुरक्षितता कधी कोणाला वाटली नसेल. हे सगळे कमी होते म्हणून की काय, आता कोरोनाच्या नव्या विषाणूने अवतार घेतला आहे. हा विषाणू आधीच्या विषाणूपेक्षा भयंकर असल्याने आता कुठे सावरू लागलेले जग पुन्हा भयभीत झाले आहे. एकेकाळी ग्रेट ब्रिटनने जगावर राज्य केले. ब्रिटिश साम्राज्याचा सूर्य कधीच मावळत नव्हता, असे गौरवाने बोलले जाते. त्याच ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा जहाल संसर्गजन्य असा नवा अवतार आढळून आल्यानंतर साऱ्या जगाने ब्रिटनवर जणू सामाजिक बहिष्कारच टाकला आहे.

ब्रिटनहून येणाऱ्या विमानांना बंदी घालण्यात आली आहे. ब्रिटनहून येणारा प्रत्येक प्रवासी क्वारंटाईन केला जाईल. ब्रिटनमधील विषाणूचा धसका असा की, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ठाकरे (CM Thackeray) यांनी राज्यात रात्रीची संचारबंदी लागू केली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मुंबई-ठाणे-पुणेसारख्या शहरांना मोठी आर्थिक झीज सोसावी लागेल, पण सावधगिरीचा उपाय म्हणून ही कठोर पावले उचलावीच लागणार आहेत. मुख्यमंत्र्यांनी रविवारी जनतेशी संवाद साधला व रात्रीच्या संचारबंदीची गरज नसल्याचे सांगितले, पण ब्रिटनसारख्या देशातील भयंकर स्थिती पाहता महाराष्ट्राने सावधगिरीचा उपाय बाळगला आहे. ब्रिटनमध्ये आढळून आलेला विषाणू वेगाने पसरला आहे. त्यामुळे ब्रिटनसह अनेक युरोपियन देशांनी पुन्हा लॉक डाऊन सुरू केला. आजघडीस स्पेन, डेन्मार्क, नेदरलॅण्ड या देशांत चिंता वाटावी असे वातावरण आहे.

इटलीमध्येही ब्रिटिश कोरोनाने शिरकाव केला आहे. आपल्या देशाचे आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्या मते नव्या विषाणूला घाबरण्याची गरज नाही. देश सतर्क आहे. त्याचवेळी ब्रिटनचे आरोग्य सचिव मॅट हॅकॉक म्हणतात, नवा कोरोना व्हायरस पहिल्यापेक्षा जास्त खतरनाक असून तो वेगाने हल्ला चढवतो. त्याची संसर्ग क्षमता आधीच्या विषाणूपेक्षा 75 टक्के जास्त आहे. ही माहिती मन विषण्ण करणारी आहे. त्यामुळे हिंदुस्थानचे आरोग्यमंत्री काहीही म्हणत असले, तरी चिंता करावी लागेलच. हिंदुस्थानला पहिल्या कोरोनावर अद्याप नियंत्रण मिळविता आलेले नाही, तेथे दुसऱ्या कोरोनाचे काय घेऊन बसलात? ‘आऊट ऑफ कंट्रोल’ म्हणजे सुसाट सुटलेला हा विषाणू नियंत्रणाच्याही पलीकडे आहे, असे नव्या विषाणूचे वर्णन इंग्लंडच्या आरोग्य खात्याने केले आहे. त्यामुळे जगातील बहुतेक देशांनी ब्रिटनबरोबरचे हवाई संबंध तोडले आहेत. ऑस्ट्रेलियात नव्या कोरोना विषाणूचे 83 पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने तेथील अनेक राज्यांच्या सीमा बंद करण्यात आल्या आहेत. एकंदरीतच, काळजी करावी अशी परिस्थिती नव्याने निर्माण झाली आहे. जुना कोरोना ही चीनची निर्मिती होती, म्हणून अमेरिकेचे ट्रम्प यांनी चीनशी भांडण सुरू केले.

आता ट्रम्प यांच्या जागी जो बायडेन आले. बायडेन यांनी जाहीरपणे कोरोनाची लस टोचून घेतली. पण ही लस पहिल्या कोरोना विषाणूवर आहे. दुसऱ्या कोरोनासाठी ही लस लागू पडेल काय? आपण आता ब्रिटनहून येणारी विमाने बंद केली. ब्रिटनहून कालपर्यंत जे आले त्यांना 14 दिवस क्वारंटाईन केले. प्रश्न आहे ब्रिटिश पंतप्रधान जॉन्सन यांचा. दिल्लीतील 26 जानेवारीच्या सोहळय़ात जॉन्सनसाहेब प्रमुख पाहुणे आहेत. त्यामुळे ‘बहिष्कृत’ ब्रिटनचे पंतप्रधान जॉन्सन हे दिल्लीत येतील काय? मागे ‘नमस्ते ट्रम्प’ कार्यक्रमासाठी ट्रम्प हे अहमदाबादेत आले व ट्रम्पबरोबरच्या लवाजम्याने कोरोना पसरविण्याचे काम केले. त्यामुळे ट्रम्पच्या तुलनेत सज्जन व सरळ असलेल्या जॉन्सन यांच्याबाबतीत काय करायचे, हा प्रश्नच आहे. ब्रिटनमध्ये नवा कोरोना विषाणू वेगाने पसरत आहे. त्यामुळे जग भयभीत झाले आहे. यातून मार्ग काढावा लागेल. सगळ्यांचेच चेहरे काळजीने करपून गेलेले दिसतात. काय करावे? कसे करावे? उद्या काय होणार? हीच चिंता ज्याला त्याला लागून राहिली आहे. लोकांच्या सोशिकपणालाही मर्यादा आहेत हे मान्य, पण आज तरी आहे त्या परिस्थितीला सामोरे जाण्याशिवाय पर्याय नाही. असे सामनात म्हटले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER