… हे तर सामान्य माणसाच्या हतबलतेचा गैरफायदा घेण्याचे उद्योग ; इमारत दुर्घटनेवरून शिवसेना आक्रमक

mumbai-thane-bhiwandi-building-collapse

मुंबई : भिवंडीतील धामणकर नाका येथील जिलानी बिल्डिंग कोसळून (Bhiwandi building collapse,)सोमवारी मध्यरात्री झालेल्या दुर्घटनेत आतापर्यंत 30 जणांचा मृत्यू झाला असून, २५ जण जखमी झाले आहेत. तर आणखी १५ ते २0 जण ढिगाºयाखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या घटनेवरून शिवसेनेने (Shivsena) सामनाच्या अग्रलेखातून (Saamana editorial) आक्रमक भूमिका घेतली आहे .

भिवंडीमध्ये मागील पाच वर्षांत सहा इमारत दुर्घटना घडल्या. संबंधित बिल्डर्सविरुद्ध गुन्हे दाखल झाले, पण तरीही येथील बेकायदा बांधकामांचे पेव थांबले नाही. सामान्य माणसाच्या हतबलतेचा गैरफायदा घेण्याचे उद्योग भ्रष्ट प्रशासन आणि बिल्डर करतात, अशी टीका शिवसेनेने सामानाच्या अग्रलेखातून केली आहे .

आजचा सामनातील अग्रलेख :

बेकायदा बांधकामे करणारे सुटतात आणि त्यात राहणारी कुटुंबे दुर्घटनेच्या कचाट्यात सापडतात हे मान्य केले तरी ‘जिलानी’सारख्या दुर्घटनेत निवाराही जातो, किडुकमिडुकही जाते आणि प्रसंगी जीवही जातो. महिनाभरापूर्वी महाडमधील ‘तारिक’ इमारत दुर्घटनेने 40 पेक्षा अधिक कुटुंबे उद्ध्वस्त झाली. मुंबईतील इमारत दुर्घटनांमध्येही काहींचे जीव गेले. आता भिवंडीतील ‘जिलानी’ इमारत कोसळली आणि 20 पेक्षा जास्त कुटुंबे उघड्यावर पडली. इमारत दुर्घटनांचा हा इशारा सर्वांनीच समजून घेण्याची गरज आहे.

भिवंडी शहरातील ‘जिलानी’ ही इमारत सोमवारी पहाटे कोसळली. या दुर्घटनेने नेहमीचेच काही प्रश्न पुन्हा चव्हाट्यावर आणले आहेत. त्यातही भिवंडीसारख्या शहरातील दाटीवाटीच्या भागात उभी राहिलेली बेकायदा बांधकामे, तेथे होणाऱ्या दुर्घटना आणि बचावकार्य करताना येणारे नेहमीचे अडथळेदेखील अधोरेखित केले आहेत. राज्य सरकारने ‘जिलानी’ दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाख रुपये मदत जाहीर केली आहे. इतरही तातडीच्या गोष्टी केल्या जात आहेत. ते चांगलेच आहे, मात्र हे सगळे शेवटी पुरेसे नाही. मुळात भिवंडी आणि बकालपणा, लोकसंख्येची दाटीवाटी, बेकायदा बांधकामांचे पेव असेच एक चित्र वर्षानुवर्षे दिसत आले आहे. ज्या पटेल कंपाऊंड परिसरात ‘जिलानी’ इमारत कोसळली तो भाग आणि तो ज्या क्षेत्रात आहे त्या धामणकर नाका परिसरात दाटीवाटीच्या अनधिकृत इमारतींचे जाळेच पसरले आहे. धामणकर नाक्याशिवाय अंजुर फाटा, गैबीनगर आणि इतर काही भाग दाटीवाटीने उभ्या राहिलेल्या अनधिकृत इमारतींसाठी कुप्रसिद्ध आहेत. खरे म्हणजे संपूर्ण भिवंडीचीच ही दारुण परिस्थिती आहे. या इमारतींपर्यंत पोहोचण्यासाठी रस्ता सोडा, चिंचोळय़ा गल्ल्याही भयंकर आहेत. प्रत्यक्ष इमारतींच्या खोल्यांमध्ये स्वच्छ प्रकाश, खेळती हवा वगैरे प्राथमिक गोष्टींचीही वानवाच आहे.

‘जिलानी’ इमारतीपर्यंत पोहोचण्यासाठीदेखील पाच फूट रुंदीचा रस्ता नव्हता. त्यामुळे सुरुवातीला ‘जेसीबी’ नेताच आला नाही. इमारत कोसळली पावणे चारच्या सुमारास आणि जेसीबी तेथपर्यंत पोहोचले सकाळी 10 वाजता. म्हणजे बचावकार्याचे अत्यंत मूल्यवान असे सहा तास वाया गेले. पुन्हा ‘जिलानी’च्या अवतीभवतीही बेकायदा इमारतींचा वेढा आहे. त्यामुळे मदतकार्यात तो अडथळाच ठरला. भिवंडीतील बेकायदा इमारतींमध्ये राहणाऱ्या रहिवाशांसाठी ही कायमची टांगती तलवारच आहे. कारण बेकायदा बांधकामांचा वेग कमी झालेला नाही. तीन वर्षांपूर्वी शहरातील बेकायदा इमारती तोडण्याबाबत उच्च न्यायालयाचे आदेश असले तरी प्रत्यक्ष ‘हातोडा’ पडला नाही. अर्थात अशा इमारतींमध्ये राहणाऱ्या हजारो कुटुंबांच्या निवाऱयाचे काय, हा प्रश्नदेखील असतोच. प्रत्येक अनधिकृत बांधकाम तोडण्याच्या प्रसंगी हा प्रश्न उसळी मारून येत असतो. त्याला माणुसकीची किनार आहे. मात्र शेवटी एका सुरक्षित पर्यायाची निवड करणे श्रेयस्करच ठरते. बेकायदा बांधकामे करणारे सुटतात आणि त्यात राहणारी कुटुंबे दुर्घटनेच्या कचाट्यात सापडतात हे मान्य केले तरी ‘जिलानी’सारख्या दुर्घटनेत निवाराही जातो, किडुकमिडुकही जाते आणि प्रसंगी जीवही जातो. भिवंडीमध्ये मागील पाच वर्षांत सहा इमारत दुर्घटना घडल्या. संबंधित बिल्डर्सविरुद्ध गुन्हे दाखल झाले, पण तरीही येथील बेकायदा बांधकामांचे पेव थांबले नाही.

सामान्य माणसाच्या हतबलतेचा गैरफायदा घेण्याचे उद्योग भ्रष्ट प्रशासन आणि बिल्डर करतात. एखादी ‘जिलानी’ कोसळते. त्यात निरपराध्यांचे जीव जातात. जे वाचतात ते उघड्यावर पडतात. पुढे नवीन दुर्घटना होईपर्यंत ना बेकायदा इमारतींची बांधकामे थांबतात, ना त्यातील घरांची विक्री थांबते, ना त्यावर कारवाई होते. पुन्हा भिवंडीसारख्या शहरात तर दाटीवाटीने बांधलेल्या अनधिकृत इमारतींना तळमजल्यावरील यंत्रमागांचा खडखडाट आणि छोट्या कारखान्यांमधील यंत्रांचा खणखणाटदेखील कमकुवत करीत असतो. सोमवारी कोसळलेल्या ‘जिलानी’ इमारतीच्या तळमजल्यावर आणि आजूबाजूलाही यंत्रमाग होतेच. एरवी एखादी बेकायदा तोडफोड इमारतीसाठी धोकादायक ठरते. भिवंडीतील शेकडो अनधिकृत इमारतींसाठी तळमजल्यांवर असलेले यंत्रमाग आणि छोट्या कारखान्यांतील हादरे धोकादायक ठरत असल्याच्या तक्रारी आहेत.

हे यंत्रमाग आणि कारखाने लाखो लोकांसाठी रोजीरोटी आहेत, पण तरीही ते त्यांच्यासाठी ‘अदृश्य यमदूत’ ठरणार नाहीत याचीही काळजी प्रशासनाने घ्यायला हवी. विशेषतः कमकुवत, जुन्या इमारतींबाबत हा धोका जास्त महत्त्वाचा ठरतो. ‘जिलानी’ इमारत दुर्घटनेची आता चौकशी होईल. संबंधितांविरुद्ध गुन्हे दाखल होतील, पण पुढे काय, हा प्रश्न कायमच राहील. महिनाभरापूर्वी महाडमधील ‘तारिक’ इमारत दुर्घटनेने 40 पेक्षा अधिक कुटुंबे उद्ध्वस्त झाली. मुंबईतील इमारत दुर्घटनांमध्येही काहींचे जीव गेले. आता भिवंडीतील ‘जिलानी’ इमारत कोसळली आणि 20 पेक्षा जास्त कुटुंबे उघड्यावर पडली. इमारत दुर्घटनांचा हा इशारा सर्वांनीच समजून घेण्याची गरज आहे, असे शिवसेनेने म्हटले आहे .

ह्या  बातमी पण वाचा : 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER