एका महिलेला सरकार घाबरले ; सामनातून मोदींवर टीका

saamana-editorial-on-mahuva-moithra-farmers-protest-central-government-west-bengal-politics

मुंबई :- तृणमूल काँग्रेसच्या झुंजार खासदार महुआ मोईत्रा यांच्यावर पाळत ठेवली जात आहे. ”पाळत ठेवावी असे आपण काय केले आहे?” असा प्रश्न श्रीमती महुआ (Mahuva-Moithra) यांनी विचारला आहे. महुआ या लोकसभेत तृणमूल काँग्रेसचे प्रतिनिधित्व करतात. त्या प. बंगालातून प्रथमच निवडून आल्या, पण एखाद्या अनुभवी खासदारास मागे टाकतील अशी संसदीय झुंज त्या लोकसभेत देत आहेत.वाघिणीला (ममता बॅनर्जी) साजेशी सहकारी म्हणून आम्ही महुआकडे पाहतो. असे सांगत महुआ यांच्यावर पाळत ठेवून सरकारने स्वतःची दुर्बलता उघड केली. एका महिलेला सरकार घाबरले हेच आता स्पष्ट झाले आहे. हुकूमशाही ही सगळ्यात जास्त डरपोक असते हे पुन्हा सिद्ध झाले. महुआ मोईत्रा यांनी त्यांचा बुरखा फाडला आहे. अशी टीका आजच्या सामनाच्या अग्रलेखातून (saamana-editorial) केली आहे.

भाजप राजकारणात कोणती संस्कृती रुजवू पाहत आहे? या देशात आमच्याशिवाय दुसरा कोणीच राहता कामा नये याच मार्गाने ते प्रवास करीत असतील तर त्यांना हा देश व जनतेचे मानस नीट समजलेले दिसत नाही. आजही अशा कठीण परिस्थितीशी बेडरपणे ‘सामना’ करणारे लोक आहेत. ममता बॅनर्जी, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), शरद पवार (Sharad Pawar), पंजाबचे बादल, शेतकऱ्यांचे नेते राकेश टिकैत असे अनेक लोक बेडर होऊन संघर्ष करीत आहेत. सरकारकडे पाळत ठेवण्याची यंत्रणा असल्याने ‘सामना’ थांबणारा नाही. असे सामनात म्हटले आहे.

लोकसभेत व वृत्तवाहिन्यांवरील चर्चेत या झुंजार वाघिणीने मोदी सरकारला अनेकदा घाम फोडला आहे. त्यामुळेच तिला वेसण घालण्यासाठी नको असलेली सुरक्षा व्यवस्था देऊन पाळत ठेवली जात आहे. महुआ मोईत्रा यांनी लोकसभेत देशाच्या न्यायव्यवस्थेचा बुरखा फाडणारे भाषण केले. महुआ यांनी काय सांगितले? न्यायव्यवस्था आता पवित्र नाही (काल न्या. रंजन गोगोई यांनीही नेमके तेच सांगितले). केंद्र सरकार म्हणजे अफवा, चुकीची माहिती पसरविणारा फुटीर उद्योग झाला आहे अशी भूमिका त्यांनी मांडली. सगळय़ात महत्त्वाचे म्हणजे त्यांनी मोदी सरकारवर थेट हल्ला करताना सांगितले, ”काही लोक सत्तेची ताकद, कट्टरता आणि खोटेपणास शौर्य मानतात.” यावर भाजप जाम भडकला आहे. तत्कालीन सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी दबावाखाली येऊन राममंदिरासंदर्भात निकाल दिल्याचा आरोप महुआ यांनी केला.

महुआ यांचे राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर जोरदार भाषण झाले व अर्थव्यवस्थेपासून कृषी कायद्यांपर्यंत अनेक मुद्यांवर त्यांनी सरकारची बोलती बंद केली, पण सरकारची बोलती बंद झाली तरी त्यांच्या हाती पोलीस, सीबीआय, गुप्तचर व्यवस्था आहे व त्यांचा वापर करून राजकीय विरोधकांवर पाळत ठेवली जात आहे वा ‘ईडी’चा फटका मारुन घायाळ केले जात आहे. हा विषय एकट्या महुआपुरता मर्यादित नाही. विरोधी पक्षांतील इतर अनेकांना नामोहरम करण्यासाठी याच तंत्राचा वापर केला जात आहे. असा आरोप आजच्या सामनाच्या अग्रलेखातून केला आहे.

ही बातमी पण वाचा : दिशा रविला पाकिस्तानचा पाठिंबा; मोदी सरकारवर टीका 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER