नियम पाळा नाही तर पुन्हा लॉकडाऊन अटळ!; सामनातून इशारा

Cronavirus

मुंबई :- कोरोना पुन्हा डोके वर काढत आहे. त्याला वेळीच थांबवणे जनतेच्या हातात आहे. त्यामुळे कोरोनाची दुसरी लाट मुंबई-महाराष्ट्रात येऊ द्यायची की तिला थोपवायचे याचा विचार जनतेलाही गंभीरपणे करावा लागेल. असे आजच्या सामनाच्या अग्रलेखात म्हटले आहे.

कोरोनाग्रस्तांची संख्या गेल्या आठवडय़ापासून चढत्या भाजणीने वाढू लागली आहे. एका आठवड्यात हा आकडा दुप्पट म्हणजे सहाशेपर्यंत नोंदविला जात आहे. म्हणजे महाराष्ट्रात रोज चार हजारांच्या तर मुंबईत सहाशेच्या आसपास नव्या कोरोनाबाधितांची भर पडत आहे. त्यामुळेच राज्य सरकारला कोरोना नियम (Corona Rules) आणि निर्बंधांची जाणीव जनतेला पुन्हा एकदा कठोर शब्दांत करून देणे भाग पडले आहे. नियम पाळा, नाही तर पुन्हा लॉक डाऊन अटळ ठरेल, असा इशारा तर खुद्द राज्याच्या आरोग्यमंत्र्यांनीच दिला आहे. तो जनतेनेही गांभीर्याने घेण्याची गरज आहे. लॉक डाऊन हा सर्वात शेवटचाच पर्याय आहे हे खरेच, पण तो लागू करण्याची वेळ सरकारवर येणार नाही याची जबाबदारी जनतेचीदेखील आहेच. असे आजच्या सामनाच्या अग्रलेखात (Saamana Editorial) म्हटले आहे.

कोरोनाच्या एका लाटेचा तडाखा सर्वांनीच अनुभवला आहे. त्याचे मानवी आरोग्यावर, कुटुंब व्यवस्थेवर झालेले गंभीर परिणामही पाहिले आहेत. देशाची आणि जनतेची आर्थिक घडी कशी विस्कटली, ती अद्यापि कशी सावरली गेलेली नाही हे सर्वांना माहीत आहे. अपरिहार्य लॉक डाऊनचे ‘ऑफ्टर शॉक्स’ आजही सगळे सहन करीतच आहेत. सुदैवाने कोरोना संकटावर एकमात्र उपाय असलेली लसदेखील आता उपलब्ध झाली आहे. या लसीकरणाचा पहिला टप्पा पार पडला आहे. आता दुसऱया टप्प्याची सुरुवात होण्याची वेळ आहे. मात्र अशा वेळी राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या पुन्हा वाढू लागली आणि कोरोनाच्या दुसऱया लाटेचे वादळ घोंघावू लागले तर कसे व्हायचे? सरकारी प्रयत्न आणि जनतेने घेतलेली खबरदारी या दोन्ही गोष्टींची परिणामकारक अंमलबजावणी राज्यात झाल्यानेच कोरोना आटोक्यात येऊ शकला आहे. मात्र कोरोना निर्बंधांचे जोखड भिरकावून द्यावे असा त्याचा अर्थ नाही. त्यातून कोरोनाचे भूत पुन्हा मानगुटीवर बसल्याशिवाय कसे राहील? निर्बंध पाळले तर कोरोना दूर राहतो, निर्बंधांची ऐशी की तैशी झाली की तो हल्ला करतो हे साधे गणित आहे. कोरोनाचे आटोक्यात येणे आणि आता त्याने पुन्हा डोके वर काढणे या दोन्ही अनुभवांचा विचार जनतेने गंभीरपणे करायला हवा.

सरकार आपल्या परीने योग्य उपाययोजना करीतच आहे, जनतेनेही बेफिकिरी टाळायला हवी. आवश्यक खबरदारी कटाक्षाने घ्यायला हवी. कोरोनाने पुन्हा वर काढलेले डोके पूर्णपणे ठेचण्यासाठी एवढे करावेच लागेल. तेवढी खबरदारी घेण्याची हीच योग्य वेळ आहे! असे आवाहन आजच्या सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आले आहे.

ही बातमी पण वाचा : लॉकडाऊन हा आमच्यासाठी अंतिम पर्याय ; आरोग्यमंत्र्यांच्या अधिका-यांना सुचना

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER